जपानस्थित ‘एकैशी’ पर्वतराजीत एक सुंदर आणि शांत झेनमठ होता. तिथं फक्त दोघंजणच रहात – एक वयोवृद्ध झेनगुरु युमा आणि त्यांचा एक तरुण उत्साही शिष्य इत्सुकी… शिष्य बुद्धिमान होता पण त्याला वाटायचं, “गुरुजी जे सांगतात तेच जगातलं अंतिम सत्य!”
एकेदिवशी गुरुजींनी शिष्याला विचारलं, “तुला जगातलं सर्वात सुंदर दृश्य कोणतं वाटतं?”
“गुरुजी, सूर्योदय! अंधारातून प्रकाश जन्म घेतो, तेच सर्वात सुंदर!” इत्सुकी लागलीच उत्तरला.
गुरुजी काहीच न बोलता फक्त मंद हसले आणि त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी शिष्याला पुन्हा बोलावलं आणि तोच प्रश्न विचारला, “आता सांग, सर्वात सुंदर दृश्य कोणतं?”
“गुरुजी, उत्तर तर तेच आहे, सूर्योदय…” तो पुन्हा उत्तरला.
हेही वाचा – आस्तिक आणि नास्तिक
“चल, माझ्यासोबत ये,” म्हणत गुरूजी त्याला घेऊन मठामागच्या टेकडीवर गेले; आकाशात सूर्य मावळत होता. लाल, केशरी, जांभळ्या रंगांनी आकाश रंगलेलं होतं. पक्षी घरट्याकडं परतत होते. एक शांत, समाधानकारक वातावरण होतं.
“बघ, हा सूर्यास्त! तुला यात सौंदर्य दिसतं का?” गुरूजींनी इत्सुकीला विचारलं.
तो थोडा गोंधळला. काही क्षण शांत राहून तो म्हणाला, “हो गुरुजी, हेही तितकंच सुंदर आहे.”
“मग सकाळी तू सूर्योदयच अंतिम सत्य का मानलंस?” युमांनी विचारलं; यावर शिष्य चाचरत म्हणाला, “मला वाटलं, तेच योग्य आहे…”
हेही वाचा – मन ‘आता’वर टिकून राहणं गरजेचं!
“बेटा, सत्य एकच असतं, पण त्याकडं पाहण्याचे मार्ग अनेक असतात. सूर्योदय नवीन सुरुवात सांगतो, सूर्यास्त पूर्णत्व आणि शांतता शिकवतो. दोन्ही वेगळे आहेत, पण दोन्ही सुंदर आहेत,” असे सांगून गुरुजी म्हणाले, “जेव्हा तू फक्त तुझा दृष्टिकोन योग्य मानतोस, तेव्हा तू अर्धं जग गमावतोस. असहमती म्हणजे संघर्ष नाही. ती नवीन दृष्टी मिळवण्याची संधी असते.”
इत्सुकीच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा उमटली. त्या दिवशी त्यानं “योग्य असणं” सोडलं आणि “समजून घेणं” सुरू केलं.
थोडक्यात, दोनजण वेगवेगळं पाहतात, कारण वेगवेगळ्या जागेवर ते उभे असतात… असहमती म्हणजे दरी नाही, ती दोन टोकांना जोडणारा ‘पूल’ असू शकते!
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


