‘आसमान से गिरे और खजूर पे अटके…’ ही म्हण आपण आयुष्यात कधी ना कधी नक्कीच वापरतो किंवा ऐकतो. एका संकटातून सुटून दुसऱ्या संकटात अडकणे, या अर्थाने वापरली जाणारी ही म्हण खजुराच्या झाडाच्या उंचीवरून आणि त्याच्या वैशिष्ट्यावरूनच तयार झाली आहे. परंतु हेच खजूर वाळवंटातील लोकांकरिता जीवनदायी फळ मानले जाते. काल बाजारात फेरफटका मारताना मला एक वेगळेच दृश्य दिसले. एका फळवाल्याकडे सुंदर, टवटवीत लाल रंगाच्या खजुरांचे घोस दिसले. त्याने सांगितले की, हे ताजे खजूर आपल्या शेजारच्या गुजरातमधील ‘कच्छ’ भागातून आले आहेत. सफरचंदासारखे कुरकुरीत आणि जिभेवर रसाळ गोडवा सोडणारे हे लाल खजूर खाताना मनात विचार आला की, आपण जे पेंडखजूर किंवा खारीक खातो, त्याचा इतिहास आणि प्रवास नेमका काय असेल? मग काय… यावर थोडी सविस्तर माहिती गोळा केली, आणि जो रंजक खजिना हाती लागला, तो खरचं खूप छान आहे.
खजूर हे मानवी संस्कृतीतील सर्वात जुन्या फळांपैकी एक आहे. साधारण 5000 ते 7000 वर्षांपूर्वी आजच्या इराक (प्राचीन मेसोपोटेमिया) आणि इराणच्या भागात याची शेती सुरू झाली. रखरखत्या वाळवंटात जिथे पाण्याचा टिपूस नसायचा, तिथे केवळ खजूर आणि उंटाच्या दुधावर तेथील भटकी जमात कित्येक महिने प्रवास करायची. म्हणूनच याला वाळवंटातील ‘जीवनदायिनी’ म्हटले गेले. भारतात मुघलांनी खजूर आणला, हा आपल्याकडील एक मोठा गैरसमज आहे! आपल्या सिंधू संस्कृतीच्या उत्खननातही खजुराच्या बिया सापडल्या आहेत. म्हणजेच, मुघल येण्याच्या हजारो वर्षे आधीपासून भारतीयांना खजूर माहीत होता. पुढे अरब व्यापाऱ्यांमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर, विशेषतः गुजरातच्या कच्छ भागात खजुराची झाडे रुजली.
परंतु, मुघल कालखंडात खजुराला ‘शाही’ प्रतिष्ठा मिळाली. मुघल साम्राज्याचा संस्थापक ‘बाबर’ याला मध्य आशियातील फळांची भारी आवड होती, त्याने विशेष पुरवठा साखळीद्वारे उत्तम खजूर भारतात मागवले होते.
‘हयात बख्श बागे’त खजुराला शाही स्थान
खजुराबाबतचा एक रंजक ऐतिहासिक संदर्भ मुघल बादशहा शाहजहान यांनी बांधलेल्या दिल्लीच्या लाल किल्ल्याशी जोडलेला आहे. किल्ल्याच्या आत एक अत्यंत सुंदर आणि भव्य बाग तयार करण्यात आली होती, जिचे नाव होते ‘हयात बख्श बाग’ म्हणजेच ‘जीवन देणारी बाग’! ऐतिहासिक नोंदींनुसार, या शाही बागेत मध्य आशिया आणि अरब देशांतून खास मागवून आणलेली विविध फळझाडे लावण्यात आली होती, ज्यात खजुराच्या वैशिष्ट्यपूर्ण जातींचाही समावेश होता. मुघल दरबारात या बागेतील ताजी फळे आणि खजुरांचा वापर खास शाही मेजवान्यांसाठी केला जायचा. राजघराण्यातील मुख्य आचारी (बावर्ची) खजुराचा सिरका (व्हिनेगर), चटण्या आणि विविध पक्वान्ने तयार करण्यासाठी या फळांचा वापर मोठ्या प्रमाणावर करत असत; कारण त्या काळात खजूर हे केवळ एक फळ नसून वैभव आणि आरोग्याचे प्रतीक मानले जायचे. त्या काळात आजच्यासारखी साखर नव्हती, त्यामुळे गोडव्याचा राजा ‘खजूर’ हाच होता.
हेही वाचा – गोष्ट एका ‘व्हेज अंडाकरी’ची!
खजुराच्या शेतीबद्दल जगभरात एक अत्यंत प्रसिद्ध इंग्रजी म्हण वापरली जाते –
“The Date Palm likes its head in the fire and its feet in the water.”
म्हणजेच काय तर, खजुराच्या झाडाचे ‘डोके उन्हात आणि पाय पाण्यात’ असावे लागतात! वर कडक वाळवंटी ऊन आणि मुळाशी चांगला ओलावा असणे, हाच या शेतीचा मूळ मंत्र आहे. खजुराची शेती खूप संयमाची आणि रंजक असते :
जमीन आणि हवामान – याला अत्यंत उष्ण आणि कोरडे हवामान लागते. फळे धरण्याच्या काळात पाऊस नसावा. हे झाड अगदी निकृष्ट किंवा खारट जमिनीतही तग धरू शकते.
टिश्यू कल्चर आणि परागीकरण – आजकाल आधुनिक शेतीमध्ये ‘टिश्यू कल्चर’ पद्धतीने तयार केलेली मादी रोपे लावली जातात. खजुरामध्ये नर आणि मादी झाडे वेगवेगळी असल्याने, शेतकऱ्यांना स्वतः हाताने ‘कृत्रिम परागीकरण’ करावे लागते. नर झाडाचे परागकण गोळा करून ते मादी फुलांवर शिंपडावे लागतात, तरच झाडाला फळे धरतात.
