22 सप्टेंबर 1965 रोजी रंगमंचावर आलेल्या ‘अदरक के पंजे’ या एकपात्री कार्यक्रमाची सांगता 11 फेब्रुवारी 2011 ला झाली. त्या दिवशी पडलेला पडदा प्रचंड लोकप्रियता आणि रसिकांची मागणी असूनही पुन्हा वर उचलला गेला नाही. त्याचा कर्ताकरविता बब्बन खान आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
अदरक के पंजे आणि बब्बन खान यांची इस्टोरी पुरी फिल्मी वाटावी अशी आहे. बब्बन खान तेव्हा ऐन विशीत होते. हातात पदवी होती, पण नोकरी नव्हती. घरात चारी विश्व दारिद्र्य होतं. हातातोंडाची गाठ पडणं मुश्कील होतं. बब्बन खानचे तीन भाऊ आणि चार बहिणी कुपोषणामुळे निरनिराळ्या वयाला मरण पावले होते. हे धाकटे मुल जगले होते. गरिबीत कसेबसे वाढत होते. नोकरीसाठी, काही आमदनी व्हावी अन् कुटुंबाला चार घास मिळावेत म्हणून रस्तोरस्ती फिरत होते.
एक दिवस त्यांच्या मनात कल्पना आली. हैदराबादच्या त्यांच्या चंद्रमौळी घरासमोरच्या टुकार गल्लीतल्या मंद प्रकाशाच्या रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून त्यांनी आपलीच जीवन गाथा लिहायला सुरवात केली. उपहास, उपरोध यांनी ते लेखन ओतप्रोत भरलेलं होतं. विनोदाला कारुण्याची झालर होती. ते जे काही भोगत होते, त्याहून काहीतरी वेगळंच कागदावर उतरत होतं. याला कारण म्हणजे आयुष्याकडे बघायची त्यांची सकारात्मक वृत्ती!
हेही वाचा – …असाही विचार करता येतो!
हाती दमडी नव्हती. आईचं मंगळसूत्र त्या काळात 275 रुपयाला विकून त्यांनी 22 सप्टेंबर 1965 रोजी ‘अदरक के पंजे’ रंगमंचावर आणलं. पैशांची तर वानवाच होती… डोळे दिपवणारा सेट नाही, पार्श्वसंगीत नाही, दिव्यांची, प्रकाशाची उधळण नाही… असा हा एकपात्री कार्यक्रम सुरू झाला. मंचावर फक्त जुनाट, पत्र्याची दुमडता येणारी खुर्ची, काही पत्र्याचे डबे, एक मोडकी बाबा आदमच्या काळातली बाज (खाटलं)… एवढंच! पहिले एक-दोन प्रयोग साफ पडले. खर्च सुद्धा भरून आला नाही. पण नंतर मात्र हा कार्यक्रम धो धो चालायला लागला.
1984मध्ये सर्वात जास्त प्रयोग झालेला एकपात्री कार्यक्रम म्हणून त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (Guinness Book of World Records) नोंद झाली. उर्दू आणि जुन्या हैदराबादी भाषेत असणाऱ्या या एकपात्री कार्यक्रमाचे, जगभरातील 27 निरनिराळ्या भाषांमध्ये अनुवाद झाले. 35 वर्षांत 3 करोड लोकांनी तो पाहिला. 60 देशांत त्याचे प्रयोग झाले. परदेशातील त्यांच्या प्रयोगांना भारतीय लोकांबरोबरच ही भाषा अवगत नसणारे स्थानिक पण हजर असायचे. केवळ हे काय अजब गारुड आहे, हे बघण्याच्या उद्देशाने! वॉशिंग्टन ऑडिटोरिअममध्ये (Washington Auditorium) मायकेल जॅकसन, फ्रँक सिनात्रा यांच्याबरोबरच बब्बन खान यांची पण स्वाक्षरी जतन करून ठेवलेली आहे. 128 आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रातून ही अजब कहाणी लिहिली गेली आहे. परदेशात तर ‘Babban Khan In Your Town’ एवढीच पाटी गर्दी खेचायला पुरेशी असायची.
बब्बन खान यांनी आपल्या कार्यक्रमाचे हक्क टीव्ही, सिनेमा… कुणालाच विकले नाहीत. सर्व हक्क त्यांच्या स्वाधीन आहेत. त्या काळात कुटुंब नियोजनाचा संदेश देणारा, ‘छोटा परिवार सुखी परिवार’ हे हास्यस्फोटक पद्धतीने सांगत असणारा हा कार्यक्रम सरकारी कृपादृष्टीपासून वंचित राहिला.
हेही वाचा – संस्कार… मुलांना विश्वास द्यायची गरज
मी देखील हा कार्यक्रम बऱ्याच उशिरा, ठाण्यात झाला तेव्हा, साधारण ऐशीच्या उत्तर दशकात पाहिला. या कार्यक्रमाने बब्बन खान यांना प्रचंड लोकप्रियता, कीर्ति, यश, पैसा, नावलौकिक दिला; पण त्यांचे पाय नेहमी जमिनीवरच राहिले. जिथे त्यांचं मोडकळीला आलेलं दरिद्री घर होतं, तिथे आज त्यांचा आठ शयनकक्ष असणारा आलिशान बंगला उभा केला. हैदराबादमध्ये ते बब्बन खान ॲक्टिंग अकादमी (Babban Khan Acting Academy) सुरू केली.
युट्यूबवर जमशीद खान यांचा मूळ संहितेवर आधारित ‘अदरक को पंजे’ हा कार्यक्रम उपलब्ध आहे. पण आता विनोदाने आणि एकंदरीत जगानेच, माणसांच्या आवडीनिवडीनेच इतकं अजब रूप धारण केलं आहे की, हा कार्यक्रम मनापर्यंत पोचत नाही. पण, ज्यांना हा कार्यक्रम माहिती नसेल त्यांनी बब्बन खान आणि ‘अदरक के पंजे’ ही काय चीज होती, याची झलक म्हणून ही क्लिप बघायला हरकत नाही. पण ती मजा येत नाही. काही काही कलाकृतींना कालमर्यादा असती तर काही कालातीत असतात.


