भाग – 30
माधवने ऑफिसमधल्या काही कर्मचाऱ्यांना गुपचूप बोलावून घेतलं. माधव ने तत्काळ आपला सुप्त कट रचायला घेतला. आराध्या नवीन असल्यामुळे समारंभात काहीतरी चूक करेलच, याची त्याला खात्री होती. म्हणून त्याने त्या कर्मचाऱ्यांना सांगितलं, “तुम्ही तिला मदत करत असल्याचं दाखवा आणि तिच्याकडून काही चूक घडेल असं बघा…”
माधवने तिच्या नवखेपणाचा वापर करून, तिच्याच विरोधात कट आखला… समारंभ सुरू होण्याअगोदरच समारंभाच्या मुख्य टेबलावर ठेवलेला महत्त्वाच्या फाइल सेट गायब झाल्याचं ध्यानात आलं. ही बातमी ऐकून शर्वाय गंभीर झाला…
“हा फाइलचा सेट कुणी हलवला?” त्याने तिथे उपस्थित असलेल्या ऑफिसमधल्या माणसांना विचारलं.
माधव जणूकाही या गोष्टी करताच तयार होता… “शर्वाय, मला वाटतं, आराध्या तिथे गेली होती.” तो लागोलग म्हणाला.
माधवचं बोलणं ऐकून शर्वायने आराध्याकडे एक कटाक्ष टाकला… ती थोडी गोंधळली…
“मी… मी फक्त सजावट पाहत होते,” तिने चाचरत उत्तर दिलं.
शर्वाय यावर काही बोलणार… तोच एक कर्मचारी धावतच त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, “सर, फाइलचा सेट टेबलाखाली होता. खाली पडल्यामुळे कुणाकडून तरी चुकून ती खाली ढकलली गेली असावी.”
चिडलेला शर्वाय फाइल सापडल्याच कळताच शांत झाला. तो माधवकडे संशयाने पाहू लागला… मृदू आवाजात म्हणाला, “माधव काका, तुझ्यासारख्या अनुभवी व्यक्तीने असे चुकीचे निष्कर्ष काढणं बरं नाही…”
फाइल सापडल्यामुळे माधव त्या कर्मचाऱ्याला मनातच शिव्या देत होता… आपल्याकडून चूक झाली, असं दाखवत तो म्हणाला… “हो, शर्वाय… माफ कर.”
शर्वायने आराध्याला बाजूला बोलावून घेतले. अगदी हळूवार स्वरात तो तिला म्हणाला… “तुला कुणी काहीही बोललं तरी घाबरू नकोस. मला माहीत आहे, तुझ्या मनात कोणताही वाईट हेतू नाही. ना कोणतं छलकपट…”
हेही वाचा – आराध्याविरोधात माधवने कटकारस्थान पुन्हा सुरू केले…
आराध्याही आदराने म्हणाली, “धन्यवाद, सर.”
शर्वायने दाखवलेल्या विश्वासामुळे आराध्याच्या मनात चालू असलेला संघर्ष तत्काळ थांबला…
इथे मात्र माधवचा संताप शिगेला पोहचला होता. तो मनातल्या मनात स्वतःलाच दोष देत होता. आपली एकही योजना सफल का होतं नव्हती, याचं कारण त्याला कळत नव्हतं. तो विचार करत होता…
“हा शर्वाय कायम तिच्या बाजूनेच का उभा राहतोय? काही झालं तरी आता हे नातं मोडायलाच हवं.” तो स्वतःशी निश्चय करतो…
शर्वायला आराध्याविषयी पुन्हा ओढ जाणवते. तिच्या साधेपणात दडलेलं सौंदर्य आणि निरागसता त्याच्या मनाला भुरळ पाडते. आराध्या देखील शर्वायच्या विश्वासामुळे त्याच्या जवळ येऊ लागते.
