एक गृहस्थ पाठदुखीसाठी ओपीडीत आले होते, खिशावरच्या बिल्ल्यावरनं ते रिक्षाचालक असल्याचं लक्षात आलं, लक्षणजन्य औषधं देत त्यांच्या पाठदुखीचं कारणं “रिक्षाचा पाटा तुटलाय” असं सांगितलं तेव्हा ते प्रारंभी गोंधळले पण नंतर हळूच तत्वत: सहमत झाले…
सामान्यत: ‘पाटा’ हा शब्द रिक्षावाल्यांच्या भाषेत वापरला जातो, पण तांत्रिक भाषेत त्याला लिफ स्प्रिंग म्हणतात; ही रिक्षाच्या मागील बाजूला पातळ, वाकलेली, धातूची अनेक पट्ट्यांची एक व्यवस्था असते. हे पट्टे एकावर एक ठेवून ‘स्प्रिंग पॅक’ बनतं आणि यामुळं रिक्षेला सस्पेन्शन मिळतं म्हणजे धक्के कमी जाणवतात; या स्प्रिंगचं काम रस्त्यावरील खड्डे, उंच-सखल भाग, स्पीडब्रेकर्स यांचा झटका कमी करणं – वाहनाची स्थिरता राखणं – वजन सहन करणं हे असतं.
अनेकदा अतिरिक्त भार, खड्डे असलेले रस्ते, जुन्या रिक्षांचे धातूचे पाते कमकुवत होणे, ग्रीसिंग/ मेंटेनेन्स न करणे यामुळं स्प्रिंग निकामी होते आणि तशीच रिक्षा चालवत राहिल्यास चालकाची स्प्रिंग अर्थात मणका जातो आणि पाठदुखी बळावते.
हेही वाचा – डॉक्टर लिऑन रोशे अन् शापित सुरी!
आता सुधारणा झालीये पण 2000 ते 2010 मधल्या स्प्लेंडर बाईक वापरणाऱ्यातही हार्ड सस्पेन्शनमुळं पाठदुखी असायची… बायकांमध्ये अस्थीरचना, शरीररचना, शरीरात होणारे अतिरिक्त बदल आणि कामाचं स्वरूप यामुळं पाठदुखी समजू शकतो, पण पुरुषांत अनेकदा ते बसतात त्या खुर्चीवर वा वाहनाच्या सीटवर त्यांच्या मणक्याचं आरोग्य अवलंबून असतं.
जोपर्यंत पझल सुटत नाही, तोपर्यंत मी त्या खुर्चीला ‘मिस्ट्री चेअर’ असं संबोधतो. अनेक टेलर मंडळी तर दिवस-दिवसभर स्टूलवर बसून काम करतात, मणक्याला सपोर्टच मिळत नाही तर, फॅशन म्हणून काही ठिकाणी उंच बारचेअर वापरतात पण तीही तासनतास बसावं या लायकीची नसते!
तुमचा ऑफिस जॉब असेल आणि तुम्हालाही पाठदुखी असेल तर आधी तुमच्या खुर्चीचं निरीक्षण करा. हल्ली तर ‘अर्गनॅामिक्स’ अर्थात कामाच्या स्वरुपाचा अभ्यास करूनही बनवलेलं फर्निचर उपलब्ध असतं, ते प्रीफर करा.
खुर्ची से याद आया… 19व्या शतकाचा उत्तरार्ध असावा.
लंडनमधील ‘कॅसलरूम क्लब’ नावाच्या एक प्रतिष्ठित सामाजिक क्लबमध्ये रोज संध्याकाळी उशिरा नामवंत डॉक्टर, संशोधक, वकील, लेखक, कलाकार भेटत असत. या क्लबमध्ये एक खुर्ची होती अतिशय साधी पण जड, जुन्या ओक लाकडाची आर्मचेअर! सुरुवातीला कुणीही तिच्याकडं लक्ष्य दिलं नव्हतं, पण हळूहळू तिच्याभोवती एक विचित्र दंतकथा तयार होऊ लागली.
क्लबमधील सदस्यांना एक गोष्ट जाणवू लागली, ती म्हणजे जो कुणी सातत्यानं या विशिष्ट खुर्चीत बसायचा तो काही दिवसातच आजारी पडायचा! कुणाला अचानक त्वचेवर पुरळ आली, कुणाच्या श्वासात घरघर होई, कुणाला सतत मळमळ, कुणाला तीव्र चिडचिड आणि बेचैनी तर काहींना जोरदार ताप येऊन डोकं भयंकर दुखत असे…
एकदा तर क्लबचा सचिव ज्यांचं टोपणनाव होतं ‘ब्रेव्ह बिस्किट’ तो या खुर्चीवर ‘डंके के चोट पर’ सांगून बसला, पण पठ्ठ्या तीन दिवसांतच कोसळला आणि लोक म्हणू लागले, ”ही खुर्ची शापित आहे!”
शेवटी एका डॉक्टरनं हे सगळं व्यवस्थित तपासायचं ठरवलं आणि खुर्ची क्लबमधून उचलून स्वतःच्या प्रयोगशाळेत नेली. खुर्चीचं लाकूड तर निरुपद्रवी होतं, पण कापडाचा तपास करताच कोडं उलगडलं… कपड्याच्या तंतूंमध्ये अँटिमनी आणि अर्सेनिकच्या संयुगांचं प्रमाण अतिशय जास्त आढळलं.
हेही वाचा – ….अन् मृत्यूची ‘निळी सावली’ मागे हटली!
19व्या शतकात हिरव्या किंवा टर्क्वाईज रंगासाठी ‘पॅरिस ग्रीन’ नावाचं अर्सेनिकयुक्त रंगद्रव्य वापरलं जायचं. क्लबमधील खुर्चीही अशाच चमकदार हिरव्या कापडानं गादीदार बनवलेली होती! हे रंगद्रव्य हलके सूक्ष्म विषारी कण सोडत असे. ते त्वचेवरून, श्वासातून किंवा घामातून शरीरात गेले की त्वचारोग, मळमळ, डोकेदुखी, असह्य थकवा आणि अगदी हृदयावरही परिणाम होत असे. अगदी तीच लक्षणं खुर्चीवर बसणाऱ्या लोकांत दिसत होती.
ही खुर्ची ‘शापित’ नसून शास्त्रीयदृष्ट्या विषारी आहे, हे स्पष्ट झाल्यावर क्लबमध्ये खळबळ उडाली. त्यांनी तत्काळ खुर्ची क्लबमधून काढून टाकली.
कुजबुज बदलली, ”शाप नाहीये ओ, शास्त्र आहे!” पण ही घटना इतकी प्रसिद्ध झाली की तिला The Mystery of the Poisoned Chair म्हणून एक दंतकथेसारखं नाव मिळालं..
ही घटना आजही अभ्यासली जाते कारण यामुळं अनेक गोष्टी उलगडल्या, जसं रंगद्रव्ये धोकेदायक असू शकतात, संयुगामुळं रासायनिक प्रक्रिया होऊन विषबाधा होऊ शकते, पर्यावरणातील सूक्ष्म विषारी पदार्थ आरोग्यावर मोठा प्रभाव करू शकतात आणि तासनतास विशिष्ट जागी बसल्यानंतर त्या जागेचे साधकबाधक परिणाम शरीरावर होतात.. लेट्स चेक युअर चेअर!


