आपल्या भारतीय बायका पाककलेपण कलाकुसर जपतात यांचे कौतुक वाटते. चार ते पाच पदर सुटलेला खुसखुशीत गुलाबाच्या फुलासारखा दिसणारा सुंदर चिरोटा पाहुन तो खाण्यासाठी प्रत्येकजण आतूर होतो, हे नक्की! गुलाबाच्या फुलांसारखे हे चिरोटे दिसतात म्हणून या चिरोट्यांना गुलाब चिरोटे हे नाव पडले असावे! गुलाब चिरोटे काय किंवा साधे चिरोटे काय ते करायला कष्ट पडतात; परंतु ते तयार झाले की, त्याची कौतुकाची दाद आपल्याला मिळाल्यावर त्यात किती सुख व समाधान मिळते, हे शब्दात व्यक्त करता येत नाही… म्हणतात ना – “मेहनत का फल मिठा होता है!” चला तर मग या सुंदर आणि चविष्ट चिरोट्यांची रेसिपी जाणून घेऊया!
साहित्य
- मैदा – दोन कप
- बारीक रवा – अर्धा वाटी
- साजूक तूप (मोहनसाठी) – तीन मोठे चमचे
- मीठ – चिमूटभर
- कोमट पाणी – मैदा भिजवण्यासाठी
- तूप किंवा तेल – तळणासाठी (आवश्यकतेनुसार)
साटा (थर पाडण्यासाठी) साहित्य
- साजूक तूप – 4 ते 5 मोठे चमचे (वितळलेले)
- कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा – 3 ते 4 मोठे चमचे
हेही वाचा – Recipe : अतिशय स्वादिष्ट वांगे बुरानी!
पाक बनविण्यासाठी साहित्य
- साखर – दोन कप
- पाणी – एक कप
- वेलची पूड – अर्धा छोटा चमचा
- खाद्य गुलाबी रंग (Pink Food Color) – दोन ते तीन थेंब
- लिंबाचा रस – अर्धा चमचा (पाक कडक होऊ नये म्हणून)
हेही वाचा – Kitchen Tips : नाम…? जिलेबी बाई!
कृती
- एका मोठ्या परातीत मैदा आणि रवा, चिमूटभर मीठ आणि तीन मोठे चमचे कडकडीत साजूक तूप घालून हाताने चांगले चोळून घ्या (मोहन व्यवस्थित लावले चिरोटे खुसखुशीत होतात).
- मैद्याला मोहन कमीत कमी दोन तास आधी लावून घ्यावे. दोन तासांनी कोमट पाणी घालून पुरीच्या कणकेपेक्षा थोडी मऊ असे पीठ मळून घ्या आणि ते मळल्यावर ओल्या कपड्याने झाकून 20 मिनिटे मुरत ठेवा.
- यादरम्यान साटा तयार करून घ्या. त्यासाठी एका वाटीत वितळलेले साजूक तूप आणि कॉर्नफ्लॉवर (किंवा मैदा) एकत्र फेटून घ्या.
- मिश्रण हलके आणि मलईसारखे (Creamy) तयार करा. हा झाला आपला ‘साटा’ तयार!
- त्यानंतर पाक तयार करावा. पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून उकळत ठेवा. साखर विरघळल्यावर पाकाला एक-दोन उकळी येऊ द्या. पाक हलका चिकट (एक तारेचा) करायचा आहे.
- पाकात वेलची पूड, लिंबाचा रस आणि चांगले ढवळून घ्या आणि गॅस बंद करा. (पाक हलका गरम असावा).
- आता मुख्य काम म्हणजे चिरोटे तयार करणे त्याकरिता समजा एकूण 6 किंवा 8 पोळ्या लाटून घेतल्या असतील तर, पहिल्या दोन पोळ्या साठा लावून एकावर एक ठेवा.
- त्यानंतरच्या तिसऱ्या पोळीवर साटा लावल्यावर (किंवा ठराविक अंतरावर असणाऱ्या पोळीवर) गुलाबी रंगाचे द्रव 2-2 थेंब टाकून ते बोटाने किंवा चमच्याने पोळीवर व्यवस्थित पसरवून घ्या.
- पुन्हा साधा साठा लावून काही पोळ्या ठेवा आणि मधे किंवा शेवटच्या पोळीवर साटा लावल्यावर पुन्हा गुलाबी रंगाचे थेंब देऊन तो पसरवून घ्या.
- अशा प्रकारे रंग आणि साठा सर्व पोळ्यांवर समप्रमाणात लागल्यावर, या सर्व पोळ्यांचा एक घट्ट रोल वळून घेऊन त्याचे सम प्रमाणात तुकडे करुन घ्यावेत.
- रोल घट्ट वळल्यामुळे जेव्हा आपण त्याचे गोल तुकडे (लाट्या) कापून चिरोटे लाटतो, तेव्हा आतमध्ये गुलाबी आणि पांढऱ्या रंगांची सुंदर नक्षी उमटते.
- कापलेला प्रत्येक तुकडा थोडासा गोलसर लाटून घ्यावा. ज्या बाजूने थर दिसताहेत ती बाजू वर-खाली येईल अशा पद्धतीने ठेवून हलक्या हाताने लाटण्याने तो वरच्या बाजूने लाटून घ्या (जास्त जोर देऊ नका, नाहीतर थर दाबले जातील).
- अशा प्रकारे सर्व चिरोटे तयार करून घ्यावेत.
- मध्यम आचेवर कढईत तूप किंवा तेल गरम करा. तेल अतिशय कडक नको, मध्यम गरम असावे.
- लाटलेला चिरोटा तेलात सोडा. गॅस मध्यम ते मंद ठेवा. चिरोटा तेलात सोडताच त्याचे सुंदर थर अलगद सुटू लागतात. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित खमंग तळून घ्या.
- तळून काढलेला गरम किंवा कोमट चिरोटा तयार केलेल्या साखरेच्या कोमटसर पाकात टाका.
- दोन्ही बाजूंनी अर्धा ते एक मिनिट पाकात ठेवून, तो बाहेर काढून जाळीवर किंवा ताटात ठेवा जेणेकरून अतिरिक्त पाक निथळून जाईल.
- सुंदर गुलाबी रंगाचे थर असलेले, खमंग आणि रसरशीत गुलाब चिरोटे खाण्यासाठी तयार आहेत!
टीप्स
- गुलाब चिरोटे पाकातले करायचे नसतील तर तळल्यावर त्यावर पिठीसाखर भुरभुरवून तयार करता येतात.