समारंभ आता उत्कर्षाला पोहोचला होता. शर्वाय आणि आराध्या एकत्रच उभे होते. शर्वाय हलकं स्मित करत आराध्याशी काहीतरी बोलत होता… तेवढ्यात दिवाकर समारंभस्थळी पोहोचले. हॉलमध्ये सभोवार पाहात असताना त्यांची नजर अचानक शर्वाय आणि आराध्या यांच्यावर पडली… गुलाबी साडीतली सोज्ज्वळ आराध्या अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर साधेपणा आणि निरागसता पाहून दिवाकर थोडे स्तब्ध झाले.
दिवाकर मनातच… “ही कोण आहे? शर्वायसोबत अशी कोण उभी आहे?”
पाठून येणाऱ्या सुमित्रा आजी दिवाकरांच्या शेजारी येऊन उभ्या राहतात. सुमित्रा आजी हसून विचारतात… “कसा वाटतोय समारंभ?”
दिवाकर शर्वाय आणि आराध्याकडे पाहात… “आई, ही मुलगी कोण आहे? शर्वायसोबत उभी आहे.”
सुमित्रा आजी आनंदाने म्हणतात, “अरे, तीच तर आराध्या! आपल्या गुरुजींनी जिला आशीर्वाद दिला ती मुलगी!”
आराध्याच्या साधेपणाने आणि शालीन वागण्याने दिवाकर प्रभावित झाले. तिच्या डोळ्यांत निखळपणा आणि बोलण्यात गोडवा दिसत होता.
दिवाकर हसून म्हणाले, “आई, खरंच खूपच सोज्ज्वळ आणि संस्कारी दिसते. शर्वायसोबत चांगलीच जोडी शोभते.”
सुमित्रा आजी गर्वाने… “हो ना! म्हणूनच तर गुरुजींनी तिच्याबद्दल विशेष सांगितलं.”
आराध्या समारंभातल्या इतर लोकांशीही नम्रतेने बोलताना दिसून येत होती. जेव्हा दिवाकर तिच्या समोर आले, तेव्हा तिने आदराने वाकून नमस्कार केला.
दिवाकर… “यशस्वी भव! कशी आहेस बाळ?”
आराध्या नम्रतेने… “ठीक आहे काका. आपल्याला भेटून खूप आनंद झाला.”
दिवाकर तिच्या गोड बोलण्याने सुखावले. शर्वायला हलकेच पाठीवर थाप देत म्हणाले…
“अगदी चांगली सखी मिळवलीस, शर्वाय!”
दूरून हे दृश्य पाहून माधवच्या चेहऱ्यावरचा ताण आणखी वाढला. दिवाकर आराध्याला पसंत करत असल्याचं दिसू लागल्याने त्याच्या योजना अडचणीत आल्यासारख्या वाटू लागल्या…
माधव मनातच… “हे कसं काय झालं? दिवाकरला ती इतकी चांगली कशी वाटली? मला काहीतरी करावंच लागेल.”
समारंभात शर्वाय आराध्याकडेच पाहात होता. तीही लाजून नजर चुकवत पाहात असते. दिवाकरच्या मनात मात्र एक विचार घोळतो — “गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे हीच का शर्वायच्या आयुष्यातील ती योग्य जोडीदार?”
हा विचार मनात येताच… त्यांनी आनंदीकडे म्हणजेच आपल्या पत्नीकडे पाहिलं…
दिवाकर आनंदीला सांगतात — “अगं आनंदी, हिला पाहिलंस का? आपल्या शर्वायसोबत किती गोड दिसते.”
आनंदी मात्र गंभीरतेने… “हो, पण अजून काही ठरवलेलं नाही. माधवने आधीच एक स्थळ सुचवलं आहे… ती मुलगीही चांगली आहे, असं तो सांगत होता…”
शर्वायने आराध्याला थोडा वेळ बाजूला नेलं.. गंभीर पण, हसत तो म्हणाला, “तुला माहितेय का? आज तुला पाहून माझ्या बाबांच्याही चेहऱ्यावर हसू आलंय.”
आराध्या लाजून… “खरंच का?”
