राज हा एक हुशार, तडफदार आणि प्रामाणिक पोलीस इन्स्पेक्टर. नागपूरच्या एका उच्चभ्रू सोसायटीत त्याचे वास्तव्य. राजची बहीण नागपूरच्या शासकीय शाळेत शिक्षिका, तर मेहुणे कारागृहात जेलर. सहा महिन्यांपूर्वी जेलर साहेबांच्या एका चुकीमुळे गुंड वरद जेलमधून पळण्यात यशस्वी झाला. जेलर साहेबांना तात्पुरते निलंबित करण्यात आले. पुढील 30 दिवसांत वरद सापडला नाही, तर कायमचे निलंबन होणार होते. वरद पुण्यात असल्याची खात्रीशीर बातमी राजला मिळाली आणि तो पुण्यात दाखल झाला.
नेहा ही राजची सौभाग्यवती. नेहाने सांगितलेल्या मठात राज संध्याकाळी आला. अतिशय प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण होते.
“बेटी, बाबा महाराजांच्या फोटोला मनापासून नमस्कार करून काय हवं ते माग. महाराज कृपाळू आहेत. नवसाला पावतात,” एक सुशिक्षित आणि सुंदर स्त्री आपल्या मुलीला सांगत होती.
“बाबा महाराजांना सांग, परीक्षेत यश मिळू दे,” एक आई आपल्या मुलाला सांगत होती.
“ताई, कुठे आहे बाबा महाराजांचा फोटो?” राजने विचारले.
“पुढे उजवीकडे वळल्यावर भिंतीवरचा चौथा फोटो.”
फोटोसमोरील भलीमोठी रांग महाराजांच्या दिव्य शक्तीची साक्ष देत होती.
राजने मोठ्या भक्तिभावाने फोटोसमोर हात जोडले. जाडजूड हारामुळे महाराजांचा चेहरा बराचसा झाकला गेला होता.
“महाराज, मी एका महत्त्वाच्या केसवर काम करतो आहे. काहीतरी क्लू मिळवून द्या,” म्हणत राजने मनापासून प्रार्थना केली.
आणि काय आश्चर्य! त्याच रात्री राजला खूप उपयुक्त माहिती मिळाली.
दुसऱ्या दिवशी राज पुन्हा बाबा महाराजांच्या फोटोसमोर मोठ्या भक्तिभावाने उभा राहिला. हात जोडताच पुढच्याच क्षणी जेलर साहेबांचा फोन आला.
“राज, एक महिन्याची मुदतवाढ मिळाली.”
राजची महाराजांवरील श्रद्धा आणखी वाढली. मठातील त्याच्या चकराही वाढल्या.
पुढच्या आठवड्यात राजला आणखी एक अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. खूश होऊन किलोभर पेढे आणि गुलाबाच्या फुलांचा हार घेऊन तो मठात आला. मनसोक्त दर्शन घेता यावे म्हणून तो ऐन दुपारीच आला होता. त्यामुळे मठात फारशी गर्दी नव्हती.
राजने फोटोवरील जुना हार काढला. आज प्रथमच महाराजांचे व्यवस्थित दर्शन झाले. अतिशय प्रसन्न मुद्रा, आडव्या लावलेल्या गंधाने झाकलेले भव्य कपाळ… बराच वेळ दर्शन घेऊनही मन भरत नव्हते.
“महाराज, मला पळालेला कैदी वरद सापडू द्या. माझ्या मेहुण्यांचे निलंबन कृपा करून टळू द्या.”
राजने फोटोवर डोकं ठेवून मनापासून प्रार्थना केली. ताज्या गुलाबाच्या फुलांचा भरगच्च हार फोटोला घातला.
महाराजांची शक्तीच अलौकिक!
अत्यंत महत्त्वाची माहिती आणि वरदचा लेटेस्ट फोटो राजच्या फोनवर झळकला. अचानक फुलांचा हार फोटोवरून निसटला. राजला ते खटकले…
“काही संकेत तर नसेल ना?”
