अध्याय तेरावा
तरि देह हेंचि आत्मा । ऐसेया जो मनोधर्मा । वळघोनिया कर्मा । आरंभु करी ॥713॥ आणि उणें कां पुरें । जें जें कांहीं आचरे । तयाचेनि आविष्कारें । कुंथों लागे ॥714॥ डोईये ठेविलेनि भोजें । देवलविसें जेवीं फुंजे । तैसा विद्यावयसा माजे । उताणा चाले ॥715॥ म्हणे मीचि एकु आथी । माझांचि घरीं संपत्ती । माझी आचरती रीती । कोणा आहे ॥716॥ नाहीं माझेनि पाडें वाडु । मी सर्वज्ञु एकुचि रूढु । ऐसा गर्वतुष्टीगंडु । घेऊनि ठाके ॥717॥ व्याधि लागलिया माणुसा । नयेचि भोग दाऊं जैसा । निकें न साहे जो तैसा । पुढिलांचें ॥718॥ पैं गुण तेतुला खाय । स्नेह कीं जाळितु जाय । जेथ ठेविजे तेथ होय । मसीऐसें ॥719॥ जीवनें शिंपिला तिडपिडी । विजिला प्राण सांडीं । लागला तरी काडी । उरों नेदी ॥720॥ आळुमाळ प्रकाशु करी । तेतुलेनीचि उबारा धरी । तैसिया दीपाचिया परी । सुविद्यु जो ॥721॥ औषधाचेनि नांवें अमृतें । नवज्वरु जैसा आंबुथे । कां विषचि होऊनि परतें । सर्पा दूध ॥722॥ तैसा सद्गुणीं मत्सरु । व्युत्पत्ती अहंकारु । तपोज्ञानें अपारु । ताठा चढे ॥723॥ अंत्यु राणिवे बैसविला । आरें धारणु गिळिला । तैसा गर्वें फुगला । देखसी जो ॥724॥ जो लाटणें ऐसा न लवे । पाथरु तेवीं न द्रवे । गुणियासि नागवे । फोडसें जैसें ॥725॥ किंबहुना तयापासी । अज्ञान आहे वाढीसीं । हें निकरें गा तुजसीं । बोलत असों ॥726॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : लेंडिये आला लोंढा, न मनी वाळुवेचा वरांडा
अर्थ
तर देहच मी आहे अशा मनाच्या समजुतीवर स्वार होऊन, कर्म करण्य़ास आरंभ करतो ॥713॥ आणि त्याच्या हातून जे जे काही पूर्ण किंवा अपूर्ण कर्म घडते त्यामधे तो पूर्ण झालेल्या कर्माने गर्वाने फुगतो व अपूर्ण झालेल्या कर्मामुळे खंती करतो. ॥714॥ (देवीचा देव्हारा) डोक्यावर ठेवल्यावर देवर्षी जसा सहज घुमू लागतो, त्याप्रमाणे जो विद्येने व तारुण्याने मस्त होऊन छाती काढून चालतो ॥715॥ तो म्हणतो, जगात काय तो एक मीच (महत्वाचा मनुष्य) आहे, माझ्याच घरी सर्व संपत्ति आहे व माझी वागण्याची पद्धत दुसर्या कोणाला आहे? ॥716॥ माझ्यासारखा कोणी मोठा नाही. प्रसिद्ध असा सर्वज्ञ काय तो मीच एक आहे. अशा गर्वाने संतुष्ट झालेला ताठ होऊन रहातो. ॥717॥ रोग झालेल्या माणसाला विषय दाखवू नयेत (दाखवल्यास जशी त्याची तळमळ होते) त्याप्रमाणे ज्याला लोकांचे चांगले झालेले सहन खपत नाही ॥718॥ परंतु (जसा एखादा दिवा) वात तेवढी खातो, तेल जाळून टाकतो व जेथे तो ठेवावा तेथे काजळासारखे काळे होते. ॥719॥ पाणी शिंपल्याने तो तडतड करतो, वारा लागला तर विझून जातो. एखाद्या ठिकाणी लागला तर सर्व जाळून टाकतो, एक काडी उरू देत नाही. ॥720॥ थोडकासा प्रकाश करतो व तेवढ्यानेच उष्णता वाढवितो, त्या दिव्याप्रमाणे जो विद्वान असतो (म्हणजे ज्याला ज्ञान थोडे असते पण ताठा मोठा असतो) ॥721॥ नवज्वर झालेल्या माणसाला औषध म्हणून दूध दिले असता तो नवज्वर जसा वाढतो, अथवा सर्पाला दूध पाजले असता ते जसे विष होऊन उलटते ॥722॥ त्याप्रमाणे चांगल्या गुणांविषयी जो मत्सरी असतो, विद्वत्तेचा ज्याला अहंकार असतो आणि तपाने व ज्ञानाने ज्याला अमर्याद गर्व चढतो, ॥723॥ अंत्यजाला जसे राज्यावर बसवले म्हणजे तो गर्वाने फुगतो, अथवा अजगराने खांबाचे लाकूड गिळले असता तो जसा फुगतो. त्याप्रमाणे अभिमानाने फुगलेला जो तुला दिसेल ॥724॥ जो लाटण्यासारखा लवत नाही, दगडाप्रमाणे त्याला पाझर फुटत नाही, ज्याप्रमाणे फुरसे चावले असता मांत्रिकाला उतरवता येत नाही, (त्याप्रमाणे मोठा ज्ञाता देखील त्याला ताळ्यावर आणू शकत नाही). ॥725॥ फार काय सांगावे! त्याच्याजवळ अर्जुना, अज्ञान वाढत्या प्रमाणात आहे, हे तुला आम्ही निक्षून सांगतो. ॥726॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : जो अखंड भोग जचे, जया व्यसन काम्यक्रियेचें


