‘टुट्टुमियाच्या शेंगा’! नाव चमत्कारीक वाटलं ना ऐकून? टुट्टुमिया म्हटल्यावर अस वाटत की, ते एखाद्या व्यक्तीचे नाव असावे. परंतु हे आहे गडचिरोली, चंद्रपूरच्या जंगलांमध्ये आढळणाऱ्या एका झाडाचे नाव; ज्याला या शेंगा लागतात. ॲागस्ट ते सप्टेंबर या कालावधीत या शेंगा बाजारात मिळतात. चंद्रपूर/ गडचिरोलीच्या खेड्यापाड्यांमध्ये तर घराच्या अंगणात, शेतामध्ये किंवा जंगलात कुठेही मिळतात. आम्ही अहेरी (गडचिरोली जिल्हा) येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असताना तेथील आठवडी बाजारात या शेंगा पहावयास मिळाल्या होत्या. त्यानंतर अलीकडेच मला या शेंगांचा फोटो थोर समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या फेसबुक वॅालवर पहायला मिळाला. असो! तर सांगायचा मुद्दा हा आहे की, अहेरीला आमच्या शेजारी महाराष्ट्र बँकेतील मॅनेजर सहकुटुंब रहायला होते. त्यांच्या पत्नीने मला प्रथम या शेंगांचे लोणचे खाऊ घातले होते.
हिरवट जांभळ्या रंगाच्या या शेंगा आकाराने लांब आणि चपट्या असतात. चवीला या शेंगा तुरट असतात. आलापल्ली, अहेरी या भागांतील जंगलांमध्ये टुटुमियाची खूप झाडे आढळतात. यालाच छत्तीसगडमध्ये ‘टेन्टीच्या शेंगा’ असेही म्हणतात. दक्षिण गडचिरोलीमध्ये या शेंगांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. दुर्गम भागातील आदिवासी या शेंगांची भाजीपण करतात. या शेंगा कॅन्सरसारख्या रोगावर औषधासारखे काम करतात, असं वाचण्यात आलं आहे.
निसर्गाने मानवाकरिता काय काय निर्माण करुन ठेवले आहे नाही? किती तरी प्रकारच्या वनस्पती, झाडे, औषधे सगळं सगळं निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो… आपण फक्त ते ओरबाडून न घेता, त्याचा निगुतीने सांभाळ करावा, इतकं आपल्याला समजायला हवे, नाही का? काही झाड जंगले, वनस्पतींच्या प्रजाती या आदिवासी लोकांनी जपून ठेवल्या आहेत; म्हणूनच ही जंगले आजपर्यंत काही बाबतीत अबाधित राहिली आहेत. आदिवासी आणि वनवासी जीवांनी जितके जंगलांवर, पशू-पक्ष्यांवर, ओढे-नदी नाल्यांवर प्रेम केले आहे, ते सामान्य माणसांना किंवा शहरी लोकांना कधीच जमले नाही!
विषयांतर व्हायला नको म्हणून जास्त काही न सांगता आपल्या मूळ मुद्द्याकडे वळते, म्हणजेच टुट्टुमियाच्या शेंगाच्या लोणच्याची रेसिपी सांगते.
साहित्य
- टुट्टुच्या शेंगा – दोन
- लिंबं – चार
- तिखट – दोन ते अडीच चमचे
- हळद – एक चमचा
- मोहरी – डाळ दोन टेबल स्पून
- बडिशोप – एक चमचा
- धणे – एक चमचा
- जिरे – एक चमचा
- काळे मिरे – चार-पाच
- मेथीदाणे – अर्धा चमचा
- हिंग – एक लहान चमचा
- मीठ – चवीनुसार
- गूळ – लिंबाच्या प्रमाणात (ऐच्छिक)
- तयार लोणचे मसाला – दोन चमचा (कुठल्याही कंपनीचा)
हेही वाचा – Recipe : पारंपरिक ‘उन्हातले कैरीचे लोणचे’
कृती
- टुट्टुमियाच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्याव्यात आणि त्याचे पातळ काप करून घ्यावेत.
- काप केल्यानंतर त्याच्या आतील मगसदार बिया चमच्याने काढून घ्याव्यात. कारण या बियांमुळे लोणचे कडवट लागते.
- कापलेल्या शेंगांचे सर्व काप मिठाच्या पाण्यात रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी पाण्यातून काढून कोरड्या फडक्यावर सुकवून घ्यावेत.
- कढईमध्ये धणे, जिरे, बडिशोप, मिरे, मेथीदाणे सर्व एकेक करून भाजून घ्यावेत आणि त्यांची भरड करून घ्यावी.
- एका भांड्यात ही मसाल्यांची भरड आणि तिखट, मीठ, हळद, हिंग एकत्र करून ते सर्व चांगले एकजीव करून घ्यावेत.
- या मसाल्यात थोडा तयार लोणचे मसाला घालावा.
- नंतर यामध्ये चार लिंबांचा रस आणि गूळ घालावा आणि परत एकदा सर्व मिश्रण हलवून घ्यावे.
- तयार मसाल्यांच्या मिश्रणात चिरलेल्या टुट्टुच्या शेंगा टाकून ते सर्व मिश्रण व्यवस्थित कालवून घ्यावे.
- तयार झालेले लोणचे काचेच्या बरणीत भरून थंड जागेवर ठेवावे.
हेही वाचा – Recipe : मोड आलेल्या मेथीदाण्यांचे रुचकर लोणचे!
टिप्स
- तयार लोणचे मसाल्यांमध्ये मोहरीची डाळ कमी प्रमाणात असते म्हणून मी घरी तयार केलेली मसाल्यांची भरड टाकते. मसाला जास्त असला की, लोणच्यांना चव छान येते, असं माझं मत आहे.
- तसे तर या लोणच्यात तेल वापरत नाही, परंतु तेल वापरायचे असेल तर, सरसो किंवा फल्ली तेलाचा वापर करावा.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