हेही वाचा – आभास… की वास्तव?
राजने पुन्हा नमस्कार केला. त्याच क्षणी महाराजांच्या कपाळावरील भरगच्च गंधाखाली लपलेली खोल जखमेची खूण त्याच्या नजरेस पडली… क्षणभर तो स्तब्ध झाला.
मनोभावे फोटोला हार घालून आणि पेढ्यांचा नैवेद्य दाखवून तो मुख्य पुजाऱ्याला भेटला,
“बाबा महाराजांना प्रत्यक्ष भेटून अकरा लाख रुपयांची देणगी द्यायची इच्छा आहे.”
“महाराज कोणालाही भेटत नाहीत; पण देणगी मोठी आहे. मी विचारून पाहतो,” पुजारी म्हणाले.
दुसऱ्या दिवशी पुजाऱ्यांचा फोन आला.
“पुढच्या गुरुवारी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी या. महाराज फक्त दोन मिनिटे भेटतील. देणगी रोख हवी; चेक नको.”
राजने आनंदाने होकार दिला.
गुरुवारी तो ठरलेल्या वेळेपेक्षा थोडा आधीच मठात पोहोचला.
“पंधरा मिनिटांत महाराज येतील,” असे त्याला सांगण्यात आले.
थोड्याच वेळात महाराज आले. शुभ्र वस्त्रे, शांत चेहरा आणि कपाळावर नेहमीप्रमाणे भरगच्च गंध… राजने अत्यंत नम्रतेने त्यांच्या पायांवर पाणी घातले. महाराज नको म्हणत असतानाही त्याने ओल्या कापडाने त्यांच्या कपाळावरील गंध अलगद पुसले.
क्षणभरासाठी महाराजांच्या कपाळावरील खोल जखमेची खूण त्याला स्पष्ट दिसली.
राजच्या चेहऱ्यावर समाधानाची एक अस्पष्ट झलक उमटली. त्याने पुन्हा पूर्ववत गंध लावले, वाकून नमस्कार केला आणि महाराजांचे पाय घट्ट धरून ठेवले.
“वत्सा, तुझे कल्याण होईल. सर्व मनोकामना पूर्ण होतील,” महाराजांनी आशीर्वाद दिला.
राजने मोबाइलवर संदेश पाठवला.
“पैशांची बॅग घेऊन या.”
काही क्षणांतच दोन जण मोठी बॅग घेऊन आले. अनेकांच्या नवसाला पावणारे बाबा महाराज राजच्या भक्तीला पावलेत आणि राजला गुन्हेगार गवसला.
राज उठला. त्याच्या चेहऱ्यावर आता भक्ताचा नव्हे, तर कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचा करारी भाव होता.
“वरद… तुझा खेळ संपला! गंधाखाली जखमेची खूण लपवता आली; पण माझ्या नजरेतून नाही.”
हेही वाचा – आण्णा… जगण्याच्या इच्छेला फुटली पुनश्च पालवी!
महाराजांचा चेहरा पांढराफटक पडला. क्षणात त्यांच्या मनगटांवर बेड्या चढल्या. अनेकांच्या नवसाला पावणारे बाबा महाराज प्रत्यक्षात फरार गुंड वरद निघाले.
राजची भक्ती अंधश्रद्धेची नव्हती; ती होती कर्तव्यावरील श्रद्धा.
नेहाने सांगितलेल्या मठात तो योगायोगाने आला; पण त्याच मठात त्याला आपल्या तपासातील सर्वात महत्त्वाचा धागा मिळाला. त्या एका जखमेच्या खुणेने वरदचा मुखवटा फाडला आणि राजने त्याला जेरबंद केले.
काही दिवसांनी जेलर साहेबांचे निलंबन रद्द झाल्याचे आदेश आले.
राजने मनोमन नेहाचे आभार मानले. तिच्यामुळे तो मठात आला, बाबा महाराजांचा भक्त झाला आणि अखेर सत्याचा विजय झाला.


