“अभिनंदन! यंदाच्या राज्यस्तरीय भव्य कथालेखन स्पर्धेसाठी तुमची मुख्य अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.” सकाळी सकाळी मोबाइल स्क्रीनवर चमकलेला तो अनपेक्षित संदेश वाचून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. चहाचा गरम कप तसाच हातात धरून मी तो संदेश एकामागून एक दोन-तीनदा वाचला. चेहऱ्यावरचं हसू ओसंडून वाहत होतं आणि कित्येक दिवसांची माझी कठोर मेहनत आज फळाला आली, असं मला वाटत होतं. मी मनातून खूप सुखावले, पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही, कारण पुढच्याच मिनिटाला कमिटीकडून दुसरा एक सविस्तर मेसेज आला…
त्या नव्या संदेशात पुढची अट आणि नियम लिहिले होते. त्यात लिहिलं होतं, “यंदाच्या अंतिम फेरीचा मुख्य विषय – मर्डर मिस्ट्री म्हणजेच क्राइम थ्रिलर! कथेमध्ये खून, संशय, गुंतागुंतीचा तपास, रहस्य, थरार आणि एक अनपेक्षित शेवट असणे अनिवार्य आहे.”
तो मेसेज वाचून मी जागच्या जागी अक्षरशः थिजून गेले. हातातील चहाचा कप थरथरला आणि टेबलवर वाजत स्थिरावला. अंगावर एक सरसरून काटा आला आणि कपाळावर आठ्या पडल्या. “काय झालं गं? एवढी का गोठली आहेस सकाळी सकाळी?”
पोहे बनवत असलेल्या नवऱ्याने स्वयंपाकघरातून माझा पडलेला आणि गंभीर चेहरा पाहून विचारलं.
मी काही न बोलता फक्त मोबाइल त्याच्या हातात दिला. त्याने तो मेसेज शांतपणे वाचला आणि तो घरात घुमेल असा मोठ्याने हसला. “अरे वा! बस, आता तुझं काम झालं तर! तू तर रोज नवनवीन विषयांवर सुंदर कथा लिहित असतेस. हा विषय तर खूपच मस्त आणि थ्रिलिंग आहे. लिही की, एखादी कडक थ्रिलर… तुला नक्की जमेल!” तो म्हणाला.
मी त्याच्याकडे अत्यंत रागाने आणि असहाय्यतेने पाहिलं. “अरे, तुला थट्टा वाटतेय का? माझ्या आजवरच्या कथा आठव जरा… माझ्या कथेत दोन पात्रांमध्ये कडाक्याचं भांडण झालं, तरी शेवटी मी दोघांची मनं वळवून प्रेमाने समेट घडवून आणते. इथे सरळ जिवंत माणूस मारायचा आहे! रक्त, चाकू, खून… हे सगळं माझ्या संवेदनशील मनाला कसं पटणार? आणि माझ्याकडून कसं होणार?”
माझं हे बोलणं ऐकून तो अजूनच जोरात हसायला लागला. तितक्यात आमचा कॉलेजला जाणारा मुलगा बेडरूममधून बाहेर आला आणि हसत म्हणाला, “बाबा, बरोबर आहे तिचं. आईच्या कथेतला खुनी आधी पीडित माणसाला प्रेमाने चहा पाजेल, मग त्याची मनधरणी करेल, ‘मला माफ कर,’ म्हणून डोळ्यात पाणी आणेल आणि शेवटी दोघे गळ्यात गळे घालून पक्के मित्र होतील!” सगळं घर माझ्यावर हसत होतं. त्या हसण्याने घरातलं वातावरण हलकं झालं असलं, तरी माझी मात्र धाकधूक वाढली होती. मी अत्यंत गंभीर झाले होते, कारण प्रश्न माझ्या लेखणीच्या प्रतिष्ठेचा होता.
