पूर्वार्ध
खाली मान घालून तो बराच वेळ शांत बसला होता. हाताची बोटं चाळवत फरशीवर पहात होता. थोड्या वेळाने त्याने उगीच दाढी खाजवल्यासारखी केली. काहीतरी नवीन सुचल्यासारखे आठवून तो म्हणाला, “तुम्ही म्हणताय ते पण खरं आहे साहेब. कुठवर कोर्टकचेरी करत राहणार? आयुष्य काय थांबून रहात नाही. त्यापेक्षा मिटवून घेतलेलं बरं. पण आमची आई थोडी तर्कट आहे. तिला सांभाळून घ्या.”
समोरची फाइल बाजूला ठेवून बोटातली अंगठी फिरवत फिरवत मुंगळे वकील म्हणाले, “पुढच्या आठवड्यामध्ये लोकअदालत आहे. त्यावेळी विरुद्ध पार्टी येईल. तुम्ही सर्वजण या. शांतपणे चर्चा करून योग्य तो तोडगा काढूया.”
कागदपत्रांची पिशवी घेऊन सचिन कार्यालयाच्या बाहेर पडला. रस्त्यावर गर्दी होती. रहदारी वाढली होती. चपचपीत ऊन पसरलं होतं. डोक्यावरचा जड वैरणीचा बिंडा खाली टाकल्यावर हलकं वाटावं तसं त्याला वाटू लागलं.
अरुणा एमए असून सुद्धा तिच्या काही गोष्टी लक्षात येत नव्हत्या. दोघांचं कधीच पटणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष होती. तिनेच आईला, मला तसे सांगितले होते. दाजी बरोबर मी स्वतः बोललो, नाना बोलले. परंतु त्यांचा स्वभाव बदलायला तयार नाही. एकदा या गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर कशाला त्यांच्या नादाला लागा?
अचानक “पाँऽऽ… पाँऽऽ…” असा मोटरसायकलच्या हॉर्नचा आवाज घुमला. त्याने समोर पाहिले तर मधूने गाडी आडवीच उभी केली होती.
“कसल्या तंद्रीत हाईस. कुठंतरी धडाकशील की.”
गाडीच्या हँडलला एक हात धरून सचिन हसत हसत म्हणाला, “तंद्री नाही रे. घरातलं ते प्रकरण एकदा संपलं की, निवांत झालो बघ. चल एकदा तू पण सांगून बघ. मावशी म्हणून तुझं काही ऐकलं तर ऐकलं.”
मधू होय नाही म्हणायच्या अगोदरच तो मधूच्या मागच्या सीटवर बसला. मधूने गाडी वळवली.
डांबरी रस्ता सोडून गाडी कच्च्या रस्त्याला लागली. मधूने गियर बदलला. गाडी हळू वेगात पुढे जाऊ लागली. सचिनच्या अंगणात गेल्यावर त्याने गाडी थांबवली.
इंदू मावशी धुणं वाळत घालत होती. खिडकीच्या गजाला आणि लिंबाच्या झाडाला बांधलेल्या दोरीवर ओळीने रंगीबेरंगी कपडे टाकत होती. पिळलेला टॉवेल झटकता झटकता मधूला म्हणाली, “बरा आलास वेळ काढून. मागच्या सोमवारी अरुणाचा वाढदिवस होता, तर सवड नाही म्हणालास.”
“मावशे, त्या दिवशी खरंच मी गावाला गेलो होतो. नाहीतर बहिणीच्या वाढदिवसाला यायला नाही म्हणतोय काय? बरं, ते असू दे. आधी आत ये. तुझ्याशी थोडं बोलायचं आहे.”
आत येऊन तो खाटीवर बसला. अरुणा कपड्याच्या घड्या घालून कपाटात ठेवत होती. मधूने तिच्याकडे पाहिलं. एम.ए.चं सुवर्णपदक मिळालेल्या त्या हुशार बहिणीच्या डोळ्यांखाली आता काळी वर्तुळे उतरली होती. चार-पाच वर्षांपूर्वीची तिची चैतन्याने भरलेली चाल आता कुठेतरी हरवून गेली होती.
इंदू मावशीने धुण्याचं पिळं तसंच ठेवलं. पदराला हात पुसत पुसत आत आली. खाटीवर बसलेल्या मधूला तिने पाण्याचा तांब्या दिला. ती समोरच्या लाकडी बाकावर बसली.
