पल्लवी खरोसे आंबेकर
भाग – 14
राहुल अग्रवाल विभाकडे पार्थ आणि शार्वीच्या लग्नाचा विषय काढतो. “माझी मुलगी शार्वी पार्थच्याच प्रेमात पडली. जसं मी आणि राजेशन ठरवलं होतं की, भविष्यात आम्ही एकमेकांचे व्याही बनू अगदी तसंच होत आहे सगळं!” असं तो सांगतो. पण विभा त्याला नकार देते.
“पार्थ दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो आणि लवकरच त्या दोघांचं लग्न होणार आहे, त्यामुळे तुझ्या मुलीला पार्थला विसरून जायला सांग आणि तू तिच्यासाठी तुमच्या बरोबरीचा आणि तुझ्या मुलीला शोभेल असा मुलगा शोध आणि तिचं लग्न लावून दे,” असे त्या निर्विकार चेहऱ्याने म्हणाल्या.
त्याने खूप वेळ थांबून विभाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शेवटी निराश मनाने तो तिथून निघून गेला.
घरी आलेल्या राहुल अग्रवालला उदास बघून शर्वरीने त्याचं कारण विचारलं, तसं त्याने, त्याचं आणि विभाचं सगळं बोलणं तिला सांगितलं. सगळं ठीक आहे, पण तो दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो हे ऐकून तिला थोडं वाईट वाटलं.
त्या दोघांचं सगळं बोलण शार्वीने ऐकलं होत. आपल्या डॅडला आपल्यासाठी त्या लोकांपुढे हात पसरावे लागले, हे ऐकून तिला खूप वाईट वाटलं; कारण तिच्यासाठी तिचा डॅड तिचा हीरो होता. आता तिला स्वतःचाच राग येत होता की, खरंच तिने एका चुकीच्या मुलावर प्रेम केलं!
हेही वाचा – राजेशच्या भावांचे नेमके प्रपोजल काय?
“माझ्या डॅडच्या अपमानासाठी तर मी तुम्हाला सोडणार नाही…” ती स्वत:च्या रूममध्ये फेऱ्या मारत स्वतःशीच बडबडत होती.
थोड्यावेळाने राहुल शर्वीकडे गेला आणि तिला त्याने अगदी व्यवस्थित समजावून सांगितलं. तिनेही शहाण्या बाळासारखं त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि पार्थला विसरून जाण्याचं प्रॉमिस केलं. तिने त्यांचं म्हणणं मान्य केलं म्हणून शर्वरी आणि राहुल दोघेही खूप खूश झाले…
0000
गरिमा आणि पार्थने नोकरीचा राजीनामा दिला आणि ते दुसरीकडे जॉइन झाले. यावर शार्वीने काहीच आक्षेप घेतला नाही. ती आता सगळ्यांसोबत नॉर्मल वागत होती.
लवकरच गरिमा आणि पार्थच्या लग्नाचा मुहूर्त ठरवण्यात आला. ते दोघेही खूप खूश होते. विभा, पार्थ आणि गरिमा फुल्ल शॉपिंग करत होते. गरिमाने सगळं काही विभावर सोपवलं होतं. विभाही तिच्या आईची हर एक कमी भरून काढत होती. नेहमी तिच्यासोबत रहात होती. अगदी स्वतःच्या मुलीसारखं काय हवं नको ते बघत होती. सगळा कसा आनंदी आनंद होता.
आज त्यांचं लग्न होतं. गरिमा नवरीच्या वेशामध्ये खूप सुंदर दिसत होती. लाल रंगाचा शालू, त्यावर मॅचिंग ज्वेलरी, नाकात नथ, केसांचा अंबाडा आणि त्यावर माळलेले गजरे, हातात हिरवा चुडा मराठमोळ्या शृंगारात खूप सुंदर दिसत होती ती!
तोही काही कमी दिसत नव्हता. त्यानेही मरून कलरची शेरवानी घातली होती आणि त्यावर मोत्याचा हार. तोही तिला टशन देत होता. दोघेही एकमेकांना डोळे भरून पाहात होते. पंडितजीनी आवाज दिला, तसे ते भानावर आले आणि आपली आपली जागा घेतली…
हेही वाचा – विभाला समजले दिरांचे कारनामे
सप्तपदीसाठी पंडितजींनी दोघांना उभं रहायला सांगितलं. दोघांनी एकमेकांचा हात पकडत फेरे सुरू केले… बस आता एक फेरा बाकी होता, तोच गोळ्यांचा आवाज आला… कोणाला काही कळेपर्यंत ते दोघेही खाली कोसळले होते. हे सगळं एवढं अचानक झालं की, कोणाला काही कळायला वेळच मिळाला नाही. त्या दोघांना हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत खूप उशीर झाला होता. त्या दोघांच्या जाण्याने विभाला खूप मोठा शॉक बसला आणि तिने जागेवरच आपले प्राण सोडले. एका क्षणात एक हसतं खेळतं कुटुंब संपलं होतं. कोणी केलं? आणि का केलं? काही कळायला मार्ग नव्हता… पोलिसांनीही शेवटी ही फाइल बंद केली, कारण त्यांना एकही पुरावा मिळाला नाही!
0000
एका रूममध्ये ती मात्र त्यांच्या फोटोकडे बघून विकृत हसत होती…
‘तू माझा नाही तर, कोणाचाही नाही… कोणाचाही नाही…’