आयुष्यमान – झाड लावल्यापासून साधारण 3 ते 4 वर्षांत फळे यायला सुरुवात होते. एकदा लावलेले खजुराचे झाड तब्बल 70 ते 80 वर्षे भरपूर उत्पादन देत राहते! आज आपल्या महाराष्ट्रातील सोलापूर, लातूर आणि विदर्भातील काही उष्ण भागांतही शेतकरी याचे यशस्वी प्रयोग करत आहेत.
सुरुवातीला आपण “आसमान से गिरे और खजूर पे अटके” ही म्हण संकटाच्या अर्थाने पाहिली. पण या म्हणीचा सकारात्मक आणि दुसऱ्या बाजूने विचार केला, तर असे लक्षात येते की, जेव्हा माणूस वाळवंटात भटकत असेल, तेव्हा त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न तर हे खजुराचे झाड सोडवत असेलच; परंतु हे उंच आणि खडबडीत खोड असलेल्या तसेच टोकदार पाने असलेल्या खजुराच्या झाडावरील खजूर तोडताना माणसाचे हालही तितकेच होत असतील नाही का? या म्हणीतील गंमतीचा भाग सोडला तर अगदी संकटकाळात हक्काचा आधार देणे हा खजुराचा मोठा गुणधर्म आहे. निसर्गाने वाळवंटातील अत्यंत कठीण परिस्थितीत मानवी संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी आणि आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी दिलेली ही एक अनमोल भेट आहे.
आयुर्वेदातही याला थकवा घालवणारे आणि ताकद देणारे उत्तम अन्न मानले आहे. हिवाळ्यात किंवा उपवासाला आपण खारीक-खजुराचे लाडू आवडीने खातोच, पण हा शाही इतिहास, त्याची लागवड आणि संकटकाळी धावून येणारा त्याचा गुणधर्म जाणून घेतल्यानंतर आता प्रत्येक खजूर खाताना त्याची चव नक्कीच अधिक ‘शाही’ आणि कृतज्ञतेची वाटेल, नाही का?
हेही वाचा – आठवडी बाजारातील भातकं!
खजुराची माहिती संकलित करत असताना मला यापासून तयार होणाऱ्या दोन सुंदर आणि चविष्ट रेसिपी देखील कळल्या, ज्या मी खाली देते आहे. मुघल बावर्चीखान्यात तयार होणारे हे पदार्थ देखील तितकेच रंजक आहेत… जे शाही पद्धतीने तुमच्या स्वयंपाकघरात विराजमान होऊ शकतात –
पारंपरिक ‘खजुराची राब’ (Dates Syrup) –
ही राब एकदा बनवून ठेवली की, महिनाभर खराब होत नाही आणि साखरेला उत्तम पर्याय ठरते.
कृती
दोन कप बिया काढलेले मऊ खजूर तीन कप कडक गरम पाण्यात 2-3 तास भिजत ठेवा. नंतर त्याच पाण्यासह ते गॅसवर मंद आचेवर शिजवून घ्या आणि शिजताना चांगले मॅश करा. मिश्रण थोडे कोमट झाल्यावर सुती (कॉटनच्या) कपड्यातून त्याचा रस घट्ट पिळून गाळून घ्या. हा रस पुन्हा गॅसवर मंद आचेवर आटवायला ठेवा. रसाचा घट्टपणा मधासारखा झाला की त्यात एक लहान चमचा लिंबाचा रस घाला आणि गॅस बंद करा.
वापर : ही राब तुम्ही खीर, शिरा किंवा रात्रीच्या दुधात साखरेऐवजी वापरू शकता!
मुघलकालीन ‘शाही खजूर हलवा’ (Halwa-e-Khajoor)
कृती
दोन कप बिया काढलेले मऊ काळे खजूर आणि अर्धा लिटर फुल फॅट दूध एका जाड बुडाच्या कढईत एकत्र करा. नंतर दूध आटेपर्यंत ते शिजवून घ्या. दूध आटल्यावर कढईतच खजूर मॅश करा. आता दुसऱ्या कढईत चार-पाच चमचे साजूक तूप गरम करून आधी सुकामेवा तळून बाजूला काढा. त्याच तुपात दुधात शिजवलेले खजुराचे मिश्रण टाकून मंद आचेवर तूप सुटेपर्यंत 15-20 मिनिटे परता. नंतर त्यात अर्धा कप खवा (किंवा दुधाची साय) आणि दोन चमचे दुधात भिजवलेले केशर घालून पाच मिनिटे परता. शेवटी वेलची-जायफळ पूड आणि तळलेला सुकामेवा घालून गरम-गरम सर्व्ह करा!
वाळवंटातून थेट शाही मुघल बावर्चीखान्यापर्यंत पोहचलेल्या खजुराची यात्रा म्हणजे एक समृद्ध इतिहास आहे. साखर नसलेल्या काळातदेखील आपल्या नैसर्गिक गोडव्याने परिपूर्ण असलेल्या या फळाने विपरीत परिस्थितीत अनेक प्रकारच्या प्राण्यांचे सुरक्षाकवच म्हणून रक्षण केले आहे, असं समजल्यास ते वावगे ठरणार नाही.
तुम्हाला खजुराचा हा रंजक प्रवास, या पारंपरिक रेसिपी आणि या म्हणीमागचा नवा दृष्टिकोन कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा!


