दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 20 जून 2026; वार : शनिवार
- भारतीय सौर : 30 ज्येष्ठ शके 1948; तिथि : षष्ठी 15:46; नक्षत्र : मघा 09:25;
- योग : वज्र 12:47; करण : गरज 27:27;
- सूर्य : मिथुन; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:01; सूर्यास्त : 19:17;
- पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
- अरण्यषष्ठी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली
टीम अवांतर
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1896 रोजी मुंबईत झाला. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी गळ्यावर पिवळा डाग असलेली एक चिमणी पाळण्यासाठी विकत घेतली. पण हा पक्षी नेमक कोणता, हे त्यांना समजत नव्हते. म्हणून, ते मुंबईतील बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या कार्यालयात गेले. तेथे त्यांना या पक्ष्याची सर्व माहिती मिळाली. इथूनच त्यांना पक्षी निरीक्षणाचा छंद लागला.
सलीम अली यांनी सेंट झेव्हियर महाविद्यालयातून प्राणिविज्ञान विषयाची बी.ए. ऑनर्स ही पदवी संपादन केली. पुढे त्यांची बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीत मार्गदर्शक व्याख्याता या पदावर नियुक्ती झाली. दोन वर्षांनी ते पुढील अभ्यासासाठी जर्मनीच्या बर्लिन विद्यापीठात गेले. इथे त्यांना प्रसिद्घ पक्षितज्ज्ञ एर्व्हिन श्ट्रेझमान यांचे मार्गदर्शन मिळाले. 1931 साली ते भारतात परत आले.
हेही वाचा – शर्वाय आणि आराध्याच्या प्रेमात माधवचा अडसर!
सलीम अली यांनी सुगरण (बाया) पक्ष्यावर विशेष अभ्यास केला. यासंदर्भात विविध नोंदी, रेखाटने, छायाचित्रे यांचा वापर करून बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या नियतकालिकात सुगरण पक्ष्यावर लेख प्रसिद्ध केला. याशिवाय जॉन हॅरेल कुक या पक्षीतज्ज्ञाच्या मदतीने त्यांनी हिमालयातील कुमाऊँ तराई भागात ‘फिन्स बाया’ पक्षी पुन्हा शोधून काढले. कच्छमधील फ्लेमिंगो पक्ष्यांच्या वसाहतीचा शोध लावला. लडाखमध्ये काळ्या मानेचा सारस (केन्स) असल्याचे त्यांनी दाखवून दिले. माळढोक या पक्ष्याचे निवासस्थान, त्याच्या सवयी यासंबंधी सविस्तर माहिती त्यांनी मिळविली. स्थलांतरित पक्ष्यांमुळे स्थानिक पक्ष्यांच्या जीवनात कोणते बदल घडून येतात, मानवी हस्तक्षेपामुळे त्यांच्या जीवनात कोणता अडथळा येतो या गोष्टींचा अभ्यास करण्यावर त्यांचा भर होता.
त्यांच्याच आग्रहामुळे शासनाने पर्यावरण हे स्वतंत्र खाते तयार केले. सलीम अली यांनी लिहिलेल्या द बुक ऑफ इंडियन बर्ड्स या ग्रंथाच्या अकरा आवृत्त्या निघाल्या. याशिवाय त्यांनी द बर्ड्स ऑफ कच्छ, इंडियन हिल बर्ड्स, द बर्ड्स ऑफ त्रावणकोर-कोचीन, द बर्ड्स ऑफ सिक्किम, ए फिल्म गाईड टू द बर्ड्स ऑफ द ईस्टर्न हिमालयाज, पिक्टोरियल गाईड टू द बर्ड्स ऑफ इंडिया ॲड सबकाँटिनेंट अशी निरनिराळ्या प्रदेशांतील पक्ष्यांवर पुस्तके लिहिली. त्यांनी आणि स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनमधील सिडनी दिलन रिप्ली यांनी मिळून ‘द हँडबुक ऑफ बर्ड्स ऑफ इंडिया अँड पाकिस्तान’ हा दहा खंडांचा ग्रंथ लिहिला. यात पक्ष्यांचा गट, जात, उपजात, आकार, रंग यांची सचित्र माहिती दिलेली आहे. सलीम अली यांनी लिहिलेले ‘द फॉल ऑफ ए स्पॅरो’ हे आत्मचरित्र पक्षी निरीक्षकांना उपयुक्त आहे.
सलीम अली यांच्या कार्याची दखल घेत एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेचे जॉयगोविंद लॉ सुवर्णपदक, ब्रिटिश ऑर्निथॉलॉजिस्ट्स युनियन संस्थेचे सुवर्णपदक, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमीचे सुंदरलाल व्होरा मेमोरियल मेडल, रशिया ॲकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सचे पावलोव्हस्की सेंचनरी मेमोरियल मेडल, नेदर्लंड्सचा ऑफिसर इन द ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क किताब, इंटरनॅशनल जे. पॉल गेट्टी प्राईझ फॉर वाइल्ड लाइफ कॉन्झर्व्हेशन, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमीचे सी. व्ही. रामन पदक, भारत सरकारचा वाइल्ड लाइफ कॉन्झर्व्हेशनबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार, नेदर्लंड्सचा क्रमांडर इन द ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क किताब, जागतिक वन्य प्राणी निधीतर्फे स्कॉल ऑफ ऑनर, निसर्ग आणि वन्य जीव यांच्याविषयी प्रेम निर्माण केल्याबद्दल दादाभाई नौरोजी पारितोषिक असे अनेक मानसन्मान मिळाले. याशिवाय भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण या नागरी सन्मानाने देखील गौरविले.
बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे ते उपकार्यवाह आणि नंतर अध्यक्षही होते. ते भारतातील नेचर क्लब ऑफ इंडिया चळवळीचे संस्थापक होते. 1984 साली औरंगाबाद येथे झालेल्या पक्षीमित्र संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 20 जून 1987 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशिभविष्य
मेष – कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील, ज्यामुळे कामे पूर्ण करणे सोपे जाईल. बुद्धीचा आणि आत्मविश्वासाचा वापर करून विरोधकांवर मात करणे शक्य होईल. महत्त्वाच्या कामांसाठी इतरांवर जास्त अवलंबून न राहण्याची काळजी घ्या. घरात एखाद्या शुभ किंवा मंगल कार्याची तयारी सुरू होईल.
वृषभ – काहीतरी नवीन सुरू करणे आणि स्वतःला सिद्ध करणे यासाठी दिवस उत्तम आहे. ऊर्जा आणि आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक प्रयत्नात पुढे नेईल. मात्र कोणी सल्ला मागितला नसेल तर तो देण्याचे टाळा, कारण इतर लोक त्याचा चुकीचा अर्थ लावू शकतात. अचानकपणे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये.
मिथुन – चांगल्या कामाची प्रशंसा होऊ शकते. त्यासाठी सन्मानही होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या किरकोळ समस्यांमुळे थोडा त्रास होऊ शकतो, पण लवकरच बरेही वाटेल. व्यवसायात आव्हाने निर्माण होतील, मात्र विवेकबुद्धीने अडचणींवर मात करू शकाल. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी जाणकारांचा सल्ला घेणे उत्तम.
कर्क – प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलणे सध्या आवश्यक आहे. घाईने घेतलेला निर्णय नंतर समस्या निर्माण करू शकतो. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा, अनोळखी लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या सूचनेमुळे कामाला एक नवीन दिशा मिळेल. जोडीदारासोबत किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे, संयम बाळगा.
सिंह – काही जुने कौटुंबिक प्रश्न पुन्हा समोर येऊ शकतात. कामाच्या निमित्ताने दुसऱ्या शहरात प्रवास करावा लागू शकतो. विरोधक तुमच्याविरुद्ध कट रचण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे सावध रहा. मालमत्तेशी संबंधित एखादे प्रकरण कायदेशीर गुंतागुंत निर्माण करू शकते. त्यासाठी धावपळही होण्याची शक्यता आहे.
कन्या – शब्दांची निवड करण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, कारण कुटुंबातील एखाद्या सदस्याचे मन दुखवू शकते. प्रिय व्यक्तीकडून एखादी आनंदाची बातमी मिळेल. खूप काळापासून हरवलेली एखादी आवडती वस्तू सापडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आनंद होईल. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक समस्यांबाबत शिक्षकांचा सल्ला अवश्य घ्यावा.
तुळ – वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. निष्काळजीपणामुळे मोठी अडचण येऊ शकते. आधीपासून असलेल्या शारीरिक समस्या अधिक गंभीर होऊ शकतात. मालमत्ता वाटपाच्या मुद्द्यांमुळे कायदेशीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. इतरांच्या कामात विनाकारण हस्तक्षेप करणे टाळा, अन्यथा अडचणीत येऊ शकता.
वृश्चिक – कामाच्या ठिकाणी गांभीर्य आणि शिस्त राखणे महत्त्वाचे ठरेल. लहानसा निष्काळजीपणा देखील अडचणी वाढवणारा ठरू शकतो. उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन राखणे आवश्यक असेल. शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.
हेही वाचा – नमकीनचं दुकान अन् त्याचा सेठ…
धनु – दिवस सकारात्मक ऊर्जा आणि चांगले परिणाम घेऊन येईल. कामासाठी नवीन उत्साह जाणवेल. नोकरी आणि व्यवसायावर लक्ष केंद्रित करणे सोपे होईल. भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती टाळा, कारण त्यामुळे भविष्यात समस्या निर्माण होऊ शकतात. कुटुंबात एखादा कार्यक्रम किंवा पूजा आयोजित केली जाऊ शकते.
मकर – उत्पन्नाच्या दृष्टीने दिवस संतुलित असेल. अतिरिक्त स्रोताकडून अधिक निधी मिळण्याची शक्यता आहे. अर्थात, खर्चही त्याच गतीने वाढू शकतो, त्यामुळे बजेटबाबत सावधगिरी बाळगा. जोडीदारासोबत असलेली कटुता किंवा दुरावा संपुष्टात येईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळा, आहाराकडे विशेषत्वाने लक्ष देणे आवश्यक आहे.
कुंभ – मालमत्तेसंबंधीच्या व्यवहारांसाठी दिवस चांगला आहे. मात्र कोणीतरी तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकते, म्हणून प्रत्येक दस्तऐवज आणि शब्द काळजीपूर्वक तपासा. कौटुंबिक संबंधांमधील कटुता दूर करण्याची चांगली संधी मिळेल. नोकरी तसेच व्यवसायाबाबत नव्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील.
मीन – सभोवताली आनंद आणि सकारात्मकता असेल. एकापाठोपाठ एक येणाऱ्या चांगल्या बातम्यांमुळे आनंद द्विगुणित होईल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने गैरसमज दूर होतील, नात्यांमध्ये पुन्हा गोडवा येईल. व्यावसायिक भागीदारी देखील अधिक दृढ होऊ शकते. कुणाला आर्थिक मदत करताना पूर्ण विचार करूनच करा.


