रविवारचा दिवस. संपूर्ण आठवड्याच्या धावपळीनंतर एक निवांत श्वास घेण्याचा दिवस. घरात सगळे जमलेले असतात. कुणाला उठायला उशीर होतो, कुणी पेपर वाचत असतो, कुणी चहा घेऊन टेरेसवर बसलेलं असतं. पण एक गोष्ट ठरलेली असते – आज जेवण स्पेशल असणार!
हॉटेलिंग?
ऑनलाइन फूड?
छे! आमच्यासारख्या मध्यमवर्गीय घरांमध्ये या ‘लक्झरी’ गोष्टी फार कमीच परवडतात. त्यात आजीचं वाक्य आठवतं –
“हॉटेलात पैशाने स्वाद मिळतो, पण घरात मनाचे प्रेम!”
म्हणूनच आज आईच्या हातचा बटाट्याचा रस्सा, पापड, कोशिंबीर, गरमागरम पोळ्या आणि एखादं गोड – कधी श्रीखंड तर कधी फक्त गुलाबजाम!
बाबा रेडिओवर गाणी लावतात – ‘मेरे सपनों की रानी कब आएगी तू…’
आणि स्वयंपाकघरातून येणारा फोडणीचा आवाज, पातेल्यातून निघणारा वाफाळता बटाट्याचा घमघमाट…
आईच्या चेहऱ्यावर हलकीशी घामाची धार, पण डोळ्यांत समाधान – कारण सगळ्यांनी आज तिच्या हातचं जेवण ‘हॉटेलपेक्षा भारी’ म्हणत ताटात पुरण वाढून घेतलं!
रविवार म्हणजे केवळ सुट्टी नव्हे… रविवार म्हणजे घरातली ऊब, प्रेमाने सजलेली चविष्ट दुपार… आणि आयुष्याच्या छोट्या छोट्या आनंदांची पुन्हा एकदा आठवण!
हेही वाचा – बिघाड
बाबा वर्तमानपत्रात गुंतले आहेत. अमेय सोफ्यावर बसून कॉलेजचे फॉर्म भरतोय.
“बाबा, एमआयटीचा फॉर्म भरतोय. फीस 15 हजार आहे पहिल्यांदाच!”
बाबा डोळ्यांवरचा चष्मा नीट करतात. एक दीर्घ श्वास घेतात… “भर रे… भर… तू फक्त शिक. बाकीचं आम्ही बघतो.”
“पण बाबा, तुमचं रिटायरमेंट दोन वर्षांनी आहे ना? तेवढं करून घ्यावं लागेल सगळं…” अमेय बोलता बोलता थांबला.
बाबांनी पेपर बाजूला ठेवला. हळूच म्हणाले – “मुला, आपण मध्यमवर्गीय. आपलं आयुष्य म्हणजे एक मोठं गणित असतं आणि त्यात ‘उत्तर मिळालं की सुटतं’ असं काही नसतं. कारण गणिताच्या प्रश्नांपेक्षा आयुष्याचे प्रश्न आधीच येतात!”
1988
नवीन लग्न झालेलं. बाबांचं नवीन नोकरीत पदार्पण. आई नुकतीच घरात आली होती. त्या दोघांनी मिळून स्वप्न पाहिलं – घर घ्यायचं, मुलं शिक्षण घेणार, एकदा सगळं सेट झालं की, थोडा आराम करायचा.
पण गणिताचं पहिलं प्रमेय आधीच समोर उभं राहिलं – “पगार 3500, EMI 1500!”
तेव्हा कोणतंही फायनान्शियल प्लॅनिंग नव्हतं, पण होतं ते मनातलं व्यवस्थापन. कोणती साडी पुढच्या वर्षीच्या सणासाठी ठेवायची, चपातीचं पीठ दोन दिवस पुरवायचं आणि कोणत्या महिन्यात ‘सिनेमा’ म्हणतोय तो खरंच पाहायचा का फक्त जाहिरातीतच?
1995
अमेयचा जन्म झाला. मुलगा घरात आलाय म्हणजे नवीन हिशोब सुरू. आई-बाबांनी कपड्यांपासून ते दवाखान्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत काटकसर केली. कुणी आजी म्हणाली – “बाळासाठी सोन्याचं पैंजण घालायचं रे…” आईने नुसतं हसून विषय बदलला.
ते पैंजण त्या घरात नव्हतं, पण घरात प्रेम आणि काळजी सोन्यासारखी चमकत होती.
2005
अमेय चौथीत. शाळा, वह्या, युनिफॉर्म, स्पर्धा परीक्षा… एकेक नवीन खर्च हजेरी लावू लागला. बाबांचं प्रमोशन झालं होतं, पण त्या प्रमोशनसोबतच आईचं कामही वाढलं – घराचा खर्च मॅनेज करायचा आणि घरातल्या प्रत्येक स्वप्नाची काळजी घ्यायची.
कधी लग्नात जायचं ठरवलं, तर विचार येई – “तिथे आहेर किती घ्यावा?”
