दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 23 जून 2026; वार : मंगळवार
- भारतीय सौर : 02 आषाढ शके 1948; तिथि : नवमी 16:39 ; नक्षत्र : हस्त 11:53;
- योग : वरियान 10:12 ; करण : तैतिल 29:22;
- सूर्य : मिथुन; चंद्र : कन्या 24:52 ; सूर्योदय : 06:01; सूर्यास्त : 19:18;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2083; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
नाटककार वसंत शांताराम देसाई
टीम अवांतर
नाटककार, कादंबरीकार आणि चरित्रकार वसंत शांताराम देसाई यांचा जन्म 27 डिसेंबर 1904 रोजी झाला. मराठी रंगभूमीचा चालता बोलता कोश म्हणून त्यांची ओळख होती. विधिलिखित हे त्यांचे पहिले नाटक तर, अमृतसिद्धी हे दुसरे नाटक. ही दोन्ही नाटके त्यांनी बालगंधर्वांची मध्यवर्ती भूमिका डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती. याशिवाय राम गणेश गडकरी यांच्या ‘प्रेमसंन्यास’ नाटकासाठी देसाई यांनीच पदे लिहिली होती.
‘उपवनी गात कोकिळा’, ‘सखे मी मुरारी वनी पाहिला’ आणि ‘धन्य जन्म जाहला’ ही पदे देसाई यांनी प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांना लिहून दिली होती. यातील ‘उपवनी गात..’ हे गीत मास्तर दिनकर यांची मदत घेऊन देसाई यांनी संगीतबद्ध केले. या भावगीताने त्या काळात लोकप्रियतेचा उच्चांक प्रस्थापित केला. 1937 मध्ये ओडिअन कंपनीने याची ध्वनिमुद्रिका बाजारात आणली. त्या काळात प्रत्येक भावगीत गायक आपल्या मैफिलीत हे गाणे अवश्य गात असे. हिराबाई बडोदेकर यांनाही त्यांच्या खासगी मैफिलींमध्ये नाट्यगीतांसोबत या गाण्याची हमखास फर्माईश होत असे.
हेही वाचा – संकर्षण… खरी लढाई आता सुरू झाली
मखमलीचा पडदा, नट-नाटक आणि नाटककार, किर्लोस्कर आणि देवल, खाडिलकरांची नाट्यसृष्टी, बालगंधर्व: व्यक्ती आणि कला, रागरंग, विश्रब्ध शारदा – 2 खंड, संगीत विभाग, विधिलिखित, अमृतसिद्धी ही देसाई यांची इतर साहित्य संपदाही त्याकाळी वाचकप्रिय ठरली.
1960 साली बडोदा येथे झालेल्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष देखील होते. 1973-74 मध्ये मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती. 23 जून 1994 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष – रखडलेल्या कामांना आज गती येईल, आधी केलेल्या कष्टाचे फळ दिसू लागेल. व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील. एखाद्या गरजूला मदत केल्याने आदर आणि प्रशंसा मिळेल. आधी हरवलेली एखादी मौल्यवान वस्तू सापडण्याचीही शक्यता आहे. दिवसाच्या शेवटी एखाद्या धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, ज्यामुळे मनाला मोठी शांती मिळेल.
वृषभ – आजचा दिवस तुम्हाला सतर्कता आणि शहाणपणा यांचा धडा शिकवणारा ठरेल. प्रत्येक हसरा चेहरा तुमचा हितचिंतक असेलच असे नाही, म्हणून आपले निर्णय विचारपूर्वक घ्या. लहान यशसुद्धा भविष्यातील मोठ्या यशाचा पाया बनू शकते. भूतकाळातील एखाद्या निर्णयाबद्दल तुम्हाला आता थोडे वाईट वाटू शकते, पण तो अनुभव तुम्हाला अधिक कणखर आणि परिपक्व बनवेल. स्वतःच्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका.
मिथुन – आजचा दिवस नात्यांमध्ये गोडवा आणणारा असेल. तुमच्या वैवाहिक जीवनात काही कारणांनी दुरावा किंवा गैरसमज निर्माण झाला असेल, तर तो दूर होण्याची चिन्हे आहेत. परदेशात शिक्षण घेण्याचे किंवा करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. आज प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात.