मधूने दोन घोट पाणी घेतले आणि तांब्या बाजूला ठेवला. शांतपणे हसत म्हणाला, “मावशी, अरुणाच्या बाबतीत आता काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. झाली की तीन-चार वर्षे. कुठपर्यंत कोर्ट कचेरी करणार आहे? पाच लाख तर पाच लाख. पैशासाठी तिचं आयुष्य का म्हणून मातेरं करायचं?”
इंदू मावशीच्या कपाळावर आठ्यांचं जाळं दिसलं. वर छताकडे पाहत ती म्हणाली, “आता तू शिकवायला आलास? सारी थकली. आता तुला पुढं केलं वाटतं.”
तिने मोठे डोळे करून सचिनकडे पाहिले.
“मी अगोदर सांगितलेलं आहे. त्याची इस्टेट जळता जळत नाही. त्याला सात लाख रुपये लय जड नाहीत. माझ्या पोरीचं करायचं तेवढं वाटोळं त्यानं केलेलं आहे. आता त्याला धडा शिकवल्याशिवाय मी शांत बसणार नाही.”
ती झटकन उठून आत गेली. आत मोकळा तांब्या आदळलेला आवाज आला. म्होरीच्या दरवाज्यातून ती अंगणात गेली आणि जोरजोरात कपडे झटकून वाळत टाकायला सुरुवात केली.
अचंबित होऊन मधू पाहत होता. तो काहीही बोलला नाही. त्याने फक्त सचिनकडे पाहिले. मनातल्या मनात तो पुटपुटला… ‘येथून पुढे या विषयाबाबत मी बोलणार नाही रे बाबा. तू जाणं आणि तुझी आई, बहीण जाणं.’
गाडीला किक मारून तो निघून गेला.
हातात चहाचे कप घेऊन, ओढणी सावरत अरुणा आली. तिने चहा बाकावर ठेवला. एकट्या सचिनला पाहून म्हणाली, “मधू गेला काय? त्याच्यासाठी चहा आणला होता.”
सचिनने कागदपत्रांची पिशवी खुंटीला अडकवली. काहीच उत्तर दिलं नाही. शांतपणे चहाचा कप हातात घेतला आणि तो खाटीवर बसला…
“अरुणा, तू एमए झाली आहेस. तुझं आयुष्य वाया चाललं आहे. तुला कळत कसं नाही? तू आईला समजून का सांगत नाहीस?”
बाजूच्या बाकावर बसलेली अरुणा तटकन उठली. मधुला आणलेला चहाचा कप तिने उचलला आणि ती आत गेली. पायाचा दणदण आवाज येत राहिला. त्यापाठोपाठ तिचा कमी होत गेलेला आवाज ऐकू आला… “आईला कुणाचं ऐकून घ्यायचं माहिती असेल तर ना? तिला कुणाचं पटलंय का?”
बाहेर उन्हाचा तडाका वाढला होता. धुण्याची मोकळी बादली घेऊन इंदू मावशी आत आली. म्होरीत बादली धाडकन आदळली. सोप्यात येऊन ती बाकावर बसली.
हेही वाचा – …अन् संदीपने स्वतःचा स्वाभिमान वाचवला!
“माझ्या मुलीच्या आयुष्याची किंमत त्यांनी पाच लाख केली?”
“आई, पैशाचा प्रश्न नाही. अरुणाचं पुढचं आयुष्य…”
“गप्प बस!”
सचिनचं वाक्य मधेच तुटलं.
“मी माझी पुरगी बाजारात इकायला काढली न्हाय. त्यानं प्रपंचा मोडला. पुरगीचा छळ केला आणि आता पाच लाख फेकलं की, सगळं संपलं? एवढं स्वस्त समजलंय का त्यानं आमाला?”
“पण आई…”
“एक लक्षात ठेव.”
ती उठून त्याच्यासमोर उभी राहिली…
“या अरुणाच्या तडजोडीचा विषय पुन्हा काढू नकूस. केस चालंल तितकी चालू दी. पण मी त्यांच्या दारात मान खाली घालून जाणार न्हाई.”
