भाग – 33
आराध्या गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहात होती, पण तिच्या मनात फक्त शर्वाय होता. त्याने तिच्यावर दाखवलेला विश्वास, त्याची ती सावलीसारखी साथ, आणि नजरेतला निरलस जिव्हाळा… तिचं मन पुन्हा पुन्हा त्याच्याकडे खेचलं जात होतं.
शर्वायसाठी आराध्या आता केवळ एक सहकारी नव्हती, ती त्याच्या आयुष्यात नकळत स्थिरावलेली एक भावना होती — शांत, सच्ची आणि अनमोल.
त्या दोघांनी एकमेकांना न स्पर्श करता, न सांगता, काहीतरी मौल्यवान गवसलं होतं — विश्वासाचं, आपुलकीचं, आणि निर्माण होणाऱ्या प्रेमाचं एक हळवं नातं. त्या मौनातही एक संवाद होता, आणि त्या क्षणात — त्या दोघांनी जगातली सर्वात मौल्यवान गोष्ट शोधून काढली होती… ती म्हणजे प्रेम जे एकमेकांच्या प्रति मनात जपलं होतं…
शर्वाय ऑफिसमध्ये नाही, तो दोन दिवस कॉन्फरन्ससाठी बाहेर गेला आहे, हे सर्वांना माहीत होतं. पण त्याच वेळी, आराध्याही अचानक दोन दिवस सुट्टीवर गेली — कुणालाही न सांगता, कुठे गेली हे स्पष्ट न करता? सुरुवातीला माधवने दुर्लक्ष केलं, पण आता त्याच्या चौकस बुद्धीला हा योगायोग नसावा, असं ठामपणे वाटू लागलं.
“शर्वाय आणि आराध्या… एकत्र?” — हा विचार त्याच्या मनात ठाण मांडून बसला. त्याने ऑफिसच्या एचआर आणि रिसेप्शनकडून आराध्याच्या रजा अर्जाचा तपशील मिळवला. मेलमध्ये फक्त “personal reason” असं नमूद केलं होतं, ज्याने त्याची शंका अधिकच बळावली. त्याच्या मनात आता दोन गोष्टी स्पष्ट होत्या —
एक म्हणजे, शर्वाय आणि आराध्याच्या नात्याचा मागोवा घेणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे, जर हे खरंच असेल, तर आपले बरेच ‘खेळ’ फसणार आहेत.
माधव मनातच म्हणतो, “आता अधिक सावध आणि योजनाबद्धपणे हालचाली करायला हव्यात…”
शिकारी शांत झाला होता — पण त्याचं लक्ष आराध्यावर होतं. माधवच्या मनातली शंका आता खदखदू लागली होती… शर्वाय आणि आराध्या — दोघंही एकाच वेळी ऑफिसच्या बाहेर. तो योगायोग नक्कीच नाही, असं त्याला ठाम वाटत होतं.
हेही वाचा – माधवनं शर्वायसाठी नेमकं कोणतं स्थळ दाखवलं?
त्याने तातडीने आपले काही खबरी कामाला लावले — हॉटेल्स, कॉन्फरन्स व्हेन्यूज, कंपनीच्या वाहनांबाबत विचारणा सुरू केली. पण शर्वाय हुशार होता… त्याला आधीच असा प्रकार होण्याची कल्पना होती. त्याने आराध्या सुट्टीवर असल्याचं रजिस्टरमध्ये जपून नोंदवलं होतं, परंतु ते कंपनीच्या अधिकृत मेलवरूनच. प्रवासात शर्वायने तिच्या नावावर कुठेही थेट बुकिंग केलं नव्हतं. हॉटेल बुकिंग त्याच्या एका विश्वासू माणसाच्या नावावर होतं. गोव्याला वाहनंही थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टवर घेतलेली होती.
दत्ता, शर्वायचा विश्वासू माणूस, सगळं नियंत्रण ठेवून होता. शर्वायने आधीच सांगितलं होतं — “कोणाचंही लक्ष आमच्यावर जाऊ देऊ नकोस. विशेषतः माधवचं!”
माधव दररोजच्या सवयीने ऑफिसमध्ये आराध्याच्या केबिनजवळून जात राहिला. ती नसलेली रिकामी जागा पाहून त्याच्या मनात अजून शंका खोलवर रुजत गेली. त्याने कंपनीच्या सीसीटीव्ही टीमशी संपर्क साधला, शर्वायच्या केबिनजवळचे फूटेज मागवले…पण शर्वायने आधीच ते फूटेज सुरक्षितरीत्या हटवून टाकण्याची व्यवस्था केली होती. शर्वाय जाणून होता की, माधव शंका घेणार आणि त्याला त्याचे उत्तर मिळू न देण्यासाठी प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचललं होतं. तो फक्त आराध्याला सुरक्षित ठेवत नव्हता, तर त्यांच्या नात्याच्या नाजूक अंकुरालाही जपत होता — कोणाच्याही वाईट नजरेपासून दूर!
