अजित गोगटे
मागील दोन लेखांमध्ये मी माझा विनातिकीट लोकलचा प्रवास आणि त्याबद्दलची माझी मते लिहिली होती. त्यानंतर माझे स्वत:चे अनुभव सांगितले. कल्याण येथे माझे वास्तव्य आणि नोकरी मुंबईत. सन 1978 ते सन 2020 अशी तब्बल 42 वर्षे मी कल्याण ते बोरिबंदर (आताचे सीएसएमटी) अशी दैनंदिन ये-जा मध्य रेल्वेच्या लोकलने केली. मध्यंतरीची सलग 12 वर्षे मी तिकीट किंवा मासिक / त्रैमासिक पास न काढता हा लोकलचा प्रवास केला. स्वत:चा महसूल बुडू नये, याची रेल्वेला आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनाच जर फिकीर नसेल तर नागरिकांकडून तरी प्रामाणिकपणाची अपेक्षा कशी आणि किती ठेवता येईल?
रेल्वेला स्वत:च्या महसूलाची चिंता नाही, या माझ्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ मी माझे स्वत:चे काही अनुभव मागील लेखात दिले होते. आता दोन किस्से माझ्याशी संबंधित नसले तरी, माझ्या समक्ष घडलेल्या घटनांचे आहेत.
साहेब, शांतूच्या लग्नाला यायचं हं!
एक दिवस नाशिकला जाण्यासाठी कल्याण स्टेशनच्या तेव्हाच्या प्लॅटफॉर्म क्र. 1वर पहाटेच्या पहिल्या कसारा लोकलची वाट पाहात उभा होतो. आमची लोकल येण्यापूर्वी बाजूच्या प्लॅटफॉर्म क्र. 2वर कर्जतहून आलेली व्हीटीकडे (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) जाणारी पहिली लोकल आली. एवढया पहाटेही फलाटावर जिन्यापाशी एक ‘टीसी’ उभा होता. आलेल्या लोकलच्या एका डब्यातून वारली / कातकरी आदिवासींचा एक 15-20 जणांचा समूह खाली उतरला. त्यांच्यात सर्वात पुढे डोक्याला बाशिंग बांधलेला नवरदेव, त्याच्यासोबत दोन करवल्या आणि इतर वर्हाडी मंडळी आणि सर्वात शेवटी पांढरी टोपी घातलेला एक वृद्ध आणि त्याच्यासोबत हातात मेणकापडाची पिशवी घेतलेला एक 12-14 वर्षांचा मुलगा होता.
हेही वाचा – कल्याण ते मुंबई : विनातिकीट रेल्वे प्रवास – एक चिंतन
ही मंडळी जिन्यापाशी आल्यावर ‘टीसी’ने त्यांना तिकीट विचारले. पुढच्या मंडळींनी हाताने मागे खूण केली आणि ते जिना चढून वर गेले. कदाचित, सर्वात मागून येणार्या वृद्धाकडे सर्वांची तिकिटे असतील असा विचार करून ‘टीसी’ने पुढच्या मंडळींना जाऊ दिले. तो वृद्ध जवळ आल्यावर…
टीसी : आजोबा, सर्वांची तिकिटे आहेत ना तुमच्याजवळ, ती दाखवा.
आजोबा : बाल्या, साहेबांना तिकटं दाखव की रं!
आजोबांच्या सोबत असलेल्या बाल्याने हातातील पिशवीतून हार काढून साहेबांच्या गळ्यात घातला आणि हातात नारळ दिला!
आजोबा : साहेब, आमच्या शांतूचं लगिन हाय सांजच्याला. नक्की यायचं हं!
टीसी अवाक होऊन पाहात राहिला आणि त्याने त्या आजोबांना तसेच त्यांच्या सोबतच्या बाल्यालाही जाऊ दिले.
