दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 07 जून 2026; वार : रविवार
- भारतीय सौर : 17 ज्येष्ठ शके 1948; तिथि : सप्तमी 27:24; नक्षत्र : धनिष्ठा 07:55;
- योग : वैधृती 10:01; करण : विष्टी 15:07;
- सूर्य : वृषभ; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:13;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128.
भानुसप्तमी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
समीक्षक आणि ललितलेखक डॉ. मं. वि. राजाध्यक्ष
टीम अवांतर
मराठीतील समीक्षक आणि ललितलेखक डॉ. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्म 7 जून 1913 रोजी झाला. राजाध्यक्ष यांचे शालेय शिक्षण दादरच्या छबिलदास हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण एलफिन्स्टन महाविद्यालयात झाले. महाविद्यालयीन जीवनात इंग्रजी साहित्यातील वर्डस्वर्थ पारितोषिक त्यांनी पटकावले होते. 1936 ते 1971 या काळात अहमदाबाद येथील गुजरात कॉलेज, मुंबई येथील इस्माईल युसूफ तसेच एलफिन्स्टन महाविद्यालय आणि कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालय येथे त्यांनी इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते.
हेही वाचा – …अखेर त्या शापित खुर्चीचं रहस्य उलगडलं!
त्यांनी आपल्या लेखनाची सुरुवात ‘अभिरुची’ मासिकातून केली. त्यासाठी त्यांनी ‘पुरुषराज अळुरपांडे’ असे काहीसे विक्षिप्त नाव घेतले होते. नंतर पु. ल. देशपांडे, रा. वा. अलूरकर आणि मं. वि. राजाध्यक्ष हे तीन लेखक ‘पुरुषराज अळुरपांडे’ या टोपणनावाने लिखाण करत असल्याचे उघड झाले. याच मासिकात ‘निषाद’ या टोपणनावाने प्रसिद्ध झालेले ‘वाद-संवाद’ हे त्यांचे सदर खूप गाजले होते. साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील घटना, ढोंगबाजी, गटबाजी, मक्तेदारी, भाषेचा-आशयाचा बोजडपणा, नावीन्याच्या आणि प्रयोगशीलतेच्या नावाखाली चाललेला भोंगळपणा हे या वाद-संवादाचे विषय असत. शमा आणि निषाद म्हणजे अनुक्रमे द. ग. गोडसे आणि मं. वि. राजाध्यक्ष यांनी हे सदर जवळजवळ नऊ वर्षे चालवले.
याशिवाय राजाध्यक्ष यांनी रत्नाकर, संजीवनी, चित्रा, प्रतिभा, ज्योत्स्ना, समीक्षक अशा मासिकांमधून वेगवेगळ्या नावांनी लेख लिहिले. ‘पाच कवी’ हे आधुनिक कवींच्या कवितांचे संपादन केलेले त्यांचे पहिले पुस्तक होय. या पुस्तकात त्यांनी केशवसुत, बालकवी, विनायक, गोविंदाग्रज, ना. वा. टिळक यांच्या काव्यांचा आढावा घेतला.
त्यांची ‘खर्डेघाशी’, ‘आकाशभाषिके’, ‘शालजोडी’, ‘अमलान’, ‘पंचम’, ‘पाक्षिकी’ ही लघुनिबंधांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘शब्दयात्रा’ हे साहित्यविषयक टिपणांचे आणि ‘भाषाविवेक’ ही पुस्तकेही प्रकाशित आहेत. कुसुमावती देशपांडे यांच्या सहकार्याने लिहिलेला ‘हिस्टरी ऑफ मराठी लिटरेचर’ हा ग्रंथही अभ्यासकांसाठी विशेष महत्त्वाचा ठरला आहे.
हेही वाचा – तीन तिगाडा काम बिगाडा…
राजाध्यक्ष यांनी अनेक वर्षे ‘नॅशनल बुक ट्रस्ट’चे विश्वस्त म्हणूनही काम पाहिले होते. ज्ञानपीठ पुरस्कार समिती आणि साहित्य अकादमी (मराठी समिती) यांचेही ते काही काळ सदस्य होते. प्रसिद्ध लेखिका विजया राजाध्यक्ष या त्यांच्या पत्नी होय. 19 एप्रिल 2010 रोजी मं. वि. राजाध्यक्ष यांचे निधन झाले.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