हेही वाचा – कौतुकाचे दोन शब्द
दुपारी घरची सगळी कामं आटोपली. घरात शांतता पसरली होती. मी अभ्यासाच्या टेबलावर माझी आवडती वही आणि पेन घेऊन बसले. वहीच्या कोऱ्या पानाच्या अगदी मध्यभागी मी मोठ्या आणि ठळक अक्षरात शीर्षक लिहिलं, “मर्डर मिस्ट्री”! थोडं थांबून, खूप विचार करून मी कथेची सुरुवात केली… “मध्यरात्रीचे बारा वाजले होते. सर्वत्र किर्रर्र अंधार आणि भयानक शांतता पसरली होती. काळ्या कपड्यांमधील एक संशयास्पद माणूस हातात धारदार चाकू घेऊन बंगल्याच्या मागच्या दरवाजाने आत शिरला…” मी ते वाक्य लिहिलं आणि स्वतःच दोनदा वाचलं. ते वाचताच माझ्या आतल्या संवेदनशील मनाने लगेच मान डोलवली आणि आतून आवाज आला, “धारदार चाकू? अगं, एवढा धारदार कशाला? चुकून जास्त लागलं तर? चाकू थोडा बोथट ठेव.” मी कपाळावर हात मारला, पण मनाचं ऐकून मी ‘धारदार’ हा शब्द खोडला आणि तिथे ‘बोथट’ असं लिहिलं.
मी पुढे लिहायला सुरुवात केली, “त्याने खोलीत झोपलेल्या माणसावर बोथट चाकूने जोरात वार केला…” पुन्हा माझं मन मधेच ओरडलं, “जोरात नको गं बाई! खूप रक्त येईल आणि त्याला खूप वेदना होतील. त्यापेक्षा हलकासा वार कर.” मी ‘जोरात’ पुसलं आणि ‘हलकासा’ केलं. आता वाक्य झालं, “त्याने हलकासा वार केला.” पण क्षणभर विचार केल्यावर मलाच हसू आलं. हलकासा वार करून काय उपयोग? त्याने माणूस कसा मरेल? त्याला तर फक्त किरकोळ खरचटलं असेल. मग मर्डर कसा होणार? मी चिडून ते पूर्ण वाक्यच पुसून टाकलं. यावेळी मी चाकूच बाजूला ठेवला.
मनात विचार केला की, मारामारी दाखवू. मी लिहिलं, “त्याने मागून येऊन त्या माणसाला जोरात ढकललं…” लगेच मनातून दुसरी शंका उपस्थित झाली, “अरे, पण तो खाली पडल्यावर तिथे फरशी असेल आणि डोक्याला लागलं तर? खाली एखादी मऊ गादी किंवा सोफा असेल तर किती छान होईल!” मी कथेतील त्या पडणाऱ्या पात्राच्या खाली सुरक्षित गादी ठेवली. पुन्हा सगळं पुसलं… असं करत करत अर्धा तास उलटून गेला होता. कागदावर शब्दांची खाडाखोड झाली होती, पण माझ्या कथेतला तो बिचारा माणूस अजून जिवंतच होता आणि खुनीसुद्धा दारात उभा राहून थकला होता.
इतक्यात नवरा खोलीत डोकावला आणि खोचकपणे म्हणाला, “काय लेखिकाबाई, झाला का मर्डर? की पोलीस तपास सुरू झाला?” मी वैतागून पेन खाली ठेवलं आणि म्हणाले, “नाही रे… अजून खुनी दारातच उभा आहे. आत यायला तयार नाही.” तो हसत म्हणाला, “अशी दारात उभं ठेवून त्याची काय खातीरदारी करतेस? आत पाठव त्याला लवकर आणि उरकून टाक!” मी अत्यंत प्रामाणिकपणे उत्तर दिलं, “अरे, तो आत गेला तर घरातले लोक त्याला चहा-पाणी विचारतील. मग चहा द्यावा लागेल. चहा दिला की मर्डर कॅन्सल होईल आणि दोघे गप्पा मारत बसतील!” तो डोक्याला हात लावून हसत हसत निघून गेला.
मी हार मानणार नव्हते. यावेळी मी हिंसेचा मार्ग सोडायचा ठरवला. रक्तपात नको, म्हणून मी ‘विषाचा’ पर्याय निवडला. मी नवीन पानावर लिहायला घेतलं, “खुन्याने स्वयंपाकघरात जाऊन दुधाच्या कपात अत्यंत जहाल विष मिसळलं…” तेवढ्यात माझं गृहिणीचं मन जागं झालं. ते म्हणालं, “अगं बाई! विष मिसळलेलं दूध तो पिणार नाही आणि ते दूध वाया जाईल. आजकाल दुधाचे आणि चहाच्या पावडरचे भाव किती वाढलेत माहिती आहे ना? एवढी नासाडी कशाला?” मी कपाळावर हात मारला. विषप्रयोग रद्द!