“अशी डोक्यात राख घालून घेण्यापेक्षा अरुणाचं मत काय आहे, ते तरी तिला विचार.”
इंदू मावशी बाकावरून झटकन उठली, पुन्हा पाय आपटत आत गेली. जाता जाता झटक्याने म्हणाली, “बस तूच विचारत.”
अंगणात फाटक वाजलं. कर्रsss खटाक… सचिन उठून बाहेर आला. डाव्या हातात धोतर धरून, उजव्या हातात छत्री घेऊन नाना आले होते. नाना आत आल्यावर सचिनने जाऊन फाटक बंद केलं.
“एवढ्या उन्हात चालत कशाला यायचं नाना? फोन केला असता तर न्यायला आलो असतो.”
“संजू निघाला होता बावचीला. त्याला म्हटलं सोड मला. तो पलीकडच्या वळणावर सोडून गेला.”
नानांचा आवाज ऐकून अरुणा आणि इंदू मावशी दोघीही बाहेर आल्या. नानांना पाहून पुन्हा आत गेल्या. शांतपणे नाना घरात आले. छत्री बाकावर ठेवली. हुशsss करीत खाटीवर बसले.
पाण्याचा तांब्या घेऊन अरुणा आली. नानांनी पाण्याचे दोन-चार घोट घेतले. अरुणाला खुणावत म्हणाले, “आता चहा, कॉफी, सरबत काही नको. मी जेवण करून आलोय. मम्मीला बोलव. थोडं बोलायचं आहे.”
इंदू मावशी खाली मान घालून बाहेर आली. अरुणाशेजारी भुई टोकरत बसली.
“पुसेगावचं स्थळ आलंय. मुलगा सरकारी अधिकारी आहे. सहा अंकी पगार आहे. दिसायला देखणा, निर्व्यसनी आणि स्वभावाने अत्यंत शांत आहे. आतापर्यंत आलेल्या पंधरा-सोळा स्थळांपेक्षा हे उजवं आहे. मुलीचा चुलता म्हणून सांगतो, आता कुठंतरी केस मिटवून घ्या जावा. पोरगीचं आयुष्य विनाकारण वाया घालवू नका.”
इंदू मावशी ओठ मिटून गप्प बसली होती. सचिन आणि अरुणा इंदू मावशीकडे पाहत होते. सगळ्या घरात गंभीर शांतता पसरली होती.
बाहेर मोटरसायकलच्या हॉर्नचा आवाज आला. पाठोपाठ संजूचा आवाज आला… “नाना, या लवकर. मला पुन्हा एरंडोलीला जायचं आहे. आज माझ्या पाठीमागे खूप काम आहे.”
नाना निघून गेले.
त्या रात्री इंदू मावशीला डोळ्याला डोळा लागला नाही. घरभर उदासीन शांतता होती. पण तिच्या मनात विचारांचं वादळ उसळलं होतं. कधी अरुणाच्या बालपणीचा खळखळून हसणारा चेहरा डोळ्यांसमोर यायचा, तर कधी कोर्टाच्या पायऱ्या चढताना थकलेली तिची चाल.
पहाटे ती हळूच उठली. देव्हाऱ्यात दिवा लावला. दोन उदकाड्या पेटवल्या. घर प्रसन्न वासाने भरून गेलं. दोन्ही हात जोडले, पण ओठांवर काहीच मागणं नव्हतं. फक्त डोळे मिटून बराच वेळ ती तशीच उभी राहिली.
तिने सचिनला हाक मारली,
“सचिन…”
“बोल, आई?”
“वकिलांना फोन कर.”
सचिनने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.
“अरुणाचं आयुष्य माझ्या म्हणण्यापेक्षा मोठं हाय… मला मस्त वाटतंय तेला धडा शिकवावा, पण…”
शब्द उच्चारताना तिचा आवाज किंचित भरून आला.
“जशी योग्य तडजोड हुईल तशी करूया. आता तिचं आयुष्य पुन्हा उभं राहिलं पायजे.”
सचिनच्या चेहऱ्यावर अनेक महिन्यांनी हलकंसं समाधान उमटलं.
0000
त्या घरात कित्येक वर्षांनी पुन्हा लगबग दिसू लागली होती. अंगण झाडून स्वच्छ केले होते. दारात नक्षीदार रांगोळी काढली होती. स्वयंपाकघरातून तुपाचा दरवळ बाहेर येत होता. नातेवाईकांची कुजबुज सुरू होती.
