हिमाली मुदखेडकर
माहेरी गावी जाण्याचा खूप वर्षांनी योग आला होता. वामकुक्षी आटोपून मस्तपैकी फक्कड चहा घेतला… आणि फेरफटका मारून यावा म्हणून निघाले. आजूबाजूचा परिसर अनोळखी वाटावा, इतका बदल झाला होताच. तरी काही ओळखीच्या… जुन्या खुणा शोधण्याचा अट्टाहास नजर करत होती… पण कुठे काही खाणाखुणा सापडत होत्या… तर कुठे अगदीच नावीन्य पसरले होते…
अशीच पुढे पुढे जात मी त्याच जुन्या पाण्याच्या टाकीजवळ आले… सहज नजर वर टाकीकडे टाकली… पण ते मधमाशांचं पोळं नव्हतं तिथे, जे पूर्वी आम्ही तेथून जात असताना नेहमी दिसायचं…
सवयीने नजर समोरील घराकडे वळली. असं वाटल की, तिथेही अपेक्षित चाफा नसेल आता… पण सुखद आश्चर्याचा धक्का! चाफा होता तिथे… तसाच… पूर्वीपेक्षा अधिक डौलदार… उंच फोफावलेला.. आणि छान निगा राखलेला… शेजारी पेरूचेही झाड होतेच… अगदी जसेच्या तसे!! त्याच्या फांदीवर झोकाही होता… पूर्वी आम्ही दोरीचा बांधायचो… आता केनचा होता.
घराभोवती कुंपणही अगदी पूर्वीसारखेच… बांबू उभ्यातून अर्धा कापून त्याची जाळी केलेले कुंपण. या कुंपणामागेच ती उभी असायची, रोज सकाळी माझी वाट पाहात… मी आले की, आम्ही दोघी मिळून पुढे शाळेसाठी निघायचो.
ती… वनिता.. माझी शाळेतली जिवलग मैत्रीण… लांब केस, गोल चेहरा, पाणीदार डोळे, साधीशी सैल एक वेणी… नीट व्यवस्थित तेल लावून घातलेली… आम्ही इतर सगळ्याजणी शाळेचा गणवेश म्हणून स्कर्ट घालायचो… पण वनिता गणवेशाच्या रंगाचा लांब पारकर घालत असे.
मी दुरून येताना दिसले की, कुंपणाचे फाटक उघडत ती, ‘येते गं वहिनी…’ असं मोठ्याने सांगत असे.
सातवी-आठवीत शिकणारी वनिता… तिच्या दादा आणि वहिनीसोबत इथे या घरात राहत असे. दादा, वहिनी, दोन भाचे आणि वनिता! तिचे आई-वडील गावी असत. भाऊ टेक्सकॉम नावाच्या कंपनीत कामाला जात असे.
गावाकडे मुलींची लवकर लग्न केली जातात… वनिता दिसायला सुरेख… चटकन नजरेत भरणारी… वयात येऊ घातलेली… ना जाणो कुणी मागणी घातली आणि वडिलांनी ठरवलंच बालवयात लग्न तर! बहिणीच्या आयुष्यच नुकसान होईल, या भीतीपोटी दादाने तिला स्वतः सोबत तिला शहरात आणली होती. शाळा शिकेल आणि वहिनीला वर कामात मदतही करेल… असे सांगून!
वनिता ही वाहिनीला सगळ्या कामात मदत करत असे. सकाळी साडेसातच्या शाळेला… जिथे वेळेवर उठण्यासाठी आईचा ओरडा खाऊन डोळे चोळत आम्ही पळत असू तिथे ती मात्र धुणी-भांडी करून स्वतःचे नीटनेटके आवरून येत असे…
आम्ही बर्याचदा दुपारी एकमेकींच्या घरीही जात असू. अभ्यास, गप्पाटप्पा.. असx बरेचदा चालत असे. माझ्या घरी ती आली की, सराईतपणे कुणीही ना सांगता समोरची छोटी-मोठी कामे चटाचट करत असे. मला फार गम्मत वाटे तिची याबाबतीत!
