अध्याय पंधरावा
ऐसें वस्तु जें साचें । तें ऊर्ध्व गा यया तरूचें । तेथ आर घेणें मूळाचें । तें ऐसें असे ॥79॥ तरी माया ऐसी ख्याती । नसतीच यया आथी । कां वांझेची संतती । वानणें जैशी ॥80॥ तैशी सत् ना असत् होये । जे विचाराचें नाम न साहे । ऐसेया परीची आहे । अनादि म्हणती ॥81॥ जे भवद्रुमबीजिका । जे प्रपंचाची भूमिका । विपरीतज्ञानदीपिका । सांचली जे ॥82॥ जे नानाशक्तींची मांदुस । जगदभ्राचें आकाश । जे आकारजाताचें दुस । घडी केलें ॥83॥ ते माया वस्तूचां ठायीं । असे जैसेनि नाहीं । मग वस्तुप्रभाचि पाही । प्रगट होये ॥84॥ जेव्हां आपणया आली निद । करी आपणपें जेवीं मुग्ध । कां काजळी आणी मंद । प्रभा दीपीं ॥85॥ स्वप्नीं प्रियापुढें तरुणांगी । निदेली चेवऊनि वेगीं । आलिंगिलेनिवीण आलिंगी । सकामु करी ॥86॥ तैसी स्वरूपीं जाली माया । आणी स्वाश्रयीं नेणणे धनंजया । तेंचि रुखा यया । मूळ पहिलें ॥87॥ वस्तूसी आपुला जो अबोधु । तो ऊर्ध्वीं आठुळैजे कंदु । वेदांतींही हाचि प्रसिद्धु । बीजभावो ॥88॥ घन अज्ञानसुषुप्ती । तो बीजांकुरभावो म्हणती । येर स्वप्न हन जागृती । हा फळभावो तयाचा ॥89॥ ऐसी यया वेदांतीं । निरूपणभाषाप्रतीती । परी तें असो प्रस्तुतीं । अज्ञान मूळ ॥90॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : पैं बल्वचेहि महामारी, पिंपळा कां वडाचिया परी
अर्थ
अशी जी सत्यवस्तु (ब्रह्मवस्तु), ती या संसारवृक्षाचे ऊर्ध्व आहे. तिच्या ठिकाणी संसारवृक्षाच्या मुळाचे अंकुर निघाले, ते असे आहे. ॥79॥ तर (या संसारवृक्षाच्या मुळाची) माया म्हणून जी प्रसिद्धी आहे, ती नसलेलीच आलेली आहे किंवा ज्याप्रमाणे वांझेच्या संततीचे वर्णन करणे, हे केवळ नुसते शब्द आहेत ॥80॥ त्याप्रमाणे जी (माया) आहे म्हणता येत नाही व नाही म्हणता येत नाही (कारण ‘आहे’ म्हणावे तर विचाराने तिचा बाध होतो बरे नाही म्हणावे, तर जगत्कार्यावरून ती असावी, असे तिचे अनुमान करता येते) जिला विचाराचे नाव सहन होत नाही, अशा प्रकारची ती आहे व तिला अनादि असे म्हणतात. ॥81॥ जी माया संसारवृक्षाचे बीज आहे व जी माया प्रपंचरूप वृक्षाची जमीन आहे व जी माया विपरीत ज्ञानास प्रकाशन करणारी प्रज्वलित मशाल आहे ॥82॥ जी अनेक शक्तींची पेटी आहे, जी माया जगद् रूपी ढग येण्याचे आकाश आहे अथवा जी माया संपूर्ण विश्वाकाररूपी वस्त्राची घडी केलेली आहे. ॥83॥ ती माया ब्रह्माच्या ठिकाणी असून नसल्यासारखी आहे. मग वस्तूचा प्रकाशच (जगद् रूपाने) प्रगट होतो. ॥84॥ जेव्हा आपल्याला झोप येते, तेव्हा ती आपल्याला जशी मूढ करते, अथवा दिव्याच्या ज्योतीच्या ठिकाणी काजळी वाढली असता ती काजळी (जशी) दिव्याचा प्रकाश मंद करते. ॥85॥ स्वप्नात आपल्या नवर्यापुढे निजलेली तरुण स्त्री स्वप्नातच नवर्याला जागे करून त्याला खरे खरे आलिंगन दिल्याशिवाय स्वप्नातच आलिंगन देऊन त्याला सकाम करते ॥86॥ त्याप्रमाणे स्वरूपाच्या ठिकाणी झलेली माया, आपला आश्रय जे स्वरूप, त्याच्या ठिकाणी नेणणे (अज्ञान) आणते, तेच या संसारवृक्षाचे पहिले मूळ आहे. ॥87॥ ब्रह्मवस्तूला जे आपले अज्ञान आहे, तेच या संसारवृक्षाचा, ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी बांधला गेलेला कांदा आहे आणि वेदान्तातही यालाच बीजभाव असे प्रसिद्ध नाव आहे. ॥88॥ पूर्ण अज्ञान अशी जी निद्रावस्था, तिला वस्तूच्या अबोधरूपी बीजाची अंकुरावस्था असे म्हणतात, इतर ज्या दोन जागृति व स्वप्न अशा अवस्था आहेत, त्यास त्या सुषुप्तिरूपी अंकुराची फलावस्था असे म्हणतात. ॥89॥ वेदान्तामध्ये प्रतिपादन करावयाच्या भाषेत, यास वरीलप्रमाणे प्रसिद्धी आहे, परंतु ते राहू दे. या सर्वास कारण अज्ञान आहे. ॥90॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : श्रीकृष्णोक्तिसागरा, हा अगस्तीचि दुसरा


