तीन (3) हा अंक बऱ्याच जणांना अशुभ वाटतो. “तीन तिगाडा काम बिगाडा” अशी आपल्याकडे म्हण पण प्रचलित आहे. पण आता जमाना बदलतो आहे आणि आता 3 हा अंक शुभ मानणाऱ्यांची संख्या जोमाने वाढते आहे. कुणाची जन्म तारीख 3 असते, कुणाचा जन्म महिना 3 असतो, काहींच्या जन्म तारखेच्या सगळ्या अंकांची बेरीज 3 होते, म्हणून ते स्वतःला नशीबवान समजतात! बरेचजण येन-केन प्रकारे 3 अंकाशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतात… जसे गाडीच्या रजिस्ट्रेशन नंबरची बेरीज 3 झाली पाहिजे, मोबाइल नंबरच्या अंकांची बेरीज 3 झाली पाहिजे….
यावरून मला एक जुनी घटना आठवली –
नेहेमीप्रमाणे सकाळी फिरायला बाहेर पडलो. बायको सकाळी योगा क्लासला जाते, त्यामुळे मी नेहमी एकटाच असतो. फिरत फिरत मारुती मंदिराजवळ आलो आणि नेहमीच्या ठिकाणी, म्हणजे चहाच्या टपरी जवळ आज चक्क केव्हा तरी भेटणाऱ्या मॉर्निंग वॉक मैत्रिणी मेघना आणि मनवा यांची भेट झाली. तारीख होती 25/03/2018.
मनवा : काका आज तारखेमधल्या सगळ्या अंकांची बेरीज सिंगल डिजिटमध्ये किती होते?
(मी आधी तोंडी बेरीज करायचा प्रयत्न केला, पण ते जमले नाही. मग आपल्या जुन्या सवयी प्रमाणे हातावरची कांडी मोजून 3 हे उत्तर काढले.)
मी : तीन.
मनवा : काका, उत्तर एकदम बरोबर आहे. इस बात पे, एक एक चाय हो जाये…
मी : मला तोंडी बेरीज करता आली नाही, म्हणून, पेनल्टी म्हणून, आजचा चहा माझ्याकडून!
चहा आला आणि चहा घेता घेता…
मनवा : काका, काही जणांचा डावा मेंदू तल्लख असतो, ते लोक आकडेमोडीत हुशार असतात. तुमचा उजवा मेंदू तल्लख आहे, त्यामुळे तुम्हाला प्रेमाचे गणित चांगले जमते. Nothing wrong in that.
मेघना : काका, 3 या आकड्यावरून तुमच्या डोक्यात लगेच काय विचार येतो?
मी : तीन तिगाडा काम बिगाडा!
मनवा : काका, इथेच आपण नेहमी चूक करतो. Think only positive.
मी : आपण 3 हा नेहमीच अशुभ मानत आलो आहोत. कुठलेही शुभ कार्य आणि 3 यांचे कधीच जमत नसते, अशी आपली परंपराच आहे. एखाद्याला ओवाळायचे असेल आणि तीनच बायका असतील, तर ते अशुभ होते, म्हणून एक स्त्री पुन्हा एकदा ओवाळते. महत्त्वाच्या कामाकरिता कुठे जायचे असेल, आणि तीनजण असतील, तर आपण एक सुपारी बरोबर नेतो.
हेही वाचा – हसत रहा, हसत रहा… निरोगी रहा!
मेघना : काका, आपल्याला यातूनच बाहेर पडायचे आहे. आपण नेहमी तिघे भेटतो. मजा येते ना? कधी वादावादी झाली आहे का? आपल्या गप्पांमध्ये आपण कधी कुणाविषयी वाईट बोलतो का? मग 3 अंक अशुभ कसा काय?
मनवा : काका, एखादे मोठे काम सुरू करायचे असेल… काही छोटी कामे करायची असतील… काही चांगल्या सवयी सुरू करायच्या असतील…. जसे – रोज फिरायला जायचे आहे, रोज व्यायाम करायचा आहे, रोज योग करायचा आहे, रोज घरच्यांबरोबर गप्पा मारायला वेळ काढायचा आहे, रोज या कालावधीत टीव्ही बंद ठेवायचा आहे, जंकफूड खाणे बंद करायचे आहे, वजन कमी करण्याकरता दीक्षित पॅटर्न सुरू करायचा आहे किंवा दिवेकर पॅटर्न सुरू करायचा आहे, असे जे जे मनात असेल, त्यांचा श्री गणेशा करताना आपण ब्रह्मा, विष्णू, महेश, या त्रिमूर्तींना श्रद्धापूर्वक नमस्कार करतो आणि मग कामाला सुरुवात करतो. मनातलं वास्तवात उतरणार हे नक्की. कारण त्यामागे शक्ती असणार आहे, या तीन देवतांची!