कधी हॉटेलमध्ये जायचं म्हटलं, तर मेन्यू कार्डापेक्षा मनाचा कॅल्क्युलेटरच आधी उघडायचा.
2015
अमेय बारावीला. आई म्हणाली, “आपण थोडेसे दागिने गहाण ठेवू. मुलाच्या शिक्षणाला काही कमी नको.”
बाबा शांत होते. त्यांनी कोणालाच न सांगता पीएफमधून अॅडव्हान्स काढला. त्या दिवशी त्यांनी स्वतःसाठी घड्याळ घेण्याचं मनातलं एक जुनं स्वप्न बाजूला ठेवलं. कारण वेळ मोजायला घड्याळ नको, पण वेळेवर पैसा लागतो – हे मध्यमवर्गीयांना कुठल्याही एमबीएच्या आधी कळतं.
आज
आई-बाबा आता 58-59 वयाचे आहेत. रिटायरमेंट अवघ्या दोन वर्षांवर. बँकेचं रिकरिंग डिपॉझिट, पीएफ, थोडंफार म्युच्युअल फंड… सगळं करताना त्यांनी एक गोष्ट कायम जपली – “पुढच्या पिढीला कमी पडू नये.”
पण त्यांच्या स्वतःच्या आरोग्याच्या तपासणीला त्यांनी “पुढच्या महिन्यात” म्हणत टाळलं… कारण मध्यमवर्गीय घरात आरोग्याची चाचणीसुद्धा “बजेटमध्ये” बसवावी लागते.
बाबा चहा घेत म्हणतात – “आयुष्याचं हे गणित असतं रे – सगळ्या उदाहरणांना पूर्ण उत्तरं मिळत नाहीत. कधी कधी फक्त समीकरण सोडवायचं असतं… आणि काही वेळा उत्तरं आपल्याऐवजी दुसऱ्याच्या यशात दिसतात.”
अमेय डोळे मिटतो. त्याला त्या ‘न दिसणाऱ्या’ उत्तरांची किंमत आता कळते आहे आणि आपण मध्यमवर्गीय आहोत म्हणजे नक्की काय आहे?
मध्यमवर्गीयांचं मॅनेजमेंट म्हणजे – ‘पगार’ आणि ‘खरंच गरज आहे का?’ यामधली रोजची संघर्ष कथा.
मध्यमवर्गीयांचं आयुष्य हे कधीही थांबत नाही. त्यातले स्वप्नं – घरी सायकल आणणं, मुलासाठी शिकवणी लावणं, लग्नात मान राखणं – सगळं हिशोबाच्या काट्यावर चालतं. त्यांचं गणित रोज बिघडतं, पण तेच ते रोज नव्यानं सोडवतात – प्रेमाने, संयमाने, आणि जबाबदारीने. एमबीए नसलेलं हे व्यवस्थापन म्हणजेच जगण्याचं खऱ्या अर्थानं गणित!
मध्यमवर्गीयाचं मॅनेजमेंट म्हणजे 25,000 रुपयांत 40,000 रुपयांचं आयुष्य जगणं.
आज गॅस संपला… उद्या फ्रीज बंद पडला… परवा EMI आहे… तरीसुद्धा चेहऱ्यावर हसू ठेवणं हे मध्यमवर्गीयांचं खऱ्या अर्थानं मॅनेजमेंट. मध्यमवर्गीय आयुष्य म्हणजे केवळ काटकसर नाही, ती एक समृद्धता आहे – जिथे ‘तडजोड’ ही ताकद आहे, ‘बचत’ ही सवय आहे, आणि ‘आनंद’ ही निवड आहे.
त्यांना कधी पुरस्कार मिळत नाहीत, पण त्यांनी बांधलेलं घर हे जगण्याचं सर्वात मोठं प्रमाणपत्र असतं. मुलांचे शिक्षण आणि लग्न आणि आपलं म्हातारपणाची तरतूद, वर्तमानातही भविष्याची काळजी…
हेही वाचा – ‘मर्डर मिस्ट्री’ची कथा…
भारतातला सगळ्यात खंबीर आणि समंजस वर्ग – मध्यमवर्ग. मध्यमवर्गीय ‘संसार व्यवस्थापन’ या कोर्समध्ये गोल्ड मेडलिस्ट असतात! अशा या मध्यमवर्गीय परिवारला कोणत्याही सेवा उपलब्ध नाहीत. कोणाच्या आधाराशिवाय जगणं… छोटा संसार म्हणजेच खऱ्या अर्थाने समृद्ध आयुष्याचं उदाहरण असतं.
“स्वबळावर उभं आयुष्य जगणारा – हेच मध्यमवर्गीयांचं खरं स्वप्न आणि जगण्याचं तंत्र.”
अमयला मध्यमवर्गीय असल्याचा आज अर्थ कळला… मध्यमवर्गीयांचं आयुष्य हे चिमूटभर साखरेसारखं असतं, कमी असलं तरी गोड लागतं, पण अभिमानाने जगणारे!
मला तरी मध्यमवर्गीय असण्याचा अभिमान आहे.


