Sunday, June 15, 2025
Homeअवांतरमावशीची हाळी म्हणजे आंब्यांची वर्दी

मावशीची हाळी म्हणजे आंब्यांची वर्दी

चंद्रशेखर माधव

साधारणपणे मार्च महिन्यात आंब्यांचा सीझन सुरू होतो. आमच्या लहानपणी, सुमारे 1985 ते 1990 या काळात, कॉलनीत एक मध्यमवयीन महिला डोक्यावर जुन्या पद्धतीची वेलींपासून विणून बनवलेली मोठी टोपली घेऊन आंबे विकायला येत असे. नऊवारी साडी, कपाळावर मोठ्ठं गोल कुंकू. कमरेला चंची अडकवलेली असा पारंपरिक वेश केलेल्या मावशींचा आवाज अगदी भारदस्त होता. एक हाक दिली की, शेजार शेजारच्या दोन इमारतींच्या अगदी सर्वात वरच्या मजल्यापर्यंत आवाज पोहोचलाच म्हणून समजा.

भर दुपारी उन्हाच्या वेळी “आंबे….. हॅप्पुस” अशी हाक आली की आमची आई “आल्या वाटतं…. शेखर, जा बरं, काय भाव आहे विचार,” असं हमखास सांगे. तिने हे वाक्य म्हणताच, मी लगेच बाहेर पळत असे. बाहेर गेल्यावर हाक देण्याआधीच त्या दारापर्यंत आलेल्या असत. घरासमोर आल्या की, डोक्यावरच्या टोपलीला (मावशी त्या टोपलीला पाटी म्हणत असत) दोन्ही हात लावून “दादा, जरा हात लाव रे” असं म्हणून ती पाटी माझ्या मदतीने खाली ठेवीत.

जशी टोपली खाली ठेवली तसं आंब्यांचा सुगंध आलाच म्हणून समजा. मग आंबे बघणे… भाव करणे इत्यादी प्रकार सुरू होत असे. हे सर्व सोपस्कार होईपर्यंत इमारतीतील इतर महिलावर्ग गोळा होत असत. त्या मावशींची व्यवसाय करण्याची हातोटी जबरदस्त होती. बरोबर भाव करून आमच्या एकाच इमारतीत त्या सुमारे तीन ते चार डझन आंबे नक्की विकत असत. (त्या काळी हे जास्त होतं.)

हेही वाचा – लहानपणीची दिवाळी अन् नव्या कपड्यांची खरेदी

मला आठवतंय आम्ही 30 ते 50 रुपये डझन या भावाने त्यांच्याकडून आंबे घेत असू. या सगळ्यात महत्त्वाचा भाग हा होता की, त्यांच्याकडे पायरी आंबा सुद्धा असे. थोडासा आंबट-गोड पायरी खायला छान वाटायचं. तसा पायरी आंबा आता बाजारात येत नाही.

लहानपणी इतर कुठल्या दुकानातून किंवा विक्रेत्याकडून आंबे घेतलेले मला तरी आठवत नाही. आंबे घ्यायचे म्हटलं की, त्या मावशीकडूनच घ्यायचे हे समीकरणच झालं होतं. इतकं सगळं असलं तरी, त्यांचं नाव काय? कुठे राहतात? वगैरे तपशील आमच्यापैकी कुणालाही ठाऊक नव्हता. साधारणपणे 10 वर्षं हा उपक्रम दर उन्हाळ्यात सुरू होता. कालांतराने त्या मावशीचे येणे अचानक बंद झाले.

अगदी अलीकडे, म्हणजे चार-पाच वर्षांपूर्वी अशाच एका शनिवारी दुपारी अचानक तो परिचित आवाज पुन्हा माझ्या कानी पडला… मी पटकन बाहेर गेलो अन् पाहिलं तर मावशी डोक्यावर पाटी घेऊन आल्या होत्या. इमारतीत बोलावलं…. बसल्या… पाणी वगैरे दिलं.

“काय म्हणताय मावशी? खूप वर्षांनी आलात,” मी म्हणालो. “हो रे दादा… जीव थकला आता. पूर्वीसारखं येणं शक्य होत नाही,” मावशी विषण्णपणे म्हणाल्या.

हेही वाचा – …आणि मी “डॉक्टर” झालो!

आंबे पाहिले… बरे होते. माझ्या बालपणीच्या आठवणी त्या आंब्यांशी जोडलेल्या असल्याने त्यांच्याकडून आंबे घ्यायचे, हे मी आधीच ठरवलं होतं. त्यामुळे आजिबात मोलभाव न करता दोन डझन आंबे घेतले. मावशीही खूप खूश झाल्या. निघता निघता त्यांनी इमारतीतल्या इतर महिलांचीही चौकशी केली. पण त्यातल्या काहीजणी राहायला दुसरीकडे आणि काहीजणी पुढच्या प्रवासाला निघून गेलेल्या असल्यामुळे आमच्या दारात पूर्वीसारखी गजबज काही झाली नाही.

थोडावेळ थांबून मावशी निघून गेल्या… आता पुन्हा भेटतील की नाही, माहीत नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!