“अगं, बस की जरा आल्यासारखी… सारखं काय हाताला काम लागतं तुझ्या?” माझी आई तिला हक्काने रागवे.
“कपड्यांच्या घड्याच तर करायच्या होत्या काकी! त्याला काय असा सोस लागतोय… तोंडाने बोलता बोलता हाताने होतात…” ती उत्तरे.
लिंबाच्या सालीसारखी नितळ उजळ कांती असणारी वनिता घरकामात… निवडण्या-टिपण्यात… घर टापटीप ठेवण्यात चांगलीच तरबेज होती… पण अभ्यासात तिची गती जरा कमीच पडे, गणित हा तिचा सर्वात मोठा शत्रू! बाकीचे विषय घोकंपट्टीच्या जोरावर काठावर पास करता येत, पण गणितात बरेचदा दांडी उडे… शाळेत ती कायम माझ्या शेजारी बसत असे… आणि गणिताच्या तासात माझ्या वहीतून उत्तरे जशीच्या तशी स्वतःच्या वहीत उतरवून घेई.
हेही वाचा – भाविकांचे श्रद्धास्थान पुण्यातील चतुःश्रृंगी देवस्थान
तिच्या घरापुढे तिने अत्यंत आवडीने झाडे लावली होती. चाफा तर तिच्या विशेष आवडीचा! शेजारील पेरूच्या झाडाला आम्ही झोका टांगला होता. सुट्ट्यांमध्ये चुरमुरे-फुटाणे खात आम्ही तासनतास तिच्या या बागेत रमत असू… मंद मंद झोके घेत गुणगुणणे हा तर तिचा खास छंद!
पुढे काही वर्षांत शाळा संपली आणि आमच्या शैक्षणिक वाटा वेगळ्या झाल्या… मी सायन्स घेतले… आणि वनिता आर्ट्स घेऊन बारावी उत्तीर्ण झाली. रोज होणार्या भेटी आता आठवड्यातून व्हायला लागल्या!
रविवारी दुपारी येताना ती काही ना काही खाऊ स्वतः बनवून आणत असे किंवा आईच्या मागे किचनमध्ये जाऊन तिच्याकडून काही ना काही शिकून घेत असे.
बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी मी दुसर्या गावी गेले. वनिताच्या भावाने मात्र तिचे लग्न जुळवण्याचा घाट घातला. मुळातच सुंदर असणार्या वनिताचे लग्न ठरणे फारसे कठीण नव्हतेच… दोनच महिन्यांत सर्वांच्या अपेक्षेत उतरेल असे छान तालेवार ठिकाण मिळाले… आणि लग्न झालेही…
कॉलेजच्या परीक्षा नेमक्या त्याच तारखांना येत असल्याने मी जाऊ शकले नाही. पण आई मात्र आवर्जून गेली. छानसा आहेर केला. सासरी जाताना वनिता आईच्या गळ्यात पडून खूप रडली.
पुढे सात-आठ महिन्यांनी सुट्टीत मी घरी आले असताना ती देखील माहेरपणाला आली असल्याचे आईने सांगितले. खूप दिवसांत गाठभेट नसल्याने मलाही तिला भेटावेसे वाटतच होते. ‘उद्या जाऊया नक्की तिच्याकडे,’ असे ठरवून रात्री झोपले. सकाळी जागच मुळी वनिताच्या हाकेने आली…
“ए ढमें… किती वेळ लोळत पडलीयस! उठ की आता, केव्हाची आलीय मी… काकी, इतका वेळ कशी झोपू देती हिला? जरा चांगल्या सवयी लाव, नंतर सासरी त्रास व्हायचा नाही तर!… उठ गं लवकर, मी चहा टाकते आपल्या दोघींना…”
नितळ लिंब कांती वनिता आणखीनच उजळ दिसत होती. संसाराच सुख ओसंडून वाहत होत तिच्या चर्येवर…
आई म्हणाली, “बस गं जरा आल्यासारखी… तडतड नको सारखी…. मी करते चहा… आणि आता सांभाळून वागायला हवे हो… धावपळ नकोय!”
