हिमाली मुदखेडकर
भाग – 8
सकाळची प्रसन्न वेळ. कोवळे ऊन खिडकीतून आत येत होते. घरात प्रसन्न वातावरण. अनिकेत हॉलमधल्या सोफ्यावर बसला होता. हातात कॉफीचा कप आणि पुढ्यात वर्तमानपत्र. समोरच चार वर्षांचा चिमुकला संकर्षण लाकडी घोड्याशी खेळत होता… कधी घोड्यावर बसत होता… तर कधी तो स्वतःच एखादा राजा बनून युद्ध करत होता… स्वतःशीच मग्न… त्याचे खेळण्याचे आणि हसण्याचे आवाज घरात भरून राहिले होते.
अनिकेत त्याच्याकडे पाहत होता. डोळ्यांत पाणी तरळलं होतं.
तो काहीतरी गम्मत दाखवायला म्हणून अनिकेत जवळ आला आणि त्याच्याकडे पाहून म्हणाला,
“बाबा…”
“हं?”
“तू रडतोयस का?”
अनिकेत हसला.
“नाही रे…”
तो पुन्हा खेळण्यात रमला.
चार वर्षांचा त्याचा लेक त्याच्यासमोर खेळत होता. पण अनिकेतचं मन मात्र भूतकाळात हरवलं होतं. त्याच्या डोळ्यांसमोर मागची वर्षे पुन्हा उलगडू लागली. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर सगळ्यांनाच वाटलं होतं की आता सगळं सोपं होईल. पण प्रत्यक्षात मात्र ते तसं नव्हतं…
कायद्याची परवानगी मिळाली होती, आता सरोगेट आईचा शोध. अशी स्त्री शोधणं, जी संपूर्ण परिस्थिती समजून घेईल आणि कुठेही मानसिक गुंता न होऊ देता, हा संपूर्ण प्रवास स्वीकारेल, हे सोपं नव्हतं! अनेक महिलांची नावं समोर आली. काहींनी सुरुवातीला होकार दिला. पण केसची प्रसिद्धी पाहून मागे सरकल्या… काहींच्या कुटुंबीयांनी विरोध केला… काहींना समाजाची भीती वाटली…. काहींना स्वतःची!
हेही वाचा – संकर्षण… अनिकेतने कोर्टात मांडली ‘पित्या’ची भूमिका!
दिवसामागून दिवस जात होते. अनिकेत पुन्हा अस्वस्थ होऊ लागला. एकेदिवशी IVF केंद्रातून फोन आला. डॉक्टर मृणालिनी पाटीलचा आवाज होता.
“अनिकेत, एक योग्य उमेदवार मिळाली आहे.”
“खरंच?”
“हो.”
“तिला परिस्थितीचा पूर्ण अंदाज दिला असून ती विचारपूर्वक तयार झाली आहे.”
काही दिवसांनी त्याची तिच्याशी भेट करवून दिली गेली. तिचं नाव होतं माया. चाळीशीच्या आतली. विवाहित. दोन मुलांची आई. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. ती म्हणाली,
“मी तुमची केस वर्तमानपत्रात वाचली होती.”
“आणि मला वाटलं… कदाचित या जगात काही जन्म फक्त आई-वडिलांच्या इच्छेने होत नाहीत. काही जन्म नियती लिहिते.”
अनिकेत काही बोलू शकला नाही. त्याने फक्त नम्रपणे मान झुकवली.
पुढचे काही महिने वैद्यकीय तपासण्या, कागदपत्रे आणि कायदेशीर प्रक्रिया यात गेले. प्रत्येक टप्प्यावर काळजी घेतली जात होती. कारण आता चूक होण्याची परवानगी नव्हती. सहा वर्षे जपलेलं भ्रूण प्रयोगशाळेतून बाहेर येणार होतं.
तो दिवस अखेर आला…
भ्रूण प्रत्यारोपणाचा दिवस. अनिकेत हॉस्पिटलच्या प्रतीक्षागृहात बसला होता. त्याचे हात घामाने ओले झाले होते. त्याला अपघाताच्या दिवसाइतकाच ताण जाणवत होता. डॉक्टर मृणालिनी पाटील बाहेर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं.
“प्रक्रिया यशस्वी झाली.”
अनिकेतच्या डोळ्यांत आशेचा प्रकाश चमकला. डॉक्टर पुढे म्हणाल्या,
“आता पुढील काही दिवस प्रतीक्षा…”
पुढचे चौदा दिवस त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे दिवस होते… प्रत्येक फोनची रिंग… प्रत्येक संदेश… प्रत्येक क्षण… त्याचं मन सतत प्रार्थना करत होतं… आणि अखेर तपासणीचा अहवाल आला…
डॉक्टर मृणालिनींचा फोन…
“मिस्टर पुरंदरे… अभिनंदन!”
“प्रत्यारोपण पूर्णपणे यशस्वी झाले आहे.”
अनिकेतला कळेचना… त्याला आत्ता नेमके काय वाटते आहे! त्याच्या डोळ्यातून नकळतपणे अश्रू वाहू लागले होते. एकाच जागी कितीतरी वेळ तो निश्चल बसून होता. त्या रात्री तो सानिकाच्या फोटोसमोर बसला. खूप वेळ. काहीही न बोलता.
महिने पुढे सरकत गेले. प्रत्येक तपासणी एक नवीन आनंद घेऊन येत होती.
