नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
काही काही प्रेक्षक कसे असतात माहिती आहे, ते कथेमध्ये विरघळून जातात. ते स्वतः सीन जगतात. त्यावर भाष्य करतात. खूप साऱ्या चर्चा करतात. ते लोक ती सीरियल, त्यातली पात्र जगायला सुरुवात करतात. मी एक सीरियल करत होते ‘तुझ्या इश्काचा नाद खुळा’. मी त्यात तसा वाईटच रोल करत होते. म्हणजे, हीरो माझा मुलगा नसतो तरी, माझी त्याच्यावर जबरदस्ती की, मी सांगेन त्याच मुलीशी लग्न करायचं आणि त्यासाठी मी त्याला छडीने बडवते. मला खरं तर निगेटीव्ह रोल करायला आवडतात. पण हे असं कोणाला माराबिरायला नाही आवडत. सीन तर केला पण खूप वाईट वाटत होतं… जरी ते खरं नसलं तरी!
मार्केटमध्ये एक बाई भेटली… मला पाहताच ती वैतागलीच…चेहऱ्यावर स्पष्टच दिसत होतं! म्हणे, “लाज वाटते काहो लोकांच्या मुलाला एवढ मारलंत! कशा बाई आहात? स्वतःच्या मुलांना माराल का असं?” मी कसनुसं हसले आणि सटकले.
काही दिवसांनी ट्रॅक बदलला म्हणून माझे सीन कमी यायला लागले… आणि काही दिवसांसाठी थांबले. म्हणजे आम्ही हीरोला त्याच्या खऱ्या आईवडिलांकडे पाठवून देतो… बस्स! मार्केटमध्ये पुन्हा ती बाई दिसली. मी जरा दुर्लक्ष करून सटकायचा प्रयत्न केला, पण तिने मला बघितलं आणि थांबवलंच! वर म्हणते कशी, “काय हो, काढलं ना तुम्हाला सीरियलमधून? हे असं होणारच होतं. लोकांच्या मुलाला मारलं की, त्याची शिक्षा मिळणारच…” मी पुन्हा फक्त हसून पुढे गेले.
हेही वाचा – हिंदी सीरियलची ऑडिशन अन्…
दरम्यान कोरोना आला. मुंबईत सुरू असलेल्या सगळ्या सीरियल गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्या. कमीत कमी लोकांमध्ये काम करावं लागत होतं. त्या सीरियलमध्ये थोडा वेगळा ट्रॅक आला होता. हीरो वर बलात्काराचा खोटा आरोप होतो. त्याला खूप त्रास दिला जातो वगैरे… आणि ती बया माझ्या राशीला पुन्हा आली! जोरातच ओरडली मला… “कशी आई आहेस गं? मुलावर एवढं संकट कोसळलं आहे, अशा वेळी त्याला त्यातून बाहेर पडायला मदत करायची, त्याच्या पाठीशी उभ राहायचं तर मार्केटमध्ये फिरतेयस!”
आता हसावं, रडावं की पळावं? ती बाई काय माझ्यावर लक्ष ठेऊन असते की काय? बरोब्बर मी मार्केटमध्ये गेले की, ती येऊन टपकते…
त्यानंतर अलीकडची माझी सीरियल ‘पिंगा ग पोरी पिंगा’ आली. त्यामध्ये मी पारशी रोशन आंटी करत होते. अधून मधून येणारं जाणारं पात्र होतं ते. ती बया माझ्या काही राशीतून जायला तयार नाहीये. पण गेल्या चार-पाच वर्षांत ती बुद्धीने प्रगल्भ झाली असावी. माझ्याशी जरा हसूनच बोलली… “तुमची रोशन आंटी खूप छान आहे हो. पण मिठूवर हल्ला झालाय. कोर्टात केस सुरू आहे. त्या चार मुलींच्या पाठीशी तुम्ही उभं राहायला हवे. पोरी खचून जातील हो!” मी “बरं” म्हणून निघाले. जरा बरं वाटलं की, तिने रस्त्यात गोंधळ नाही घातला!
हेही वाचा – …अन् व्हॉट्सॲप ग्रुपमधून ‘क्राइम’ने मुक्त केलं!
नंतर परत भेटली… “प्रेरणाच्या लग्नाला आला नाहीत? काही झालंय का तुमच्यात? त्यानंतर प्रेरणाला किडनॅप केल्यानंतर त्या खवीसाला मारायला मी पण पाहिजे होती,” असेही त्यांचं म्हणणं होतं. त्यांना म्हटलं, “वेळ आहे का तुमच्याकडे?”
त्यांनी “हो” म्हटल्यावर त्यांना जरा समजावलं… “अहो या सीरियल बघता ना, त्या तेवढ्यापुरत्या बघून सोडून द्यायच्या. आपल्या आयुष्यात त्यांना डोईजड नाही होऊ द्यायचं…”
“हो” म्हणाल्या त्या.
पण आता मी सुटले आहे. कारण मी जुनं घर बदललं आहे. त्यामुळे मार्केटमध्ये त्या बाई भेटणार नाहीत. पण हे ‘सीरियल वेडे’ कुठे न कुठे भेटतच राहणार! शेवटी अतिरेकी असलं तरी प्रेमच असतं ते प्रेक्षकांचं!