रात्र होत चाललेली… शहरी गजबजाट मागे पडत होता… गाडीच्या मागच्या सीटवर आराध्या गप्प होती. बाहेर रस्त्यावरून उजळणारी दिव्यांची मालिका, गगनी काळोख आणि आकाशातल्या चांदण्यांमध्ये तिचं मन हरवून गेलं होतं… तिच्या शेजारी शर्वाय शांतपणे बसला होता. पण शांततेच्या आड त्याच्या चेहऱ्यावर एक धूसर काळजी स्पष्ट दिसत होती.
त्याने तिच्या हातावर अलगद हात ठेवला…
“आराध्या…”
तिने वळून त्याच्याकडे पाहिलं…
“आता इथून पुढे तुला सावध राहावं लागेल. माधव काहीही करू शकतो. मी त्याला थोपवलंय आणि यापुढेही राहीन… पण तो थांबेल, अशी खात्री नाही.”
आराध्याच्या डोळ्यांत किंचित भीती डोकावली. पण त्याचवेळी शर्वायच्या हातातल्या उबेने तिला आधार दिला.
“तू माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझं काहीही वाईट होऊ देणार नाही.”
त्याच्या शब्दांतली खात्री तिला स्पष्ट जाणवते.
गाडी थोडी पुढे सरकते… आणि शहराच्या अलीकडे असणाऱ्या एका छोट्या गावाजवळ थांबते. शहरात दोघंही एकत्र जाण्यापेक्षा इथून पुढचा प्रवास तिला शर्वायच्या सांगण्याप्रमाणे करायचा होता… कारण, आता माधवची नजर आराध्याच्या प्रत्येक हालचालीवर असणार होती.
“तुला इथून पुढे माझा माणूस घेऊन जाईल,” शर्वाय म्हणतो.
ती त्याच्याकडे पाहते.
“तुम्ही येणार नाही?” ती नकळत विचारते.
शर्वाय काही क्षण तिच्याकडे फक्त पाहात राहतो…
“माझं मन तुला घेऊन जातंय. पण आता मला मागे राहून तुला सुरक्षित ठेवावं लागणार आहे.”
आराध्या हळूवार हसते…
“माझा विश्वास आहे तुझ्यावर.”
शर्वाय तिच्या कपाळावर ओठांनी एक हलकासा स्पर्श करतो…
आराध्या गाडीतून उतरते… दत्ता तिचं सामान काढून घेतो तितक्यात एक कार काही अंतर राखून थांबते. शर्वाय इच्छा नसतानाही तिला आपल्यापासून दूर जाताना पाहात होता…
तेवढ्यात त्या गाडीतून एक देखणी, उत्साही तरुणी तिच्याकडे येताना दिसली. तिचा विश्वासपूर्ण चालण्याचा अंदाज, हलकासा हसरा चेहरा – काहीतरी वेगळंच बोलत होता.
“आराध्या मॅडम?” तिने हसत विचारलं.
आराध्याने तिच्याकडे पाहिलं…
“हो… तुम्ही?”
त्या तरुणीने पुढे येऊन तिचा हात धरला, “मी नंदिनी. शर्वाय सरांनीच मला इथे पाठवलंय. आता पुढचे काही दिवस आपण दोघी मैत्रिणी म्हणून राहणार आहोत.”
आराध्या थोडी गोंधळ पडली, पण नंदिनीचं ते स्वाभाविक, विश्वासार्ह वागणं आणि तिच्या डोळ्यांतली सच्चाई पाहून तिला लगेच एक आधार मिळाल्यासारखं वाटलं.
“शर्वाय सरांनी मला सांगितलं – तिची काळजी घे,” नंदिनी हसून म्हणाली.
आराध्या आता नंदिनीसोबत दुसऱ्या गाडीत होती. शर्वायने मागे उभं राहून जणू सांगत होता — “मी आहे, कायम.”
त्याचवेळी शर्वायच्या ऑफिसमधल्या एका लॅपटॉप स्क्रीनवर तिचं लोकेशन हळूच अपडेट होत होतं आणि शर्वाय सतत तिच्या हालचाली ट्रॅक करत होता — फक्त संरक्षणासाठी.
