अध्याय तेरावा
मदाचा ठावोचि पुसी । जें महामोहातें ग्रासी । नेदी आपपरु ऐसी । भाष उरों ॥171॥ जें संसारातें उन्मूळी । संकल्पपंकु पाखाळी । अनावरातें वेंटाळी । ज्ञेयातें जें ॥172॥ जयाचेनि उजाळें । उघडती बुद्धीचे डोळे । जीवु दोंदावरी लोळे । आनंदाचिया ॥173॥ ऐसें जें ज्ञान । पवित्रैकनिधान । जेथ विटाळलें मन । चोख कीजे ॥174॥ आत्मया जीवबुद्धी । जे लागली होती क्षयव्याधी । ते जयाचिये सन्निधी । निरुजा कीजे ॥175॥ तें अनिरूप कीं निरूपिजे । ऐकतां बुद्धी आणिजे । वांचूनि डोळां देखिजे । ऐसें नाहीं ॥176॥ मग तेचि इये शरीरीं । जैं आपुला प्रभावो करी । तैं इंद्रियांचा व्यापारीं । डोळांहि दिसे ॥177॥ पैं वसंताचें रिगवणें । झाडांचेनि साजेपणें । जाणिजे तेवीं करणें । सांगती ज्ञान ॥178॥ अगा वृक्षासि पाताळीं । जळ सांपडे मुळीं । तें शाखांचिये बाहाळीं । बाहेर दिसे ॥179॥ कां भूमीचें मार्दव । सांगे कोंभाची लवलव । नाना आचारगौरव । सुकुलीनाचें ॥180॥ अथवा संभ्रमाचिया आयती । स्नेहो जैसा ये व्यक्ति । कां दर्शनाचिये प्रशस्तीं । पुण्यपुरुष ॥181॥ नातरी केळीं कापूर जाहला । जेवीं परिमळें जाणों आला । कां भिंगारीं दीपु ठेविला । बाहेरी फांके ॥182॥ तैसें हृदयींचेनि ज्ञानें । जियें देहीं उमटती चिन्हें । तियें सांगों आतां अवधानें । चांगें आइक ॥183॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : रथांगांचा मेळावा, जेवीं रथु म्हणिजे पांडवा
अर्थ
जे ज्ञान उन्मत्तपणाचा ठावठिकाणा नाहीसा करते व जे जबरदस्त भ्रांतीस नाहीसे करते व (जे) हे आपले आणि ते दुसर्याचे ही गोष्टच शिल्लक राहू देत नाही, ॥171॥ अर्जुना, जे ज्ञान संसाराला मुळासकट उपटून टाकते व संकल्परूपी चिखल साफ धुवून टाकते व आकलन करण्यास कठीण अशा परब्रह्माला ते ज्ञान व्यापून टाकते. ॥172॥ ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने बुद्धीची दृष्टी उघडते व जीव आनंदाच्या पोटावर लोळतो ॥173॥ असे जे ज्ञान जे पवित्रपणाचा एकच ठेवा आहे, व जेथे (जे प्राप्त झाले असता) (विषयाने) विटाळलेले मन शुद्ध करता येते ॥174॥ देहबुद्ध्यादि अनात्म पदार्थ मी आहे (म्हणजे मी जीव आहे) असा (भ्रमाचा) क्षयरोग आत्म्याला जो झाला होता, तो रोग ज्याचा सहवास बरा करतो ॥175॥ ते ज्ञान निरूपण करण्यासारखे नाही; तथापि त्याचे निरूपण केले जाईल आणि ते ज्ञानाचे निरूपण ऐकल्यावर (ज्ञान) बुद्धीला जाणता येईल. पण डोळ्यांनी पाहाता येईल असे (ते ज्ञान) नाही. ॥176॥ मग तेच ज्ञान जेव्हा या शरीरात आपली शक्ति प्रगट करते, तेव्हा ते इंद्रियांच्या क्रियेवरून डोळ्यांनाही दिसते. ॥177॥ वसंताचा प्रवेश झाडांच्या टवटवीतपणावरून जाणता येतो, त्याप्रमाणे ज्ञानवान पुरुषांची इंद्रिये त्या पुरुषांत ज्ञानाचे अस्तित्व दाखवतात. ॥178॥ अरे अर्जुना, वृक्षाला जमिनीमधे पाणी सापडते. (ते पाणी जरी डोळ्याला प्रत्यक्ष दिसत नाही) तरी ते बाहेर फांद्यांच्या विस्तारावरून दिसते ॥179॥ अथवा अंकुराचा लुसलुशीतपणा हा जमिनीचा मृदुपणा सांगतो, किंवा आचार हा चांगल्या कुलवानाचा थोरपणा दाखवितो. ॥180॥ अथवा आदरातिथ्याच्या तयारीवरून जसा स्नेह प्रगट होतो, किंवा दर्शनाने होणार्या समाधानावरून पुण्य पुरुष ओळखू येतो. ॥181॥ अथवा केळीत उत्पन्न झालेला कापूर जसा सुवासाने कळण्यात येतो अथवा भिंगाच्या आत ठेवलेला जो दिवा त्याचा प्रकाश जसा भिंगाच्या बाहेर पसरतो ॥182॥ त्याप्रमाणे हृदयांतील ज्ञानानें देहाच्या ठिकाणी जी लक्षणें उमटतात ती आता सांगतो. चांगले लक्ष देऊन ऐक ॥183॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जया ज्ञानालागीं, गगन गिळिताती योगी


