दीप अमावस्या, जिवतीची अमावस्या, दिव्याची अवस असा उल्लेख या आषाढ अमावस्येबद्दल लहानपणापासून कानावर पडलेला असताना, गेल्या काही वर्षांमध्ये ‘गटारी अमावस्या’ असा हीन शब्द रूढ होताना दिसतो. खरंतर, लहान मुलांच्या दीर्घायुष्याकरिता, घरातील इडापिडा टळून जाण्याकरिता, मुलांचे आरोग्य सुदृढ राहण्याकरिता आणि घरामध्ये सुखशांती नांदण्याकरिता घरोघरी या अमावस्येला दिवे स्वच्छ घासून-पुसून त्यांचे पूजन केले जायचे आणि देवाकडे प्रार्थना केली जायची.
‘गतहारी’ या शब्दाचा ‘गटारी’ असा अपभ्रंश होऊन तोच सध्या प्रचलित झालेला दिसतो. गतहारी म्हणजे मागे पडलेला आहार! आषाढ महिना हा पावसाच्या सुरुवातीचा महिना. या महिन्यात पाऊस पडून पृथ्वी नवरूप धारण करत असते. निसर्गातील झाडे, पशू-पक्षी या पावसाच्या पाण्याने सचैल स्नान करून शुचिर्भूत होतात. नदी, नाले, ओढे, तलाव ओसंडून वाहू लागतात आणि साचलेली घाण बाहेर फेकून स्वतः स्वच्छ होतात. तेव्हा या काळात आरोग्याच्या दृष्टीने स्वतःला जपणे अतिशय महत्त्वाचे असते.
पूर्वी सर्वांच्या घरात संध्याकाळी देवाजवळ दिवा लावला की ‘शुभंकरोती’ म्हटले जात असे. रामरक्षा, मारुती स्तोत्र रोज न चुकता घरातील आजी आणि आई यांच्यासोबत लहान मुले म्हणत असत. त्यानंतर रात्रीचे जेवण! जेवणातही अगदी साधा वरण-भात-तूप किंवा फोडणीचे वरण, आमटी आणि त्यासोबत तोंडी लावायला तिळाची, शेंगदाण्याची नाहीतर जवसाची किंवा कारळ्याची चटणी. फार फार तर एखादी सुकी भाजी असायची; परंतु बहुधा फोडणीचे वरण, आमटी किंवा पिठले-भात, मुगाची खिचडी असाच बेत असायचा. एखादेवेळी काकडीचे थालीपीठ नाहीतर मुठगोळे असा साधा पण सुग्रास बेत ठरलेला असायचा. खूप साधे, सोपे आणि आनंददायी जगणे होते ते!
हेही वाचा – विदर्भातील आठवीची पूजा!
आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या! दिवा हे प्रकाशाचे द्योतक आहे. दिव्यामुळे अंधार दूर होतो. प्रकाश म्हणजे आनंद, निर्भयता, पारदर्शकता, स्वच्छता आणि प्रामाणिकपणा… देवापुढील सांजवात नेहमीच मनाला शांतता आणि समाधान देते. प्रकाश म्हणजे ज्ञान! सूर्य आणि चंद्र हे निसर्गातील दिवे सतत आपल्याला प्रकाश देऊन आपले जीवन समृद्ध करतात. त्यांच्यामुळे आपले आरोग्य बलवर्धक होते. सुदृढ शरीर ही आपली संपत्तीच नाही का?
घरात, अंगणात दिवा लावला की कीटक, चिलटे, साप, विंचू जवळ येत नाहीत; ती पीडा टळते. संध्याकाळी लक्ष्मी घरात येते, असे आपल्या सर्वांचीच आई-आजी सांगत आली आहे. हिंदू संस्कृतीमध्ये या दिव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही दीप अमावस्या साजरी केली जाते.
मला आठवते, आमच्या लहानपणी जिवतीच्या अमावस्येला पिवळ्या रंगाच्या चमकदार कागदाला मेण लावलेले चित्र घरोघरी देऊन जायला माणूस किंवा बाई यायची. तो कागद घराच्या दारावर लावला जायचा आणि त्या मोबदल्यात दिलेले पैसे, धान्य, तेल किंवा पीठ घेऊन ती माणसे कुटुंबाला तोंड भरून आशीर्वाद देऊन जायची. ही परंपरा आज शहरात राहिली नसली, तरी खेड्यापाड्यांत लोकांनी आजही जपलेली आहे.
आमच्या विदर्भात जिवतीच्या अमावस्येला म्हणजेच दीप अमावस्येला लहान मुलांच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. जिवती पूजनाचा कागद आणून, त्याची पूजा करून त्यासमोर चकचकीत घासून-पुसून ठेवलेल्या दिव्यांमध्ये तिळाचे तेल आणि कापसाची वात लावून ते प्रज्वलित केले जातात. लहान मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि वंशाचे दिवे सुरक्षित राहावेत म्हणून प्रार्थना केली जाते. मुलांना, विशेषतः मुलींना न्हाऊ-माखू घालून, नवीन कपडे परिधान करून नटवले जाते आणि त्यांची दृष्ट काढली जाते. देवासमोर त्या दिवशी कणकेचे दिवे लावण्याचा प्रघात आहे. काही लोक पुरणाचे दिवेही करतात; परंतु शेवयांच्या खिरीला जास्त महत्त्व दिले जाते किंवा कणकेच्या आणि रव्याच्या शिऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो.
आपल्या सर्व सणांमागे एक विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आहे. कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा गैरसमज मनात न बाळगता जर आपले सणवार आपण समजून घेतले, तर संस्कार आणि संस्कृतीचा हा अनमोल ठेवा आपल्याला पुढील पिढीत हस्तांतरित करता येईल! जिथे अंधार फिटतो, तिथे आकाश मोकळे होते. चला तर मग विज्ञान, आपले अध्यात्म आणि सुंदर सणावारांची सांगड घालून एक नीतीसंपन्न आणि संस्कारित पिढी घडवूया!
हेही वाचा – चाळ नावाचे एकत्र कुटुंब!
दीप अमावस्येला ‘गटारी’ न म्हणता ‘जिवतीची अमावस्या’ किंवा ‘दीप अमावस्या’ म्हणून आपले जीवन प्रकाशमान करणाऱ्या त्या तेजोमय दीपकाला आणि अहोरात्र आपल्याला ऊर्जा आणि प्रकाश देणाऱ्या निसर्गातील सूर्यदेवाला मानवंदना देऊया! विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना करूया. तनात, मनात, रानात अंधार साठलेला असतो; जिथे प्रकाश नाही तिथे अंधारच असतो, त्यासाठी मनातील आत्मदीप सतत तेवत राहिला पाहिजे. देहाची तिजोरी करून आपण हा अमूल्य वारसा जपला पाहिजे!
‘जगा, जगवा आणि जगू द्या’ हा मूलमंत्र ध्यानात ठेवायला हवा!
शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते ॥
दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोतीहार ।
दिव्याला पाहून नमस्कार ॥
तिळाचे तेल कापसाची वात, दिवा तेवो मध्यान्ह रात्र ।
घरातली इडापिडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो ।
घरच्या धन्याला उदंड आयुष्य देवो ॥
तुळशी तुळशी एकादशी, राम म्हणे हृषिकेशी ।
तिळा तिळा तांदुळाच्या राशी, आमची ठेव तुम्हापाशी ।
जेव्हा मागू तेव्हा द्या, तुळशी माते नमस्कार ॥
शुभ दीप अमावस्या!