त्यानंतर मी विचार केला की, झोपेत असताना उशी तोंडावर दाबून गुदमरवून मारावं. यात रक्ताचा थेंबही सांडणार नाही आणि काही वायाही जाणार नाही. मी लिहिलं, “तो सावलीसारखा बेडजवळ गेला आणि त्याने सुती उशी त्या पात्राच्या तोंडावर जोरात दाबली…” पण लगेच माझ्या मनात विचार आला, “अरेरे! ती उशी आणि त्याचं कव्हर तर अगदी नवीन आहे. माणूस वाचण्यासाठी हातपाय मारेल, तडफडेल, त्याने ते कव्हर फाटून जाईल किंवा खराब होईल. नको नको, उशी नको.” उशीचा प्लॅनही फ्लॉप झाला!
शेवटी मी ठरवलं की, आपण स्वतः काही करायला नको, निसर्गावर किंवा नशिबावर सोडून देऊ. ‘अपघात’ दाखवू या. मी लिहिलं, “खुन्याने रात्रीच्या अंधारात त्याच्या कारचे ब्रेक निकामी केले. दुसऱ्या दिवशी तो कार घेऊन घाटातून जात असताना…” पण लगेच माझ्या मनात पाझर फुटला, “अरे, पण घाटात गाडी चालवताना कारमध्ये त्याच्यासोबत त्याची बायको लहान मुलं किंवा एखादा निरपराध मित्र असेल तर? एकाच्या पापात बाकीच्या निष्पाप जीवांचा बळी का? कार दरीत कोसळली तर, संपूर्ण कुटुंब संपून जाईल.” माझ्या संवेदनशील मनाने कारचे ब्रेक पुन्हा जागेवर दुरुस्त केले. कथा पुन्हा शून्यावर आली!
दोन दिवस झाले होते. माझ्या वहीत खाडाखोड करून फक्त चार ओळू उतरल्या होत्या, पण माझ्या डोक्यात मात्र चाळीस जिवंत माणसं इकडून तिकडे फिरत होती. मला रात्री झोपेतही तेच विचार यायचे. दोन दिवस सतत विचार करून माझं डोकं जाम झालं होतं. शेवटी मी माझ्या एका मैत्रिणीला फोन केला, जी साहित्याची जाणकार होती. मी तिला माझी अडचण सांगितली, “अगं, तूच सांग, तुझ्या कथेत मर्डर कसा करतात गं लोक? मला जमतच नाहीये.” ती फोनवर शांतपणे म्हणाली, “वेडी आहेस का तू? अगं, तो खून खराखुरा नसतो. ती फक्त एक काल्पनिक कथा असते. पात्रं काल्पनिक असतात.” मी हताश होऊन म्हणाले, “मला माहिती आहे गं ते काल्पनिक असतं! पण जेव्हा मी लिहायला घेते, तेव्हा माझं मन त्या पात्रांना जिवंत समजतं. मला वाटतं मी खरोखरच कोणाचा तरी जीव घेतेय.” माझं हे भाबडेपण ऐकून ती हसायला लागली.
त्या रात्री मन हलकं करण्यासाठी मी टीव्ही सुरू केला. एका वाहिनीवर गुन्हेगारीवर आधारित मालिका सुरू होती. त्यात एका माणसाने क्षणात खिशातून बंदूक काढली आणि समोरच्यावर गोळी झाडली. समोरचा माणूस रक्ताच्या थारोळ्यात पडला. मी दचकून रिमोटने टीव्ही लगेच बंद केला. मनात एकच प्रश्न आला, “हे पडद्यावर किंवा पुस्तकात इतकं सहज कसं दाखवतात? माणसाचा जीव घेणं इतकं सोपं असतं का?” दुसऱ्या दिवशी सकाळी मी वर्तमानपत्र उघडलं. पहिल्याच पानावर मोठी बातमी होती, “जमिनीच्या किरकोळ वादातून सख्या भावाने केला भावाचा खून.” पान उलटलं, तर दुसऱ्या पानावर बातमी होती, “मोबाइल गेमवरून झालेल्या भांडणातून मित्राने मित्राचा जीव घेतला.” मी काही क्षण स्तब्ध झाले. वर्तमानपत्र हातातून गळून पडलं. कालपर्यंत ज्या विषयावर मी घरात विनोद करत होते, पती आणि मुलासोबत हसत होते, ते वास्तव किती भयानक, क्रूर आणि वेदनादायी आहे याची मला जाणीव झाली. समाजात माणसाच्या जीवाची किंमत एवढी स्वस्त झाली आहे? किती सहजतेने हत्या आणि मर्डर होते… मी तर माझ्या पायाखाली मुंगी पण मारू शकणार नाही… आणि धडाधड दररोज मर्डर होत आहेत!
