अध्याय तेरावा
म्हणोनि इया वाहणीं । केली म्यां उपलवणी । वांचूनि दुधा मेळऊनि पाणी । फार कीजे ॥852॥ तैसें जी न बडबडीं । पदाची कोर न सांडी । परी मूळध्वनींचिये वाढी । निमित्त जालों ॥853॥ तंव श्रोते म्हणती राहें । कें परिहारा ठावो आहे । बिहिसी कां वायें । कविपोषका ॥854॥ तूतें श्रीमुरारी । म्हणितलें प्रकट करीं । जें अभिप्राय गव्हरीं । झांकिले आम्हीं ॥855॥ तें देवाचें मनोगत । दावित आहासी तूं मूर्त । हेंही म्हणतां चित्त । दाटैल तुझें ॥856॥ म्हणोनि असो हें न बोलों । परि साविया गा तोषलों । जे ज्ञानतरिये मेळविलों । श्रवणसुखाचिये ॥857॥ आतां इयावरी । जे तो श्रीहरी । बोलिला तें करीं । कथन वेगां ॥858॥ इया संतवाक्यासरिसें । म्हणितलें निवृत्तिदासें । जी अवधारा तरी ऐसें । बोलिलें देवें ॥859॥ म्हणती तुवां पांडवा । हा चिन्हसमुच्चयो आघवा । आयकिला तो जाणावा । अज्ञानभागु ॥860॥ इया अज्ञानविभागा । पाठी देऊनि पैं गा । ज्ञानविखीं चांगा । दृढा होईजे ॥861॥ मग निर्वाळिलेनि ज्ञानें । ज्ञेय भेदैल मनें । तें जाणावया अर्जुनें । आस केली ॥862॥ तंव सर्वज्ञांचा रावो । म्हणे जाणोनि तयाचा भावो । परिसें ज्ञेयाचा अभिप्रावो । सांगों आतां ॥863॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे
अर्थ
म्हणून अशा रीतीने (‘अज्ञानं यदतोऽन्यथा’ या पदाचे) मी विस्तारपूर्वक वर्णन केले. नाही तर दुधात पाणी मिसळून जसे दूध वाढवावयाचे ॥852॥ महाराज, त्याप्रमाणे (पाणी घालून दूध वाढविल्याप्रमाणे) मी बडबडत नाही. श्लोकांतील पदांची हद्द मी सोडीत नाही. परंतु मूळ श्लोकांत जे थोडक्यात सांगितले त्याचे विस्तारपूर्वक वर्णन करण्यास मी निमित्त झालो. ॥853॥ तेव्हा श्रवणास बसलेली संतमंडळी म्हणतात, थांब; परिहाराला जागा कोठे आहे? हे कविपोषका, (तू) व्यर्थ का भितोस? ॥854॥ ‘जे अभिप्राय आम्ही गीतारूपी गुहेत गुप्त ठेवले होते, ते तू प्रकट कर, असे तुला श्रीमुरारींनी सांगितले. ॥855॥ देवाचे गुप्त अभिप्राय तू प्रकट करावेस, हे जे देवांचे मनोगत, ते तू आपल्या वक्तृत्वाने (अज्ञानाची लक्षणे सांगण्याने) स्पष्ट दाखवीत आहेस, असे म्हणण्याने देखील तुझे चित्त (संतमंडळी माझी स्तुति करीत आहेत असे तुला वाटून) त्या भाराने दडपून जाईल. ॥856॥ म्हणून हे बोलत नाही, परंतु अरे, आम्हास सहज संतोष झाला आहे. कारण की, श्रवणसुखाच्या ज्ञानरूपी नौकेचा तू आम्हास योग करून दिला आहेस. ॥857॥ तर आता यानंतर तो श्रीहरी जे काही बोलला, ते लवकर सांग. ॥858॥ असे संतांनी सांगितल्याबरोबर निवृत्तिदास (ज्ञानेश्वरमहाराज) म्हणाले की, तर महाराज, ऐका, देव असे म्हणाले. ॥859॥ देव म्हणतात, अर्जुना, हा जो तू सर्व लक्षणांचा समुदाय ऐकलास, तो अज्ञानाचा भाग आहे असे समज. ॥860॥ अर्जुना, या अज्ञानभागाचा त्याग करून ज्ञानाविषयी चांगला दृढ हो. ॥861॥ मग या शुद्ध ज्ञानाच्या योगाने मनाचा ज्या ब्रह्मवस्तूत प्रवेश होईल, ते ज्ञेयस्वरूप जाणण्याची अर्जुनाने इच्छा केली. ॥862॥ तेव्हा सर्वज्ञांचे राजे, जे श्रीकृष्ण, ते अर्जुनाचा अभिप्राय जाणून म्हणतात, आता ज्ञेयाचे स्वरूप तू ऐक, आम्ही तुला सांगतो. ॥863॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : ऐलीचि थडी न पवतां, पळे जो माघौता


