ऑफिसात लंच अवर संपायला आला होता. मी, देशपांडे, शेट्टी आणि पावसकर गप्पा मारत बसलो होतो. इतक्यात वैदेही हसत हसत आत आली… वैदेही आमची ज्युनियर. अर्थात, वयानेही आणि अनुभवानेही. नेहमी जीन्स, शर्ट्स, टी-शर्ट्स अशा पेहरावात वावरणारी आणि नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारी.
आल्या आल्या तिने पावसकरकडे मोर्चा वळवला…
“पावसकर, तुमची बायको एकदम टिपिकल आहे हो!” ती हसत हसत म्हणाली.
झालं…! आम्ही सर्व स्तब्ध होऊन पावसकरकडे पाहू लागलो.
“टिपिकल म्हणजे नक्की काय गं?” पावसकरने शांतपणे तिला विचारलं.
“बघा ना… आम्ही त्या दिवशी तुमच्या घरी आलो, तेव्हा त्या आपल्यात येऊन बसल्याच नाहीत. सारख्या आत-बाहेर करत होत्या. पाणी, खाणं, सरबत… यातच अडकून बसल्या होत्या. इतक्या छान गप्पा चालल्या होत्या आपल्या; पण त्यांनी त्यात सहभागच घेतला नाही!” ती छद्मीपणे म्हणाली.
“हे बघ, बाळ…” पावसकर हसून म्हणाला. तसं तिने नाक मुरडलं.
“पहिली गोष्ट म्हणजे, तुम्ही माझ्याकडे पहिल्यांदाच आलात. त्यामुळे तुमचं योग्य स्वागत करणं, हे गृहिणी या नात्याने तिचं कर्तव्य ठरतं. तुमचं स्वागत करण्यातच तिचा वेळ गेला. दुसरं म्हणजे, आपल्या चर्चेत तिचा काही संबंध येत नव्हता. त्यामुळे ती आपल्यात बसून कोणाचीही अवघडलेली परिस्थिती होऊ नये, म्हणून आलीच नाही.”
हेही वाचा – वधू-वर सूचक मंडळ
“अहो, पण तिला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवते, तर तेही खूप उशिरा कधीतरी पाहते. चुकून कधीतरी रिप्लाय देते. फेसबुकचा प्रोफाइल फोटो किती दिवसांत बदलला नाही तिने!” वैदेही म्हणाली.
“म्हणजे, ती व्हॉट्सॲप पाहात नाही, फेसबुकवर नाही, म्हणून टिपिकल का? पण ती रोज माहेरी फोन करून म्हाताऱ्या आईची तब्येत विचारते. तिच्याशी प्रेमाने बोलते. ज्यांचा वाढदिवस असेल, त्यांना फोन करून शुभेच्छा देते. आजारी नातेवाईकांना आठवणीने भेटायला जाते. हे सर्व ती घरातली कामं करून करते…” पावसकर हसून म्हणाला.
“बरं, ती कधी जीन्स, टॉप, टी-शर्ट घालत नाही का?” वैदेहीने मूर्खासारखा प्रश्न विचारला.
“घालते ना! पण बऱ्याच वेळा तिला लग्न, पूजा, सण अशा कार्यक्रमांनाच जावं लागतं. तिथे हे कपडे शोभून दिसत नाहीत, म्हणून बहुतेक वेळा साडीच नेसते. आम्ही कधी फिरायला गेलो, की जीन्स घालते. पण मला तिला साडीमध्येच पाहायला आवडतं, म्हणून ती साडी नेसते,” पावसकर अतिशय शांतपणे उत्तर देत होता.
“तिच्या कोणी मैत्रिणी वगैरे नाहीत का? कधी त्यांच्याबरोबर पिकनिक वगैरे…” आता वैदेहीही पेटली होती.
“हो, तेही असतं ना! पण सगळं आवरून. आपल्या मौजेखातर दुसऱ्यांना त्रास होऊ नये, याची ती काळजी घेते… आणि हो, ती घरची कामं करून बाहेरची कामंही करते. त्यात पोस्टाची, बँकेची कामं, इलेक्ट्रिक बिल, आई-बाबांची औषधं, डॉक्टरांची भेट… याही गोष्टी ती करते… आणि हो, ती पदवीधर आहे बरं का!” पावसकर हसून बोलला.
हेही वाचा – एकटं टाकून…
“तसं नाही हो…” वैदेही थोडी चिडून म्हणाली, “पण त्या ॲक्टिव्ह वाटत नाहीत. सतत कामाच्या रगाड्यात अडकलेल्या वाटतात…”
“म्हणजे तिने काय करावं, अशी तुझी अपेक्षा आहे?” पावसकरने विचारलं… क्षणभर थांबून म्हणाला,
“ती कोणाच्या हळदीला किंवा वाढदिवसाला गेली, की आवडत्या गाण्यावर मनमुराद नाचते. आठवड्यातून दोनदा संगीताच्या क्लासला जाते. गावी गेली की, समोरच्या समुद्रात झोकून देते स्वतःला. दोन तास तरी पोहते. जंगलात जाऊन रानमेवा गोळा करते, तर रात्री चिम्बोऱ्या पकडायला जाते… आणि मुंबईत तर कुठेही स्कूटरवरूनच फिरत असते.”
आम्ही मजेत वैदेहीच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. तिचा चेहरा रडवेला झाला होता. शेवटी गप्प बसण्याखेरीज तिच्याकडे पर्याय नव्हताच.
आम्हीही मनोमन पावसकर वहिनींना हात जोडले.