“यावेळी सगळं सुरळीत पार पडलं पाहिजे…”
“तिच्या वाट्याला आता सुखच येवो…”
अरुणा नव्या साडीत शांतपणे बसली होती. तिच्या चेहऱ्यावर पहिल्या लग्नातील निरागस उत्साह नव्हता; पण अनेक वादळं झेलून किनाऱ्यावर पोहोचलेल्या स्त्रीचं संयमी हास्य मात्र होतं. आता अरुणाच्या नव्या आयुष्याची खऱ्या अर्थाने सुरुवात होणार होती.
“विवाह मुहूर्त सावकाश पाहूया. आता लग्न तर ठरलं. कुठं करायचं तेही नंतर ठरवूया. तोपर्यंत आम्ही कोर्टातली केस संपवून घेतो.”
नानांच्या शब्दाला सर्वांनी होकार दिला आणि जेवणाची पंगत बसली. त्या जेवणाच्या पदार्थांत न्यायालयाच्या पायऱ्यांवर घालवलेली वर्षं, आईचा निखळून पडलेला हेका, आणि नव्या आयुष्याची नि:शब्द वाटचाल मिसळली होती. अरुणाचे दुसरे लग्न ठरले, ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली.
0000
संध्याकाळी अभिजीत, सामंत वकिलांच्या कार्यालयात पोहोचला. त्याच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी समाधानाची एक अस्पष्ट रेषा उमटली होती.
“साहेब,” तो खुर्चीत बसत म्हणाला, “त्यांनी अरुणाचं दुसरं लग्न ठरवलं आहे. तांदूळ टाकायचा कार्यक्रम नंतर ठरवणार आहेत म्हणे.”
सामंत वकिलांनी हातातले पेन टेबलवर खाली ठेवलं. काही क्षण ते विचारात पडले.
“बातमी खात्रीची आहे का?”
“हो. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडूनच समजलं.”
वकिलांनी फाइल उघडली. काही कागद चाळले. मग खुर्चीत रेलून ते हलकेसे हसले…
“मग आता खेळ बदलला.”
अभिजीतने उत्सुकतेने विचारलं,
“म्हणजे?”
“पहिलं लग्न अजून कायदेशीररीत्या संपलेलं नाही. न्यायालयाचा अंतिम घटस्फोटाचा हुकूम झालेला नाही. अशा परिस्थितीत त्यांनी जर पुढील विवाहाची अशी घाई केली असेल, तर ती बाब त्यांच्याच अडचणीची ठरू शकते.”
त्यांनी समोरचा कागद ओढला.
“आधी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवू. त्यांनी काय केलं आहे, त्याचा खुलासा मागवू. परिस्थितीनुसार पुढची रणनीती ठरवू.”
नवऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं.
“म्हणजे… आता सात लाख देण्याचा प्रश्नच नाही?”
वकील मंद हसले…
“घाईने निष्कर्ष काढू नका. पण एवढं नक्की… आतापर्यंत बचावात असलेली आपली बाजू आता भक्कम होऊ शकते.”
त्यांनी लेटरहेड पुढे ओढलं. टंकलेखकाने संगणक सुरू केला. की-बोर्डवर बोटं फिरू लागली.
‘कायदेशीर नोटीस…’
या तीन शब्दांपासून एका नव्या संघर्षाची सुरुवात झाली.
0000
दुपारची वेळ होती. अंगणात इंदू मावशी ज्वारी निवडत बसली होती. सचिन घरासमोरच्या ओट्यावर वर्तमानपत्र चाळत होता. आत स्वयंपाकघरातून भांड्यांचा मंद आवाज येत होता. एवढ्यात दारात मोटरसायकलचा हॉर्न वाजला.
“पोस्ट!”
टपालवाला हातात तीन नोंदणीकृत पाकिटं घेऊन उभा होता.
“अरुणा… इंदूबाई… आणि सचिन. तिघांच्या नावाची आहेत.”
सचिनने सही केली. पाकिटांवर सामंत वकिलांच्या कार्यालयाचा शिक्का पाहताच त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या.