नोकरी धोक्यात येण्याची भीती
एक दिवस शेवटच्या कर्जत लोकलने रात्री 2.20 वाजता कल्याणला पोहोचलो. आमची लोकल प्लॅटफॉर्म क्र. 4वर आली होती. बाजूच्या फलाटावर बर्याच उशिराने आलेली सोलापूर- मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस येऊन नुकतीच थांबली होती. लोकलमधून उतरलेले तुरळक प्रवासी आणि सिद्धेश्वरमधून आलेले प्रवासी जिना चढून वर जाऊ लागले. जिन्यात माझ्यापुढे सिद्धेश्वरमधून उतरलेले एक मध्यमवयीन जोडपे होते. त्यातील पुरुष सहा फूट उंचीचा, धिप्पाड आणि एखादा राजकीय नेता वाटावा असा पांढरा झब्बा, लेंगा आणि टोपी घातलेला होता. त्याच्या दोन हातांच्या आठ बोटांमध्ये खड्यांच्या अंगठ्या होत्या, त्याची पत्नीही उंचीपुरी, नऊवारी साडी नेसलेली आणि सोन्याने नखशिखांत मढलेली होती.
एवढ्या अपरात्रीही जिन्याच्या वर एक ‘टीसी’ उभा होता. जिना चढून वर जाताच माझ्या पुढे असलेल्या या जोडप्याला ‘टीसी’ने तिकीट विचारले. आता काय होतंय, हे पाहण्यासाठी मी दिसेल आणि ऐकूही येईल एवढ्या अंतरावर बाजूला उभा राहिलो.
हेही वाचा – विनातिकीट रेल्वे प्रवास : काही अनुभव
टीसी आणि या जोडप्यामध्ये त्यावेळी झालेला संवाद मोठा मजेशीर होता :
टीसी : कुठून आलात?
जोडप्यातील पुरुष : सोलापूरहून.
टीसी : तिकीट / रिझर्व्हेशन जे काही असेल ते दाखवा.
पुरुष : तिकीट, रिझर्व्हेशन काय बी नाय.
टीसी : बाई, तुमचं तिकीट असेल तर दाखवा.
बाई : माझ्याकडे बी नाय.
टीसीने सोलापूरपासूनचे दोघांचे भाडे आणि दंड यांचा हिशेब करून तेवढी रक्कम त्या पुरुषाकडे मागितली.
पुरुष : माझ्याकडे एक दमडी बी नाय.
टीसी : बाई, तुमच्याकडे पैसे असतील तर बघा.
बाई : माझ्याकडे काय नाय. पैशाचे सर्व यवहार धनी बघत्यात!
यानंतर टीसी आणि या जोडप्यामध्ये आणखी काही संभाषण झाले. शेवटी टीसीने त्या दोघांना कोणताही दंड न घेता जाऊ दिले. ते जोडपे निघून गेल्यावर मी टीसीकडे गेलो आणि त्याने दंड न वसूल करण्याचे कारण विचारले. त्याने दिलेले उत्तर थक्क करणारे होते.
टीसी म्हणाला, दंड भरायला पैसे नाहीत म्हटल्यावर त्या दोघांना उद्या सकाळी कोर्टात उभे करेपर्यंत कोठडीत ठेवणे भाग होते. कल्याणच्या रेल्वे पोलिसांच्या कोठडीत फार तर 10 लोक मावू शकतात. दिवसभरात पकडलेले 20हून अधिक लोक आधीच कोठडीत आहेत. त्यात आणखी या दोघांना कुठे ठेवणार? शिवाय बायकांसाठी वेगळी कोठडी नाही. अशा उफाड्याच्या आणि सोन्याने मढलेल्या बाईला तेथे नेऊन ठेवली आणि उद्या तिनेच कोर्टात माझ्याविरुद्ध अतिप्रसंग केल्याची बोंब मारली तर, माझी 26 वर्षांची नोकरी धोक्यात येईल. रेल्वेला मिळणारे पैसे गेले गाढवाच्या xxx. नोकरी गेली तर मी भिकेला लागेन!
यानंतर एकदा मध्य रेल्वेचे त्यावेळचे मुख्य महाव्यवस्थापक राज कुमार जैन यांच्या पत्रकार परिषदेला गेलो. हे सर्व प्रसंग आणि घटना मनात होत्याच. जेवणाच्या वेळी गप्पा मारताना हे सर्व जैन यांना सविस्तर सांगितले. ऐकून तेही अचंबित झाले आणि याबाबतीत काहीही करण्यात त्यांनी सपशेल हतबलता व्यक्त केली!
(समाप्त)