आईच्या या बोलण्याचा अर्थ उमजून मी तिच्याकडे पाहिले तर, ती चक्क लाजून ‘हो’ म्हणाली! मी चक्रावूनच गेले. माझे शिक्षणही पुरे झाले नाही अन् हिची मातृत्वाची तयारीही सुरू झाली होती! पुढील अनेक दिवस दुपारी घरी येऊन आईकडून हवे नको ते सारे लाड पुरवून घेत राहिली.
“काकी… मी उद्या निघतेय सासरी! ही बघ साडी, दादाने घेतली… छाने किनई!”
झुळझुळीत गडद हिरव्या रंगाची शिफॉन नेसून समाधानाने मिरवत होती. आईने तिची ओटी भरून, तिची दृष्ट काढली. त्यानंतर काही महिन्यांतच मुलगा झाल्याचे तिने पत्रातून कळविले. ती तिच्या संसारात रमली. हळूहळू पत्रांची संख्याही कमी होत गेली…
हेही वाचा – Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
पुढे माझेही शिक्षण पूर्ण होऊन लग्न झाले… मीही माझ्या दैनंदिनीत रमले. नोकरी… सांसारिक जबाबदार्या… मुले यात गुरफटून गेले. पण तिची आठवण आली की, कायम वाटत असे… तिने थोडे पुढे शिकून किमान स्वतःच्या पायावर उभे राहायला हवे होते. अगदीच सर्वसामान्य असणे तिला का आवडले असेल… किंवा कदाचित तिला त्या निवडीचा हक्कच दिला गेला नसेल म्हणून आहे त्यात तिने सुख मानले का?
आज खूप वर्षांनी तिच्या घराजवळील खुणा पटल्या… वाटले असेल कुणी ओळखीचे आत तर करावी तिची चौकशी! म्हणून फाटक उघडून आत गेले… दारावर टकटक केली… तिच्या भाच्याने दार उघडले. लहानपणी पाहिलेल्या त्याला आता ओळखणे तसे कठीणच गेले असते… पण त्यानेच ओळखले मला!
“अरे, ये ना मीनूताई… कशी आहेस? किती वर्षांनी आलीस… कुठे असतेस?”
तिच्या वहिनीनेही अगदी अगत्याने स्वागत केले. थोडावेळ गप्पा झाल्या, तसा तिचा विषय निघालाच!
“काय म्हणतेय वनिता? कसं काय सुरू आहे सगळं?”
वहिनी म्हणाल्या, “वन्संचा मुलगा इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे आता… खूप हुशार आहे हो पोरगा… कॉलेज संपायच्या आधीच तीन ठिकाणच्या नोकरीच्या ऑफर आहेत त्याला…” हे सगळं सांगताना जणू आपल्या लेकीबाबत सांगावे तसा ऊर भरून अभिमान ओसंडत होता वाहिनीच्या चेहर्यावर!
“…आणि वन्संही काही कमी नाहीत हो कशात… घरची एवढी श्रीमंती… सगळ्यांच्या पोटात शिरून आपलेसे करून राहतात. नगरसेविका म्हणून निवडून आल्यात तीन सालाआधी! आता यंदा आमदारकीला उभ्या करतो, म्हनतात आमचे जावई. बायकोचा लई अभिमान त्यान्ला…”
हे ऐकून मी अवाकच झाले! असाही एक मार्ग असू शकतो, स्वयंसिद्ध होण्याचा… हे आपल्या गावीही नसते. वनिताला कमी लेखणारी मी चुकीचीच होते… पुस्तकातील नाही जमले, पण आयुष्याचे गणित तिने माझी कॉपी न करता अगदी बरोब्बर सोडवले होते!
मलाही तिचा मनोमन अभिमान वाटला. तिचा नंबर तिच्या भाच्याकडून घेऊन मीही परतले… लवकरच पुन्हा संपर्क साधण्यासाठी…



अतिशय सुंदर लेख 🥰🥰
खूपच सुंदर… अगदी खिळवून ठेवणारा लेख आहे 👌🏻💖
खुप छान ,