कर्क – तुमच्यासाठी नवीन संधी चालून येतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमचे बोलणे आणि वागणूक इतरांना प्रभावित करेल. काहीजण तुमच्या स्पष्टवक्तेपणाचा चुकीचा अर्थ लावू शकतात, पण तुमचा प्रामाणिकपणा हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. दीर्घकाळापासून जपलेली इच्छा आज पूर्ण होईल. त्यामुळे आनंद आणि मानसिक समाधान मिळेल.
सिंह – एका मोठ्या ध्येयाच्या दिशेने भक्कम वाटचाल सुरू होऊ शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. यशामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित समस्यांचे निराकरण होऊ शकते. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण शारीरिक आरोग्य टिकवून ठेवले तरच यशाचा आनंद घेता येतो.
कन्या – आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा सर्वोच्च असेल. नशिबाची साथ असल्यामुळे, वरवर पाहता कठीण वाटणारी कामेसुद्धा सोपी वाटतील. घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला मार्गदर्शनासमान ठरेल. प्रवासादरम्यान किंवा भेटीदरम्यान मिळालेली माहिती भविष्यात खूप फायदेशीर ठरू शकते.
तुळ – जुन्या समस्या हळूहळू दूर होतील. दीर्घकाळ चाललेल्या समस्यांपासून दिलासा मिळेल. कामाच्या ठिकाणी घेतलेल्या एखाद्या निर्णयाबाबत तुम्हाला पुनर्विचार करावा लागू शकतो, परंतु या चर्चेमुळे पुढील मार्ग स्पष्ट होईल. इतरांवर अति अवलंबून राहणे टाळा. स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा. जुने वाद मिटण्याची शक्यता आहे.
वृश्चिक – जीवनात स्थिरता आणि विस्तार येण्याची चिन्हे आहेत. घर, जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित योजना आकार घेऊ शकतात. दूरच्या प्रवासाचाही विचार केला जाऊ शकतो. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे आणि रखडलेल्या प्रकल्पांना नवीन गती मिळेल. निष्ठेने हाती घेतलेल्या कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. लहानसहान गोष्टींवरून भावंडांशी मतभेद होऊ शकतात, परंतु समजूतदारपणाने परिस्थिती निवळेल.
हेही वाचा – चिनारचे उत्साही राहण्याचे रहस्य
धनु – जबाबदाऱ्या वाढतील, पण याच जबाबदाऱ्या तुमच्या यशाच्या पायऱ्या ठरतील. कामाच्या ठिकाणी एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामामुळे प्रभावित होतील. कुटुंबात एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. जोडीदाराचे प्रेम किंवा एखादे खास सरप्राईज तुमचा दिवस अविस्मरणीय बनवू शकते.
मकर – बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्णत्वाकडे जातील. कुटुंबात नवीन सदस्याच्या आगमनाने आनंद मिळू शकतो. पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्यांबाबत सकारात्मक संकेत मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या चुकीच्या निर्णयाच्या आठवणीमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. मात्र तुमची समज आणि संयम हे गुण कोणतीही परिस्थिती हाताळण्यास मदत करतील.
कुंभ – आज तुम्हाला हलके, उत्साही आणि आनंदी वाटेल. कौटुंबिक संबंध अधिक घट्ट होतील, परस्पर सामंजस्य वाढेल. प्रवासाचे किंवा सहलीचे नियोजन केले जाऊ शकते. एखाद्या जुन्या आर्थिक समस्येचे निराकरण झाल्याने दिलासा मिळेल. व्यावसायिक प्रवासाची संधी मिळू शकते. संततीसोबत किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे, परंतु परिस्थिती लवकरच पुन्हा सामान्य होईल.
मीन – आज मनात नवीन कल्पना आणि योजना येऊ शकतात. काहीतरी वेगळे करून पाहण्याची इच्छा तुम्हाला प्रेरणा देईल. अर्थात, नवीन परिचयाच्या लोकांवर लगेच विश्वास ठेवणे टाळा. तुमच्या कामातील प्रयत्नांची दखल घेतली जाईल. इतरांच्या कामात विनाकारण हस्तक्षेप टाळणे उत्तम. तुमचा सकारात्मक विचार आणि सर्जनशील दृष्टीकोन अखेरीस फायदेशीर ठरेल. कोणाला पैसे उधार दिले असतील, तर ते तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे.


