अध्याय चौदावा
जय जय आचार्या । समस्तसुरवर्या । प्रज्ञाप्रभातसूर्या । सुखोदया ॥1॥ जय जय सर्व विसांवया । सोहंभावसुहावया । नाना लोक हेलावया । समुद्रा तूं ॥2॥ आइकें गा आर्तबंधू । निरंतरकारुण्यसिंधू । विशदविद्यावधू- । वल्लभा जी ॥3॥ तू जयांप्रति लपसी । तया जग हें दाविसी । प्रकट तैं करिसी । आघवेंचि तूं ॥4॥ कीं पुढिलाची दृष्टि चोरिजे । हा दृष्टिबंधु निफजे । परी नवल लाघव तुझें । जें आपणपें चोरें ॥5॥ जे तूंचि तूं सर्वा यया । मा कोणा बोधु कोणा माया । ऐसिया आपेंआप लाघविया । नमो तुज ॥6॥ जाणों जगीं आप वोलें । तें तुझिया बोला सुरस जालें । तुझेनि क्षमत्व आलें । पृथ्वियेसी ॥7॥ रविचंद्रादि शुक्ती । उदो करिती त्रिजगतीं । तें तुझिया दीप्ती । तेज तेजां ॥8॥ चळवळिजे अनिळें । तें दैविकेनि जी निजबळें । नभ तुजमाजीं खेळे । लपीथपी ॥9॥ किंबहुना माया असोस । ज्ञान जी तुझेनि डोळस । असो वानणें सायास । श्रुतीसि हे ॥10॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : स्नेहाचिया भरोवरी, आंबुथिला दीपु घे थोरी
अर्थ
अहो सर्व देवांमधे श्रेष्ठ (आत्मविषयक) बुद्धिरूपी प्रात:काळ करणारे सूर्य, सुखाचा उदय करणारे श्रीगुरु, आचार्य आपला जयजयकार असो! ॥1॥ तुम्ही सर्व जगास विश्रांतिस्थान आहात. ‘मी ब्रह्म आहे’ अशा भावनेस सेवन करविणारे (तुम्ही आहात). तुम्ही अनेक लोकरूपी लाटांचे समुद्र आहात. तुमचा जयजयकार असो. ॥2॥ पीडितांना संकटांतून सोडविणारे, अखंड भरलेले दयेचे समुद्र, अध्यात्मविद्यारूप स्त्रीचे प्रियकर असे महाराज, तुम्ही ऐका. ॥3॥ तू ज्यांना लपतोस, त्यांना हे जग दाखवतोस (म्हणजे ज्यांच्यामधे तुझ्यासंबंधाने अज्ञान असते, त्यांना तुझे स्वरूप न दिसता जग दिसते) व तू ज्यांना प्रगट होतोस, त्यावेळी त्यांना सर्व तूच करतोस. (म्हणजे ज्यांच्यामधे तुझ्य़ासंबंधाने ज्ञान असते, त्यांना जग न दिसता, सर्व तूच दिसतोस.) ॥4॥ दुसर्याची दृष्टी बंद करणे, असा नजरबंदीचा खेळ (गारुडी लोकांस) उत्पन्न करता येतो. (पण त्यास आपली स्वत:ची नजरबंदी करता येत नाही). परंतु आपण आपल्याला चोरून राहणे (स्वत:स स्वत: विषय न होणे) ही तुझी अद्भुत जादू आहे. (गुरु (ब्रह्म) हे जगतालाही आपले भान होऊ देत नाहीत व आपण सवत: ज्ञानरूप असल्यामुळे आपले भानही आपल्या ठिकाणी घेत नाहीत). ॥5॥ कारण की, या सर्व जगताला तूच तू आहेस. (म्हणजे या जगात सर्व काही तूच आहेस). असे असूनसुद्धा कोणाच्या ठिकाणी (तुझे) ज्ञान आहे, तर कोणाच्या ठिकाणी (तुझ्य़ासंबंधी) अज्ञान आहे! असा जो तू स्वभावत: जादूगार, त्या तुला नमस्कार असो. ॥6॥ आम्हास असे वाटते की, जगामधे पाणी ओले आहे, ते (पाणी) तुझ्या ओलेपणाने चांगले द्रवयुक्त झाले आहे व पृथ्वीच्या ठिकाणी जी सहनशीलता आहे, ती तुझ्या योगाने आहे. ॥7॥ सूर्य व चंद्र इत्यादिक शिंपले त्रैलोक्यात प्रकाश करतात. या तेजस्वी पदार्थात असणारे जे तेज, ते तेज तुझ्या तेजामुळे आहे. ॥8॥ वायु जी हालचाल करतो, महाराज, ती तुमच्या बळाने करतो व आकाश तुमच्या स्वरूपामधे लपंडाव खेळते. ॥9॥ फार काय सांगावे! महाराज अमर्याद असे जे संपूर्ण अन्यथाज्ञान, त्याचेही प्रकाशक तुम्हीच आहात, हे तुमचे वर्णन राहू द्या (कारण) हे वर्णन करणे श्रुतीलाही कष्टप्रद आहे. ॥10॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : नुसधीचि शांतिकथा, आणिजेल कीर वाक्पथा


