काय म्हणता! कॅडबरीची जाहिरात पुन्हा समोर आली… अरे बापरे, या जाहिरातीने तर बाकीचे गोड पदार्थच मागे टाकले (कुछ मीठा हो जाए)… हो ना! पण काय करणार बाहेर पटकन उपलब्ध असणारे आणि परवडणारे तेच आहे… पण फक्त असे वाटते, यापेक्षा चांगले आणि सर्वच दृष्टीने परवडणारे अनेक पदार्थ आपल्याकडे आहेत.
सगळीकडे एकादशीची तयारी, चातुर्मासाची तयारी सुरू झाली आहे. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. या दिवसांमध्ये वेगवेगळ्या सणांची धामधूम असते. त्यानिमित्त वेगवेगळे पदार्थ आपण करतो. खरंतर, असे म्हटले जाते की, ‘आषाढ तळावा, श्रावण भाजावा, भाद्रपद उकडावा’ यानुसार तर घरांमध्ये आता पदार्थांची रेलचेलच सुरू होते.
हेही वाचा – लक्ष्मी आणि गृहलक्ष्मी
आषाढ म्हटले की, कापण्या, पुऱ्या, भजी यांचा अगदी पहिला नंबर! करायला सोपे. श्रावण तर सगळ्यांचा आवडता महिना. रोज काहीतरी वेगळे केले जातेच. याची यादी पण नक्की करायला हवी. यामध्ये उपवासाचे पदार्थ, प्रत्येक सणांना होणारे पदार्थ, उपवास सोडताना होणारे अनेक निरनिराळे पदार्थ यांचा समावेश होतो. यामध्ये खीर, लाडू, धिरडे, वडे अजून किती तरी पदार्थांचा समावेश होतो.
भाद्रपद तर गणपती बाप्पांच्या आवडत्या मोदकांचा, प्रसादाचा महिना.
त्यानंतर येणार आश्विन… यामध्ये तर दिवाळीच्या पदार्थांची मेजवानीच. आता सगळे पदार्थ बाराही महिने विकत मिळतात म्हणजे पटकन उपलब्ध होतात. पण खरंतर हे पदार्थ घरी करायला पण काही अवघड, वेळखाऊ आहे, असे नाही.
हेही वाचा – आठवणींचे कपाट!
सर्वात महत्त्वाचे त्या त्या वेळेला ते ते पदार्थ खाण्यासाठी काहीतरी शास्त्र पण आहे ना, मग तर हे पदार्थ खायलाच हवे! आपल्याकडे तर अशा वेळेस ‘आपली खाद्यसंस्कृती’ किती मोठी आहे, याची जाणीव होते. ऋतूनुसार फळे, पदार्थ यांचे इतके नियोजन आहे की, जसे काय खावे हे सांगितले जाते, तसे काय खाऊ नये हे पण सांगितले आहे. त्यामुळेच आपल्या आहारात गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट अशा सर्व रसांचा समतोल असतो.
- भाताचे प्रकार
- लाडू प्रकार
- शिऱ्याचे प्रकार
- पोळीचे प्रकार
- वडे प्रकार (थापून केलेले)
- हलव्याचे प्रकार
- वडी प्रकार (ताटात थापून सुरीने कापलेली)
- बर्फीचे प्रकार
अशी यादी खूपच मोठी होते. यामधील अनेक पदार्थ टिकणारेही आहेत. त्यामुळे हे पदार्थच आता करू या आणि सर्वांना खाऊ घालू या.