मी पुन्हा माझ्या अभ्यासाच्या खोलीत गेले आणि वही उघडली. या क्षणी माझ्या मनात कोणताही संभ्रम नव्हता. मी ठरवलं, मी मर्डर मिस्ट्री लिहिणारच नाही. माझ्याकडून कोणाचा खून होणार नाही— अगदी कागदावरसुद्धा नाही! त्याऐवजी, मी पेन उचललं आणि एका वेगळ्याच कथेला सुरुवात केली. मी एका अशा लेखिकेची कथा लिहायला घेतली, जिला स्पर्धेसाठी मर्डर मिस्ट्री लिहायची असते, पण अत्यंत संवेदनशील मनामुळे हजार प्रयत्न करूनही तिच्याकडून कथेत कोणाचा खून होत नाही. ती कशी पात्रांना वाचवत राहते, याची ती एक हलकीफुलकी पण अंतर्मुख करणारी कथा होती.
स्पर्धेचा दिवस आला, मी माझी ती ‘वेगळी’ कथा पाठवून दिली. काही दिवसांनी स्पर्धेचा निकाल लागला. अपेक्षेप्रमाणे माझ्या कथेला पहिला, दुसरा किंवा तिसरा क्रमांक मिळाला नाही. कारण कथेच्या मुख्य अटीनुसार त्यात ‘मर्डर’ किंवा ‘रहस्य’ नव्हतंच. पण निकालपत्राच्या शेवटी परीक्षकांनी माझ्या कथेबद्दल विशेष नोंद म्हणून एक ओळ लिहिली होती. ती ओळ वाचून माझे डोळे भरून आले. तिथे लिहिलं होतं, “ही कथा कोणत्याही गुन्ह्याची किंवा रक्ताची नाही; तर ही एका अत्यंत संवेदनशील आणि जिवंत मनाची कथा आहे. लेखिकेचे विचार कौतुकास्पद आहेत.” तो कागद हातात धरून मी बराच वेळ शांत बसून राहिले. तो पुरस्कारापेक्षाही मोठा सन्मान होता.
हेही वाचा – शिळ्या पोळ्यांचा सिंधी जलवा — “सेयाल फुलका”
संध्याकाळी चहा पिताना नवरा हसत हसत म्हणाला, “चल काही हरकत नाही. यंदा नंबर नाही आला तर काय झालं? पुढच्या वर्षी नक्कीच प्रेमकथेची किंवा कौटुंबिक विषयावरची स्पर्धा असेल. तेव्हा बघू.” मी चहाचा घोट घेतला आणि हसून म्हणाले, “हो… ते माझ्याकडून नक्कीच होईल. त्यात मी अव्वल येईन.” त्याने डोळे मिचकावत पुन्हा विचारलं, “आणि मर्डर मिस्ट्री?” मीही तितक्याच आत्मविश्वासाने आणि हसून उत्तर दिलं, “माझ्याकडून कागदावरसुद्धा मर्डर होत नाही आणि प्रत्यक्ष आयुष्यात तर प्रश्नच उद्भवत नाही!”
त्या दिवशी मला जगण्याचं आणि लेखनाचं एक खूप मोठं सत्य कळलं होतं. लेखक तो मोठा नाही, जो आपल्या लेखणीच्या बळावर सहज एखादं पात्र मारून टाकतो आणि क्रूरता निर्माण करतो. खरा लेखक तर तो असतो, ज्याच्या मनात आणि लेखणीत पात्रांना जिवंत ठेवण्याची ताकद असते, जे पात्र वाचकांच्या मनात घर करून राहतं. काही लोकांच्या हातात शस्त्र असतं, तर काही लोकांच्या हातात पेन असतं. शस्त्र माणसाचा जीव घेऊ शकतं, समाजात भीती पसरवू शकतं. पण एक पेन… ते माणसाची मेलेली मनं आणि संवेदना जिवंत ठेवू शकतं. आणि कदाचित म्हणूनच, मला सार्थ अभिमान आहे की, आजपर्यंत माझ्याकडून कागदावर का होईना, पण एकही “मर्डर” झाला नाही आणि माझी लेखणी नेहमीच माणुसकी जपणारी राहिली!