मेघना : काका, आपण कायम आनंदी असावं, याकरिता देवाने आपल्या चेहेऱ्यावर तीनच अवयव दिले आहेत, जे आपल्या मर्जीप्रमाणे आपण उघडू शकतो आणि नको तेव्हा बंद ठेऊ शकतो. कान, डोळे आणि तोंड. नाक हे सतत उघडेच ठेवावे लागते. आपल्या चेहऱ्यावरच्या या तीन अवयवांचा आपण योग्य वापर केला, तर आपण कायम आनंदी राहू शकतो. कशी घ्यायची या तिघांची मदत —
तोंड – आवश्यक तेवढेच बोलणे.
डोळे – न पटणार्या घटनांकडे डोळेझाक करणे.
कान – वादविवाद घडवणाऱ्या गोष्टींकडे कानाडोळा करणे.
मी : तीनची ही बाजू आधी कधी माझ्या लक्षातच आली नाही! तुमच्या दोघींच्या नावांमध्ये ‘मेघना’ आणि ‘मनवा’ तीन-तीन अक्षरे आहेत, त्यामुळेच तुम्हाला असे सुंदर विचार सुचत असणार, हे नक्की.
मनवा : काका, तुमच्या ‘सुधीर’ या नावात पण अक्षरे तीनच आहेत, हे विसरलात का?
म्हणजे आपण तिघे आहोत आणि नावातली अक्षरं पण 3 – 3 – 3 आहेत. आपण नेहमी भेटतो मारुती मंदिराजवळ. त्या देवाच्या नावामध्ये अक्षरं पण तीनच आहेत.
मेघना : काका, आमच्या दोघींच्या जन्म तारखेतल्या सगळ्या अंकांची बेरीज 3 होते, म्हणूनच आम्ही एकदम लकी आहोत. काका, तुम्ही पण कायमच लकी असता, तुमच्या जन्म तारखेतल्या अंकांची बेरीज करून सांगा जरा. हमखास तीनच असणार!
मी : नशिबाने मला कायमच साथ दिली आहे, हे नक्की! तुमच्या दोघींशी ओळख झाली, हे लकी असल्यामुळेच. पण त्याचा तीनशी काही संबंध असेल, असा मी विचारच कधी केला नव्हता आणि जन्मतारखेच्या अंकांची बेरीज पण कधी केली नव्हती. बेरीज करून बघतो.
मी अंकांची बेरीज केली, आणि अहो आश्चर्यम! म्हणजे बेरीज तीन आली. मी उडालोच!
मी : नशीब कायम माझ्या पाठीशी का असते, याचे कोडे मला आज तुमच्यामुळे उलगडले. माझी बेरीज पण तीन आहे. माझी जन्म तारीख आहे 20/5/1949.
मनवा आणि मेघना : वाह, क्या बात है. अंदाज एकदम परफेक्ट!
आमच्या गप्पा सुरू असताना बाजूला बसलेले चहा पिणारे पण आपापल्या खुर्च्या आमचे भोवती सरकवून आमच्या ग्रुपमध्ये सहभागी झाले होते.
एक जण : आज 3 या अंकाविषयी खूपच छान माहिती मिळाली. मी तीन या अंकाला अशुभच मानत होतो. यापुढे मात्र आता नाही.
दुसरे एक जण : काका तुमच्या पॅन कार्डमधल्या अंकांची बेरीज पण नक्कीच 3 होत असणार.
हेही वाचा – आनंदी जगायला काय लागतं?
मनवा : काका, सांगा पॅन कार्डमधले आकडे. तेच आकडे, पण थोडे मागे पुढे करून सांगा प्रायव्हसी म्हणून
मी : 1803
मेघना : अंकांची बेरीज 3…
काका 3 या शुभ अंकाशी तुमची खूपच दाट मैत्री दिसतेय
मी : आता बेरीज करण्याकरfता कोणी मला आधार कार्डमधले आकडे विचारू नका. कारण तो नंबर मला पाठ नाही.
एक जण : काका ती पण बेरीज तीनच असणार हे शंभर टक्के नक्की!
दुसरे एक जण : (चहावाल्यांना उद्देशून) दादा, सगळ्यांकरिता अजून अर्धा अर्धा कप चहा येऊ द्या आणि चहाचं बिल माझ्या नावावर मांडा. मजा आली. माझ्या मुलीची जन्मतारीख 3 मार्च आहे.
चहाचे दुकानदार : वा, वा, क्या बात है. मी पण तुमच्या गप्पा ऐकल्या, खूप नवीन विचार समजले. 3 अक्षरी नावे असणाऱ्या, जन्म तारखेच्या अंकांची बेरीज 3 असणाऱ्या, तुम्हा तिघांना आणि सगळ्यांना माझा नमस्कार! आजपासून मी रोज तीन गरीब लोकांना चहा फ्री देणार आहे.
आम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला… आणि एकमेकांना बाय बाय करून आपापल्या मार्गाने निघालो.