पहिला हृदयस्पंदनाचा आवाज… पहिला अल्ट्रासाऊंड… पहिली हालचाल… डॉक्टरांनी त्याला स्क्रीनवर स्पंदन दाखवलं. अनिकेत बराच वेळ त्याकडे पाहत राहिला.
“हा आहे तुमचा योद्धा!” डॉ. मृणालिनी हसून म्हणाल्या.
“योद्धा…” अनिकेत पुटपुटला.
शब्द त्याच्या मनात कुठेतरी घर करून गेला.
नऊ महिने पूर्ण झाले. प्रसूतीची तारीख जवळ आली. अनिकेतसाठी ही प्रतीक्षा एखाद्या तपश्चर्येपेक्षा कमी नव्हती. त्या दिवशी सकाळीच हॉस्पिटलमधून फोन आला…
“ताबडतोब या.”
तो जरा धास्तावला. हॉस्पिटलमध्ये पोहोचला. प्रसूती विभागाबाहेर तो एकटा बसला होता. चार वर्षांची न्यायालयीन लढाई… सहा वर्षांची प्रतीक्षा… सगळं त्या एका दरवाज्याच्या पलीकडे उभं होतं. घड्याळाची टिकटिक चालू होती. प्रत्येक मिनिट त्याला तासासारखं भासत होतं. तेवढ्यात…
अचानक आतून बाळाच्या रडण्याचा आवाज आला.
हेही वाचा – संकर्षण… अखेर कोर्टाचा निकाल आलाच!
अनिकेत जागेवर थिजून गेला. तो आवाज… त्याच्यासाठी तो आवाज जगातील सगळ्यात सुरेल आवाज होता. काही क्षणातच दरवाजा उघडला. डॉ. मृणालिनी बाहेर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता…
“अभिनंदन!” त्या हसत म्हणाल्या, “मुलगा झाला आहे.”
त्या क्षणी जणू काळ थांबला. त्याला सारं काही धुसर धुसर दिसू लागलं. डॉक्टरांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
“चला…”
तो आत गेला. नर्सने नवजात बाळ अलगद त्याच्या हातात दिले… इवलीशी बोटं… लालसर चेहरा… मिटलेले डोळे… आणि आयुष्यभरासाठी पुरेल एवढं अस्तित्व!
अनिकेतच्या हातात थरथर होती. अनिमीषपणे तो त्याच्याकडे पाहात राहिला… कितीही पाहिले तरी त्याचे समाधान काही होईना… त्याची जणू समाधी लागली होती!
त्याला त्यात सानिका दिसत होती. तिचं हसणं… तिचे डोळे… त्याला जाणवलं… ती इथेच आहे, या बाळाच्या रूपाने. त्याच्या डोळ्यांतून अश्रू गालावरून ओघळले. तो हळूवारपणे म्हणाला,
“सुस्वागतम्… खूप वाट पाहायला लावलीस रे…”
त्याची ही तंद्री आणखीही बराच वेळ तशीच राहिली असती. पण तेवढ्यात मागून एक ओळखीचा आवाज आला.
“आता नाव काय ठेवणार?”
ॲडव्होकेट विभा शेलार… त्या दाराशी उभ्या होत्या. डोळ्यांत आनंद, चेहऱ्यावर समाधान… अनिकेत मोकळेपणाने मनापासून हसला.
“तुम्हीच सुचवा.”
विभा काही क्षण त्या बाळाकडे पाहत राहिल्या. मग म्हणाल्या,
“या मुलाने जन्म घेण्यासाठी किती संघर्ष केला आहे, माहिती आहे का?”
“अपघाताशी संघर्ष… मृत्यूशी संघर्ष… कायद्याशी संघर्ष… समाजाशी संघर्ष… आणि सगळ्यात मोठा म्हणजे काळाशी संघर्ष! त्याची जन्माला येण्याची जिद्द अलौकिक आहे. ‘महाभारता’त एक व्यक्तिरेखा आहे – संकर्षण.”
अनिकेतने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.
विभा म्हणाल्या, “अर्थ — संघर्षातून बाहेर काढलेला… आकर्षून आणलेला… अनेक अडथळे पार करून जगात आलेला.”
त्यांनी बाळाच्या कपाळावर हलकेच हात ठेवला अन् म्हणाल्या, “माझ्या मते… याचं नाव संकर्षण असावं.”
अनिकेतने पुन्हा एकदा त्या छोट्याशा चेहऱ्याकडे पाहिलं.
“संकर्षण.”
त्याने प्रेमाने उच्चारलं.
“हो… संकर्षण.”
बाहेर लख्खं ऊन होतं… नव्या आयुष्याचं… नव्या सुरुवातीचं… नव्या आशेचं… अनिकेतने आपल्या मुलाला छातीशी घट्ट धरलं.
तो विभांना म्हणाला,
“ही लढाई जरी माझी आणि सानिकाची होती तरी, तुम्ही याचा अविभाज्य भाग होतात. तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं, म्हणून बाळाचे नाव ठेवण्याचा मान तुमचा! याला इतके समर्पक नाव देऊन तुम्ही आज जाणवून दिले की, तुम्ही वैयक्तिक पातळीवर या केसमध्ये किती गुंतला होतात…”
सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेचा आणि एका पित्याच्या अथक परिश्रमाचा हा शेवट नव्हता. ही एका पिता-पुत्राच्या प्रेमळ नात्याची सुरुवात होती…
समाप्त
(Disclaimer : ही कथा काल्पनिक असून याचा कोणत्याही घटना अथवा व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)


