Saturday, January 24, 2026

banner 468x60

Homeअध्यात्मDnyaneshwari : या स्वधर्मातें अनुष्ठितां, वेचु होईल जीविता...

Dnyaneshwari : या स्वधर्मातें अनुष्ठितां, वेचु होईल जीविता…

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली.

अध्याय तिसरा

या स्वधर्मातें अनुष्ठितां । वेचु होईल जीविता । तोहि निका वर उभयतां । दिसत असे ॥229॥ ऐसें समस्तसुरशिरोमणी । बोलिले जेथ श्रीशार्ङ्गपाणी । तेथ अर्जुन म्हणे विनवणी । असे देवा ॥230॥ हें जें तुम्हीं सांगितलें । तें सकळ कीर म्यां परिसलें । परि आता पुसेन कांहीं आपुलें । अपेक्षित ॥231॥

अर्जुन उवाच : अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः । अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥36॥

तरी देवा हें ऐसें कैसें । जे ज्ञानियांचीही स्थिती भ्रंशे । मार्गु सांडुनि अनारिसे । चालत देखों ॥232॥ सर्वज्ञुही जे होती । हे उपायही जाणती । तेही परधर्में व्यभिचरति । कवणें गुणें ॥233॥ बीजा आणि भुसा । अंधु निवाडु नेणे जैसा । नावेक देखणाही तैसा । बरळे कां पां ॥234॥ जे असता संगु सांडिती । तेचि संसर्गु करिता न धाती । वनवासीही सेविती । जनपदातें ॥235॥ आपण तरी लपती । सर्वस्वें पाप चुकविती । परी बलात्कारे सुइजती । तयाचि माजीं ॥236॥ जयांची जीवें घेती विवसी । तेचि जडोनि ठाके जीवेंसीं । चुकविती ते गिंवसी । तयातेंचि ॥237॥ ऐस बलात्कारु एकु दिसे । तो कवणाचा एथ आग्रहो असे । हें बोलावें हृषिकेशें । पार्थु म्हणे ॥238॥

हेही वाचा – Dnyaneshwari : या शरीरा पराधीना, कां नाना भोगरचना मेळवावी…

अर्थ

(फार काय?) या आपल्या धर्माचे आचरण करीत असता, जरी प्राण खर्ची पडतील, तरीही इहपरलोकाच्या दृष्टीने तो धर्म चांगलाच आहे. ॥229॥ सर्व देवात श्रेष्ठ असलेले श्रीकृष्ण ज्यावेळी असे बोलले, त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा, माझी एक विनंती आहे. ॥230॥ तुम्ही मला जे वर सांगितले, ते खरोखर मी सर्व ऐकले. परंतु आता मला काही पाहिजे आहे, ते मी तुम्हाला विचारतो. ॥231॥

अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, तर मग स्वत:ची इच्छा नसतानाही जणू काय बलात्काराने करावयास लावल्याप्रमाणे हा पुरुष कोणाच्या प्रेरणेने पाप आचरतो? ॥36॥

तर देवा, हे असे कसे होते की, ज्ञानी पुरुषांचीही स्थिती बिघडून, ते मार्ग सोडून भलत्याच वाटेने चालत असल्याचे नजरेस येते. ॥232॥ ज्यांना सर्व कळते आणि ज्यांस हे उपायही ठाऊक असतात, ते देखील परधर्माचे आचरण करून स्वधर्मापासून कशामुळे भ्रष्ट होतात ? ॥233॥ ज्याप्रमाणे आंधळा धान्य आणि कोंडा यांची निवड जाणत नाही, त्याप्रमाणे कधी कधी डोळासालाही कळत नाही, असे का व्हावे ? ॥234॥ जे असलेल्या सर्व संगाचा त्याग करतात, तेच परत कितीही संग केला तरी तृप्त होत नाहीत. सर्वस्व सोडून अरण्यात राहिलेले लोक सुद्धा पुन्हा लोकांत येऊन रहातात. ॥235॥ आपण स्वत: पापांना चुकवण्याकरता लपून बसतात, सर्व प्रकारे पाप चुकवण्याकरिता पयत्न करतात, परंतु पुन्हा बळजबरीने त्यातच कोंबले जातात. ॥236॥ ज्यांचा मनापासून कंटाळा येतो, तेच अंत:करणाला येऊन चिकटतात आणि ज्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा, तेच उलट त्यांनाच घेरतात. ॥237॥ अशी एक बळजबरी दिसून येते; ती तेथे कोणाचा जोरामुळे होते? हे देवांनी मला सांगावे, असे अर्जुन म्हणाला. ॥238॥

क्रमश:

हेही वाचा – Dnyaneshwari : अगा स्वधर्मु हा आपुला, जरि कां कठिणु जाहला…

(साभार – शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर संपादित ‘सार्थ ज्ञानेश्वरी’)


विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!