दुसऱ्या बाजूला माधव सावध होत चाललेला…
“आराध्या अचानक कुठे गायब झाली? ऑफिसमध्येही नाही, घरीही नाही…”
माधवने त्याच्या माणसाला फोन केला… “शहराच्या बाहेर कोणत्याही बदलावर लक्ष ठेवा. तिचा ठाव लागलाच पाहिजे.”
पण शर्वायची योजना परिपूर्ण होती — आराध्याचं लोकेशन मुद्दाम चुकीच्या दिशेने दाखवण्यात आलं. माधव जितकं अधिक शोधू लागला, तितकं तो अधिक संभ्रमात पडला.
दत्ता शर्वायला रिपोर्ट देतो…
“सर, नंदिनी तिच्या फ्लॅटवर पोहोचली आहे. आराध्या मॅडमना चांगली कंपनी मिळेल आणि माधवला अजूनही काहीच सुगावा लागला नाही.”
शर्वाय लॅपटॉपवर नजर रोखून हसतो,
“Good. नंदिनी एकमेव अशी आहे, जिला आराध्या थोड्या वेळात आपली मानेल… आणि माधवसारख्या माणसाच्या डोळ्यांत धूळ टाकायची सगळ्यात सोपी युक्ती म्हणजे… साधेपणा.”
त्या रात्री नंदिनी आणि आराध्या तिच्या फ्लॅटच्या टेरेसवर चंद्रप्रकाशात गप्पा मारत होत्या.
“तुझं खरं नाव नंदिनीच आहे का?” आराध्याने थोड्या शंकेने विचारलं.
नंदिनी शांतपणे हसली…
“माझं नाव जितकं खोटं वाटतं ना… तितकंच माझं तुमच्यावरचं प्रेम खरं आहे. शर्वाय सरांनी जर सांगितलं नसतं, तरीही मी तुमची मैत्रीणच झाले असते.”
आराध्याला ते शब्द काहीतरी जास्तच जवळचे वाटले. माधव मात्र दुसऱ्या टोकावर अजूनही शोधात होता…
“कोण आहे ही नंदिनी? कुठे राहतेय आणि तिची आराध्याशी मैत्री कधीपासून आहे, याची सगळी माहिती मिळवावी लागेल,” माधव स्वतःशी म्हणतो.
पण शर्वायची माणसं प्रत्येक माहितीच्या आधी एक नकली धागा सोडत होती. ज्याने माधवची शंका खोटी ठरत होती.
हेही वाचा – आराध्याच्या सशक्त अस्तित्वाची साक्ष देणारी कॉन्फरन्स
टेरेसवर गप्पा मारत असतानाच आराध्याला आईची आठवण आली… समोरच्या टेबलवर असलेला मोबाइल उचलून नंदिनीने तिच्याकडे दिला.
“कळव आता घरी… सगळे वाट बघत असतील,” नंदिनी म्हणाली.
आराध्याने हळूच एक स्मित केलं आणि फोन उघडून आईचा नंबर डायल केला. काही क्षणांतच तिचा तो ओळखीचा आवाज तिच्या कानात घुमला…
“आई… पोहोचलोय सुखरूप. आई नंदिनी माझ्यासोबत आहे. फारच चांगली मुलगी आहे ती.”
दुसऱ्या टोकाला काळजीने विचारलं गेलं, “थकली नाहीस ना ग? सगळं ठीक आहे ना?”
“सगळं मस्त आहे, अगदी छान,” आईच्या विचारायचा रोख लक्षात घेऊन ती म्हणाली.
“आई, तिथून शर्वाय सरांचं नावही घेऊ नकोस. आता काही दिवस इथूनच ऑफिसला जाईन. तुम्ही काळजी करू नका.”
तिने फोन ठेवताना नजरेने नंदिनीला पाहिलं, आणि दोघींमध्ये एक समजूतदार हसू उमटलं.
“आईचं काय?” नंदिनीने डोळ्यांनीच खुणावलं.
आराध्याने डोळे मिचकावत उत्तर दिलं, “नेहमीसारखी काळजी, पण आज ती फार समाधानात होती… बहुधा मी शांत आवाजात बोलले म्हणून.”
त्या क्षणी, नंदिनीच्या हातात असलेल्या फोनवर एक मेसेज हलकासा चमकला —
“Safe arrival confirmed. Good work. – S”
क्रमशः
काय असेल माधवची चाल? होईल का आराध्याला काही त्रास?


