भाग – 2
आज शूटिंग नसल्याने वंदना सकाळी निवांत आठ वाजता उठली. गेले पाच दिवस तिला सहाच्या शूटिंगसाठी जावं लागे… तिच्यासारख्या नवीन ॲक्ट्रेसना तर वेळेत हजर रहावंच लागे. कॉफी पिता-पिता तिने आधी आपला एस ए (Struggler Actors) हा व्हॉट्सॲप ग्रुप ओपन करून बघितला. त्यानंतर तिने फेसबुक ओपन केलं आणि ती पोस्ट पाहू लागली. एवढ्यात तिचे लक्ष एका फोटोकडे गेलं, बेडवर पडलेल्या एका तरुणीचा फोटो होता, मुलगी अस्ताव्यस्त पडली होती. वंदनाने निरखून पाहिले आणि ती मनात म्हणाली, “अरे, ही तर प्रणिता नांदे!” तिने लिहिलेला मजकूर वाचून तिला धक्का बसला.
प्रणिताने लिहिले होते – “आज माझा या जगातील शेवटचा दिवस, मी पुरती निराश झाले आहें, आईवडिलांशी भांडून मी मुंबईत आले… पण माझा लोकांनी गैरफायदा घेतला. कामे मिळत नाहीत, माझ्याकडे पैसे नाहीत…. अलविदा!”
ग्रुप ॲडमिन मनीषला फोन करून सर्व माहिती दिली. व्हॉट्सॲप ग्रुपवर याची माहिती टाकली आणि तिचा मोबाइल नंबर मिळाला. पोलिसांनी त्या नंबरवरून तिचा पत्ता शोधला. वाशीच्या सेक्टर 20मध्ये ती रहात होती. पोलिसांनी तिची चाळ शोधून काढली. घराचे दार आतून बंद केलेले होते. पोलिसांनी धक्के मारून दार उघडले. पोलिसांच्या मागोमाग एस ए ग्रुपमधील मेंबर्स पण आता घुसले…
दार उघडताच अस्तव्यस्त अवस्थेत प्रणिता कॉटवर पडलेली दिसली. लेडी पोलीस पुढे झाली, तिने तिला हलवून उठवायचा प्रयत्न केला, मग तिने तिची नाडी चेक केली आणि सर्वांकडे वळून ती म्हणाली, “नाडी संथ आहे, पण लागते आहे. तिला हॉस्पिटलला तातडीने न्यायला लागेल.”
मनीषने येताना एका राजकीय पक्षाचे ऑफिस जवळच असल्याचे पाहिले होते. त्यामुळे मनीष धावत खाली उतरला आणि त्या ऑफिसमध्ये गेला.
सुदैवाने त्या पक्षाची ॲम्ब्युलन्स बाजूच्याच गल्लीत पार्क केलेली होती. त्याने ड्रायव्हरला ती चाळीखाली आणायला सांगितली. महिला पोलीस आणि वंदनाने तिला उचलून जिन्यातून खाली घेतले.
एव्हाना एस ए ग्रुप मेंबर्सना हा पत्ता कळला होता, त्यामुळे त्या ग्रुपमधील बरीच मंडळी जमा होऊ लागली.
ॲम्ब्युलन्स पुढे, त्यात लेडी पोलीस सोबत वंदना होती आणि पाठोपाठ एस ए ग्रुप्समधील स्त्री-पुरुष सदस्य वेगवेगळ्या गाडीतून येत होती. ॲम्ब्युलन्स गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि पोलिसांनी प्रणिताला ॲडमिट केले.
हेही वाचा – एसए ग्रुप… एफबीवर प्रणिताची ‘ती’ पोस्ट
मेडिसिन डिपार्टमेंटच्या मुख्य डॉक्टरने तिला तपासले. तिची नाडी मंद चालू होती, ब्लड प्रेशर खूपच खाली गेलं होत, ऑक्सिजन लेव्हल चिंताजनक होती. सोबत असलेल्या वंदनाला डॉक्टर म्हणाले, “खूपच क्रिटिकल कंडिशन आहे. बहुतेक हिने भरपूर ड्रग्ज घेतले असण्याची शक्यता आहे. वाचण्याची शक्यता कमी आहे. हिचे जवळचे नातेवाईक असतील तर त्यांना बोलावून घ्या.”
वंदनाला प्रश्न पडला, “हिची फारशी ओळखच नव्हती, मग हिचे नातेवाईक शोधायचे कसे? हिचे गाव, तालुकाही काही माहीत नाही.”
एवढ्यात वंदनाच्या लक्षात आले, मग हा तिच्या रूममध्ये तिच्या कॉटवर असलेला मोबाईल मी माझ्या पर्समध्ये टाकला होता. वंदनाने आपली पर्स उघडून प्रणिताचा मोबाईल बाहेर काढला. तू आता चालू कसा करायचा, हे तिला कळेना. मग अनेक युक्त्या वापरून (नेहेमीच्या) तिने तिचा मोबाईल ओपन केला.
तिचे कॉल लिस्ट उघडून ओळखीचे नाव येते का, ते ती पहात होती. एवढ्या तिला ‘आई’ असे नाव दिसले. वंदनाने ओळखले हा प्रणिताच्या आईचा नंबर असणार. तिने मनीषला आणि संगीताला तिच्या मोबाईलमधला आईचा नंबर दाखवला. मनीष तिला म्हणाला, “तूच तिच्या आईला फोन कर, ती सीरियस आहे असे सांगू नकोस, तिचा अपघात झाला आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये आहे, असे सांग.”