“आई…”
हेही वाचा – घटस्फोटाची याचिका? नव्हे, अतिअपेक्षांचा मृत्यूलेख!
इंदू मावशीने हात पुसत पाकीट उघडलं. कागद उलगडताच तिच्या चेहऱ्यावरचा कठोरपणा क्षणात नाहीसा झाला. डोळे एका ओळीवर खिळून राहिले.
सचिनने तिच्या हातातून नोटीस घेतली आणि मोठ्याने वाचू लागला.
“…आमच्या अशिलाचे पहिले वैवाहिक नाते कायदेशीररीत्या अस्तित्वात असताना आपण दुसऱ्या विवाहाची तयारी करून बेकायदेशीर कृत्य केले आहे, असा आमच्या अशिलांचा आरोप आहे…”
त्याचा आवाज हळूहळू मंदावत गेला.
“…यामुळे आमच्या अशिलाची सामाजिक प्रतिष्ठा दुखावली गेली आहे. त्याबद्दल आपण लेखी दिलगिरी व्यक्त करून एक लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी. अन्यथा उपलब्ध कायदेशीर उपाययोजना, त्यात आवश्यक असल्यास फौजदारी कारवाईचाही अवलंब करण्यात येईल…”
घरात काही क्षण स्मशानशांतता पसरली. अरुणाच्या हातातून कागद खाली घसरला.
“हे… हे काय आहे?” तिचा आवाज थरथरत होता.
इंदू मावशीने नोटीस पुन्हा हातात घेतली. तिच्या डोळ्यांत संताप आणि काळजी एकाच वेळी दाटून आली. सचिनने खोल श्वास घेतला.
“आई… आता आपल्यालाही आपल्या वकिलांकडे जावंच लागेल.”
दारातून आत शिरलेली दुपारची सूर्यकिरणे त्या नोटिशीवर पडली होती… आणि त्या कागदाच्या काही ओळींनी पुन्हा एकदा संपूर्ण घरावर संकटाची काळी सावली पसरवली. नोटिशीचं शेवटचं पान वाचून झालं… इंदू मावशीच्या हातातला कागद थरथरू लागला.
ती अलगद जवळच्या खुर्चीत बसली. आयुष्यभर ताठ राहिलेली इंदू मावशी प्रथमच वाकल्यासारखी दिसत होती. कपाळावरचा घाम तिने पदराने पुसला; पण हाताचा कंप काही थांबत नव्हता. घरात कोणीच बोलत नव्हतं. पलीकडच्या गोठ्यात जनावरे वैरण चघळण्याचा एवढाच आवाज ऐकू येत होता.
इंदू मावशीची नजर समोर बसलेल्या अरुणावर खिळली. कित्येक वर्षांनी तिला आपल्या मुलीचा चेहरा नव्याने दिसला. डोळ्यांभोवती आलेली काळी वर्तुळं… कोरड्या ओठांवर हरवलेलं हसू…आणि वयापेक्षा कितीतरी मोठं वाटणारं ते शांत, थकलेलं रूप…तिच्या छातीत एक कळ उठली.
“मी नेमकं कुणासाठी भांडत होते?”
मनात प्रश्न उमटला आणि उत्तरानेच तिचे डोळे पाणावले.
तिने रागाच्या भरात किती निर्णय घेतले, किती दारं बंद केली, किती शब्द जिव्हारी लागतील असे बोलून टाकले… याचा हिशोब तिच्याच मनाने तिच्यासमोर मांडायला सुरुवात केली. तिने थरथरत्या हाताने अरुणाचा हात हातात घेतला.
“पोरी…”
इतकंच शब्द बाहेर पडलं. पुढे आवाजच फुटला नाही. अरुणानेही काही विचारलं नाही. त्या दोघींच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रूच उरलेलं सगळं बोलून गेले.
इंदू मावशीने हळूच मान खाली घातली. तिला प्रथमच जाणवलं… शत्रूशी लढताना ती स्वतःच्या मुलीच्याच आयुष्याशी दोन हात करत राहिली होती. आता पश्चात्ताप होत होता… पण काळ पुढे निघून गेला होता आणि काही चुका अशा असतात, त्यांची किंमत न्यायालयाच्या निकालाने नाही, तर आयुष्याच्या उरल्यासुरल्या वर्षांनी चुकवावी लागते.