शर्वाय हळुूवारपणे म्हणाला, “हो, कारण तू आज खूपच सुंदर दिसतेस…”
आराध्या शर्वायच्या या वाक्याने लाजते. त्याच्या डोळ्यांतला ओलावा आणि आपल्या प्रति असणारा विश्वास तिला सुखावतो.
आनंदीच्या बोलण्यावर दिवाकरना जरा आश्चर्य वाटले… पण या विषयावर बोलण्यावर हे ठिकाण योग्य नव्हते. घरी गेल्यावर आपण बोलू, असं त्यांनी मनातच ठरवले.
समारंभ संपून घरी येताच, त्यांनी आनंदीजवळ माधवने सुचवलेल्या स्थळाबाबतचा विषय काढला…
आनंदी त्यांना सांगू लागली… “काही दिवसांपूर्वीची ही गोष्ट आहे…
0000
मी आपली खोली नीटनेटकी करत होती. माधव घरी आला होता… त्याने हसत विचारले, “आनंदी, एक विचारू का?”
मी गंमतीने म्हणाले, “एवढं गोड बोलतोयस, म्हणजे काहीतरी खास आहे! विचार ना.”
माधवने थोडं गंभीर होत विचारलं, “शर्वायचं लग्न कधी करायचं, हे ठरवलं आहे का तुम्ही दोघांनी?”
मी थोडी खजील होऊन म्हणाले, “अरे माधवदादा, त्याला कामातूनच वेळ मिळत नाही. पण खरं सांगू का? मनात आहे माझ्या… त्याच्या लग्नाचं स्वप्न उराशी बाळगलंय… कधी एकदा आपल्या सुनेला घेऊन घरी येतेय असं वाटतं…”
माधव मग नाटकीपणे म्हणाला, “मग तर बरोबरच आहे! मी काही चांगली स्थळं शोधली आहेत. उच्चशिक्षित, सुशिक्षित आणि संस्कारी मुली आहेत.”
आनंदी तर आश्चर्याने… “खरंच का? कशा आहेत हो त्या मुली?”
माधवने लगेचच आपल्या फोनवर त्या मुलींचे फोटो आणि प्रोफाइल दाखवली. मी बारकाईने फोटो पाहिले आणि छान होते हो, ते फोटो! (आताही तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता…)
माधव उत्साहाने म्हणत होता, “बघ ना! आनंदी, शर्वायसारखा देखणा आणि हुशार मुलगा… त्याला अशीच एखादी सुसंस्कृत मुलगी मिळाली पाहिजे.”
आनंदी ही गंभीर होत, “अगदी खरं आहे. पण शर्वायच्या पसंतीचं काय?”
माधव विश्वासाने म्हणाला… “अरे, तू काळजी करू नकोस. शर्वाय काही नकार देणार नाही. तो कधीच तुझ्या इच्छेविरुद्ध वागणार नाही… आता फक्त शर्वायशी बोलायचं आहे. त्याची पसंती मिळाली की पुढचं काम सोपं!”
आनंदी आनंदाने म्हणाली, “हो, पण आधी शर्वायला विचारलं पाहिजे. मी त्याच्याशी बोलेन.”
0000
“मी माधवला म्हणाले खरी की, मी शर्वायशी बोलेन… पण अजूनपर्यंत मला त्याच्याशी बोलायला जमलं नाही… आणि तुम्हीही टूरवर गेला होता…”
आनंदीला शर्वायच्या लग्नाची कल्पनाच सुखावणारी वाटली. ती कल्पनेत हरवली — आपली सून, घरात लगबग, आनंदी क्षण… तिच्या डोळ्यांत चमक दिसू लागली… दिवाकर ते शांतपणे पाहात होते…
मात्र आनंदीचे समर्थन मिळवणाऱ्या माधवचा आत्मविश्वास वाढला होता. तो स्वतःशीच म्हणाला… “आराध्या आणि शर्वायच्या नात्यात फूट पाडण्यासाठी पहिली चाल यशस्वी ठरतेय. आता फक्त शर्वायचं मन वळवायचं आहे!”
हे सर्व ऐकून काय करतील दिवाकर? शर्वायसमोर ते हा विषय काढतील का?…