संगीताचे पण तसेच म्हणणे होते. यावेळेपर्यंत त्यांच्या एस ए ग्रुपमधील श्याम, अनुजा यांचंही तेच म्हणणे होते… “तू फोन कर आणि तिच्या आईला न घाबरवता कळव आणि ती मंडळी मुंबईत येत असतील तर येऊदे.”
मग वंदनाने ‘आई’ या नंबरवर फोन लावला…
आई – काय गं, नवीन काही काम मिळते आहे का?
फोन प्रणिताचा म्हणून तिच्या आईला फोनवर प्रणिता वाटली असणार, हे वंदनाच्या लक्षात आले.
वंदना – काकू, मी प्रणिताची मैत्रीण वंदना… मी आणि तिने अनेक मालिकांमध्ये एकत्र काम केले आहे.
आई – अगं, मग प्रणिता कुठे आहे?
वंदना – काकू, प्रणिताला लहानसा अपघात झाला आहे. आता ती तशी बरी आहे. पण डॉक्टरने तिला बोलायला बंदी केली आहे.
आई – अरे बापरे, काय झालं प्रणिताला?
प्रणिताची आई रडू लागली.
वंदना – अहो काकू ती बरी आहे, पण तिला आईची आठवण येत आहे, म्हणून मी फोन केला. तुम्ही कुठे राहता?
आई – सांगलीला.
वंदना – तुम्ही मुंबईला येऊ शकता काय?
आई रडत रडत म्हणाली, “अगं, ही आमचं न ऐकता घर सोडून गेली, तिचे बाबा तिचे नाव घेत नाहीत. आमचा मुलगा पुण्यात असतो, मी कशी येणार सांग.” वंदनाने “बरं” म्हटलं आणि ती एस ए ग्रुप मेंबर्सजवळ आली. आता सुमारे साठ लोक जमली होती. सगळी नाटक – सिनेमाच्या मोहापोटी आणि अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी कुठून कुठून आलेली… अजून जम बसत नाही, पण एका ग्रुपमार्फत एकमेकांना धरून राहिलेली. एवढ्यात मनीष म्हणाला, “पण तिच्या आईला आणावेच लागेल, तिच्या भावाचा नंबर मिळाला तर त्याला पण घेऊन येऊ. पण नंबर कसे मिळतील?”
“वंदना, तू अजून कॉन्टॅक्ट लिस्ट बघ, कोणी ओळखीचे दिसते का बघ… किंवा तिचे जास्तीत जास्त कॉल कुणाला गेलेत ते बघ.”
वंदनाने परत मोबाईल उघडला, तेव्हा ‘आरती’ नावाच्या मुलीला तिचे रोज फोन जात होते हे लक्षात आले. वंदनाने आरतीला फोन लावला…
आरती – काय ग प्रणे, आज शूटिंग नाही वाटतं? आता कॉल केलास म्हणून विचारते.
वंदनाने तिला आपण प्रणिताची मैत्रीण असल्याचे सांगितले आणि प्रणिताला ॲक्सिडन्ट झाला म्हणून तिचा फोन आपल्याकडे असल्याचे सांगितले. सुदैवाने, आरती सांगलीतील तिची लहानपणापासूनची मैत्रीण निघाली. ती म्हणाली, “मी प्रणालीच्या आईला घेऊन एक तासात निघते.”
तिने प्रणालीच्या भावाचा नंबर दिला. वंदना मनीषला म्हणाली, “तिच्या भावाला तू फोन कर.”
मनीषने तिच्या भावाला फोन लावला… आपल्या बहिणीचा नंबर दिसला म्हणून त्याने उचलला नाही. मग तो नंबर मनीषने आपल्या फोनवरून लावला. त्या नंबरावरून त्याने फोन उचलला.
मनीष – मी मनीष बोलतोय, ठाण्यावरून… तुमची बहीण प्रणिता हिला लहानसा अपघात झालाय. आता ती बरी आहे. पण तिच्या घरचे तिच्या जवळ असावे म्हणून तिच्या मोबाइलमधून तुमचा नंबर घेतला आणि तुम्हाला फोन लावला.
प्रणिताचा भाऊ – खरंतर गेली दोन वर्षे मी तिच्याशी बोललेलो नाही. तिने घेतलेला निर्णय आम्हाला पसंत नव्हता म्हणून. पण ती माझी बहीण आहे. तिला बरे नसेल तर मला तिकडे यावेच लागेल. मी माझ्या आईला कळवतो.
मनीष – आम्ही तुमच्या आईला कळवले आहे. ती आरती बरोबर बहुतेक ठाण्याला येते आहे.
भाऊ – मग ठीक आहे, मी पण माझ्या आईला फोन करून सांगतो. पण माझी बहीण खरोखर बरी आहे ना? काही काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे का?
हेही वाचा – एका घासात विठ्ठल…
मनीष – काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही. पण हॉस्पिटलमध्ये तिच्या घरचे कुणीतरी सोबत असायला हवे, आम्ही मित्रमंडळी जास्त वेळ राहू शकत नाही, म्हणून मी फोन केला.
भाऊ – मी लगेच निघतो. ठाण्याजवळ आलो की, तुम्हाला फोन करतो. मग मला कुणीतरी घ्यायला या.
मनीष – तुम्ही कसे येणार आहात ते पण कळवा.
अशा रीतीने प्रणिताचा भाऊ ठाण्यात येत होता.
वंदना – मनीष आपण आता वाशीमध्ये असताना तू तिच्या भावाला ठाण्याला ये असे का सांगितलेस?


