पंधरा दिवस धुवांधार कोसळत होता, त्यात आकाशवाणीवरील रेकॉर्डिंग! दिवस, वेळ मी माझ्या सोयीप्रमाणे… ‘हा नको तो’, करीत पक्का केलेला! त्यानुसार इतर कामांचं नियोजन केलेलं. पण पावसाची सोय कोण बघणार, त्याचं नियोजन कोण करणार! मुंबईभर पाणीच पाणी आणि मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळालेलं!
पण काय आश्चर्य रेकॉर्डिंगच्या दिवशी, डोळ्याला डोळा भिडवता येईल, अशी सौम्य चांदीची ताटली पूर्वेला दिसायला लागली! पाