विदर्भाच्या सणावारातील संस्कृतीचे एक आगळेवेगळे दर्शन नेहमीच स्वतःचे एक वैशिष्ट्य राखून आहे. या विशेष सणांपैकी एक सण म्हणजे दिवाळीच्या आधी आणि दसऱ्यानंतर कराष्टमीला केली जाणारी आठवीची पूजा!
दसरा झाला की, हिवाळ्याची चाहूल लागलेली असते, शेतातील पिकं तरारून वर आलेली असतात, शेतक-यांच्या दृष्टीने हीच खरी त्याची संपत्ती! निसर्गाचे दान त्यांच्या पदरात भरभरून पडले तरच शेतकऱ्याचे कुटुंब सुखासमाधानाने येणारी दिवाळी आनंदाने साजरी करू शकतो. त्या निसर्गाच्या प्रती कृतज्ञता म्हणून तसेच लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा म्हणून विदर्भात ही आठवीची पूजा केली जाते. या पूजेला ‘गजांत लक्ष्मी पूजन’ असेही म्हटले जाते. आठवीच्या पूजेचे सर्व साहित्य बाजारातून आणल्यावर ज्वारीच्या कणसाचा मांडव टाकला जातो. त्याच्या खाली चौरंग ठेवून, त्यावर कपडा टाकून गजलक्ष्मीचा फोटो ठेवतात. समोर कलश ठेवतात. कलशासमोर हळदीचे कमळ रेखून त्यावर माता लक्ष्मीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात.
मातीचा हत्ती विकत आणून किंवा घरीच मातीचा हत्ती तयार करुन हत्तीला सोन्या-मोत्याच्या आभूषणांनी सजवतात. मातीच्या मडक्याची पूजा करतात. त्या हंगामातील नवधान्य पूजेत ठेवतात. प्रसादात ज्वारीची आंबील असते. काहीजण भिंतीवर, कागदावर गजलक्ष्मीचे चित्र रेखाटून त्याची पूजा करतात. प्रामुख्याने विदर्भातच होणारी आठवीची पूजा ही शेतातून घरात आलेल्या नवीन धान्याची पूजा असते. ही धान्यलक्ष्मीची पूजा असते. पूर्वी ज्वारी हे मुख्य पीक होतं. त्याचेच पदार्थ खाण्यात असायचे. त्यामुळे पिढ्यानपिढ्या या पूजेत ज्वारीचंही महत्त्व आलं.
या पूजेला महाभारतातील एका पौराणिक कथेचा संदर्भ आहे. एकदा महर्षि वेदव्यासांचे हस्तिनापुरच्या राजप्रासादात आगमन झाले. श्री व्यासमुनींना माता कुंती आणि गांधारीने राज्यलक्ष्मी, सुख-संपत्ती, पुत्र-पौत्रादी परिवार सुखी राहण्याचे सरळ सोपे व्रत आणि पूजा याविषयी सविनय विचारले. श्री वेदव्यास म्हणाले, “देवी लक्ष्मीचा नित्यनिवास, सुख-समृद्धी वृद्धिंगत होणारे श्री महालक्ष्मीचे व्रत आहे. त्याला गजलक्ष्मी व्रत म्हणतात. प्रतिवर्षी आश्विन कृष्ण अष्टमीला हे व्रत विधिवत करावे. आश्विन कृष्ण अष्टमीला उपवास करून मातीच्या हत्तीवर श्रीमहालक्ष्मीची प्रतिमा स्थापन करून षोडषोपचार पूजा करावी.”
हेही वाचा – तोडली बंधने अन् सुटले भोग…
आश्विन कृष्ण अष्टमीच्या दिवशी आपापल्या महालात गांधारी आणि कुंतीने नगरातील प्रतिष्ठित महिलांना पूजेला बोलावले. माता कुंतीकडे एकही महिला पूजेला आली नाही. शिवाय, गांधीरीने माता कुंतीला बोलावले नाही. माता कुंतीला अपमान झाल्याचे जाणवल्याने ती उदास झाली. सार्या महिला गांधारीकडे जाऊ लागल्या. युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव राजप्रासादात आल्यावर त्यांनी कुंतीला उदास बघून विचारले, “माते अशी उदास का? पूजेची तयारी केली नाही?”
त्यावर कुंती उत्तरली, “गांधारी आज महालक्ष्मीच्या व्रताचा उत्सव आपल्या राजप्रासादात सर्व महिलांना आमंत्रित करून ऐश्वर्यात पार पाडत आहे. गांधारीच्या शंभर पुत्रांनी मातीचा एक विशाल हत्ती तयार केला. सगळ्या महिला त्या मोठ्या हत्तीची पूजा करायला तिकडे जात आहेत.”
कुंतीचे ते बोलणे ऐकून अर्जुन तिला म्हणाला, “माते! तू पूजेची तयारी कर. नगरात दवंडी पिटवून निमंत्रण द्यायला सांग की, कुंती मातेकडे स्वर्गातील ऐरावताची (इंद्रदेवाचे वाहन असलेला पांढरा हत्ती) पूजा आहे.” असे बोलून तो तडक तेथून निघून गेला.
माता कुंतीने नगरात दवंडी पिटवायाला सांगून पूजेची जय्यत तयारी केली. अर्जुनाने स्वर्गातून ऐरावत आणला. माता कुंतीच्या महालात स्वर्गातील इंद्राचा ऐरावत हत्ती आला आणि त्याची पूजा होतेय… हे ऐकून प्रजेतील सर्व लहान-थोर तो ऐरावत पाहायला आला. सगळ्या महिला पूजेकरिता कुंतीकडे आल्या. राज प्रासादात अफाट गर्दी झाली. माता कुंतीने ऐरावताचे पाय धुवून नवीन रेशमी वस्त्र, आभूषण, फुलांचा तसेच सोन्या-मोत्याचा हार, सुग्रास गोड नैवेद्य अर्पण करून साग्रसंगीत पूजा केली. नगरातील महिलांनी महालक्ष्मी पूजन केले. ऐरावताच्या दर्शनाने सारे धन्य धन्य झाले… अशी ही गजलक्ष्मीची पूजा श्री व्यासमुनींनी सांगितल्यानुसार आजही आश्विन कृष्ण अष्टमीला विदर्भामध्ये घरोघरी करतात.
हेही वाचा – …अन् सुलोचना ताईला मोक्ष मिळाला!
प्रत्येक प्रदेशानुसार काही विशिष्ट पूजाअर्चना तसेच निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या काही विशिष्ट परंपरा आहेत आणि त्या संपूर्ण भारतभर काही ना काही निमित्ताने साजऱ्या केल्या जातात. त्यापैकीच विदर्भातील गजांत लक्ष्मी पूजन किंवा कराष्टमीची पूजा ही एक महत्त्वाची पूजा असून यामधून निसर्गाप्रती मानवाची असलेली श्रद्धा तसेच कृतज्ञता व्यक्त होते.


