‘चीपर बाय द डझन’ ही चरित्रात्मक कादंबरी फ्रँक बंकर गिलब्रेथ (ज्यु.) आणि अर्नेस्टाइन गिलब्रेथ कॅरे या लेखकांनी त्यांच्या वडिलांवर आणि कुटुंबावर लिहिली आहे. याचा अनुवाद मंगला निगुडकर यांनी केला आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत राहणारे हे कुटुंब. त्यांचे वडील फ्रँक बंकर गिल्ब्रेथ औद्योगिक व्यवस्थापक आणि सल्लागार होते. आधी त्यांचा बांधकामाचा व्यवसाय होता. त्यांनी वेळ आणि गती या विषयाचा अभ्यास केला. कमीत कमी वेळात कमीत कमी कष्टांत जास्तीत जास्त काम करणे हे त्यांचे ध्येय होते. यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबात सुद्धा प्रयोग केले. ‘चीपर बाय द डझन’ नाव देण्याचे कारण त्यांना बारा मुले होती. एवढी मुले का? असे विचारल्यावर ते उत्तर देते, डझनावर घेतलं की स्वस्त पडतं म्हणून!
त्यांनी बारा मुलाचं संगोपन कसं केलं, यावर हे पुस्तक आहे. हलक्याफुलक्या विनोदी शैलीत लिहिले आहे. त्यांची आई लिलियन मोल्लर गिल्ब्रेथ अमेरिकेतली पहिली औद्योगिक व्यवस्थापन मानसचिकित्सक आणि इंजिनीअर (इंजिनीअरिंगची पदवी नसली तरी!) फ्रँक यांनी लिलियनच्या मदतीने संशोधन केले. मुलांना शिकवण्याची त्यांची खास पद्धत होती, त्यामुळे त्यांची मुले मधल्या एक एक यत्ता गाळून पुढच्या यत्तेत जात असत. गणितासारखा विषय खेळीमेळीने शिकवत असत. त्यांनी टंकलेखन आणि सांकेतिक लिपी अशीच शिकवली. त्यांनी भिंतींवर सगळी चिन्हं लिहून ठेवली. जातायेता मुलांच्या नजरेत येऊन त्यांना अक्षरे ओळखता येऊ लागली. त्यांनी जर्मन आणि फ्रेंच भाषा मुलांना आंघोळ करताना कॅसेट ऐकवून शिकवली. वेळ वाचवण्याचे प्रयोग ते सतत करत.
शर्टची बटने वरून खाली लावण्यापेक्षा खालून वर लावली तर दीड सेकंद वेळ वाचतो, हे त्यांनी दाखवले. ते घरी आल्यावर विशिष्ट शीळ घालत त्याबरोबर सगळी मुले दिवाणखान्यात येत. कमीतकमी वेळांत त्यांनी यावे, हा आग्रह असे. लेखकाने गमतीने लिहिले आहे, पप्पांना जुळे-तिळे झाले नाही, याचे दुख होते. खरंतर, बारा मुले एकदम व्हायला हवी होती, म्हणजे भरपूर वेळ आणि कष्ट वाचले असते!
हेही वाचा – Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने
एकदा शाळेत ते मुलांचा प्रवेश घेण्यासाठी गेले होते, तेव्हा कमीतकमी वेळात म्हणजे नव्वद सेकंदात आंघोळ कशी करायची, हे तंत्र शिक्षकांना दाखवले होते. घरात ते सभा भरवत. ते अध्यक्ष असत आणि सर्व सदस्यांना मत देण्याचा अधिकार असे. मुलांनी कामे वाटून घेतली पाहिजेत, घरकाम केले पाहिजे, याकडे कटाक्ष होता. त्यासाठी ते कामाचा लिलाव करत. जो कमीत कमी पैशांत काम करायला तयार होई, त्याला काम मिळे. प्रत्येक मोठ्या भावंडाला एक लहान भावंडाची जबाबदारी दिलेली होती. त्यांनी अनेक गमतीदार प्रसंग लिहिले आहेत. लिलियनकडे कुटुंब नियोजन कार्य करणारी स्त्री येते, तो प्रसंग तर फारच मजेशीर आहे.
शस्त्रक्रिया करण्याचे शूटींग मला करू दिलेत तर, कमीत कमी वेळात शस्त्रक्रिया कशी करू शकाल, हे मी तुम्हाला शिकवेन, असं ते डॉक्टरना म्हणाले; तेव्हा ते उत्तरले – आम्ही निर्जीव वस्तूंवर नाही माणसांवर काम करतो. फ्रँक यांनी विटा रचण्याचे तंत्र सुधारले. त्यामुळे दुप्पट काम तेवढ्या वेळेत होऊ लागले. या विषयावर त्यांचा प्रबंध आहे.
बारा मुले होऊ देण्याचे कारण म्हणजे दाम्पत्याचा युजेनिक्सवर असलेला विश्वास. चांगले गुण असलेला वंश टिकला पाहिजे, वाढला पाहिजे. कमजोर वंश नष्ट व्हायला हवा. हे विचार आता अजिबात पटत नाहीत (कारण त्यातून एक हिटलर घडला.) पण त्यावेळी अमेरिकेत युजेनिक्स मानणारे लोक होते.
मुलांना किती आनंदाचे बालपण देता येते, किती सुंदर आठवणी निर्माण करता येतात, हे पुस्तक वाचताना समजते. फ्रँकच्या गमतीशीर पद्धतीमुळे मुले अजिबात ताण न घेता शिकली. पालकत्व हा सध्या सर्वात चर्चिला जाणारा विषय आहे आणि over parenting, होम स्कूलिंग, नो स्कूलिंग सुद्धा.
हेही वाचा – Bookshelf : उद्या… कादंबरी वाचल्यावर निराशा दाटते
हे पुस्तक खूप गाजले, आजही वाचले जाते. यात दाखवलेली आई लिलियन मात्र प्रत्यक्षात तशी नव्हती. तिला घरगुती, व्यक्तिमत्व नसलेली स्त्री दाखवली आहे, पण प्रत्यक्षात ती अत्यंत बुद्धिमान स्त्री होती. सतत वीस वर्षं गर्भावस्था आणि बारा मुले असताना व्यवसाय सांभाळून मुलभूत संशोधन तिने केले, यातूनच तिच्याकडे असलेली अद्भुत क्षमता समजते तिला हूवर पारितोषिक मिळाले होते. तिचे व्यवस्थापनावरचे प्रबंध प्रसिद्ध आहेत. आपल्या किचनचे डिझाइन (किचनमधला त्रिकोण) तिनेच केलेले आहे. कॉफी ब्रेकची संकल्पना तिनेच मांडली. इतकेच नाही तर, कचऱ्याच्या डब्याला पेडल तिने लावले आणि फ्रीजला शेल्फसुद्धा. दिव्यांगांना किचन वापरता यावे म्हणून सुविधा केल्या. ती गृहव्यवस्थापनाला व्यवसाय मानत होती. त्यावेळी स्त्रियांना महत्त्व देण्याची पद्धत नव्हती. कदाचित, त्यामुळे लेखकांनी (लिलियनच्या दोन मुलांनी) तिचे महत्त्व फारसे सांगितले नसावे. पण ही मोठीच कमतरता या पुस्तकात मला जाणवली.
या पुस्तकावर दोन वेळा सिनेमा बनला आहे. चीपर बाय द डझन पुस्तक वाचायला हवे आणि मगच हवा तर सिनेमा पहावा.


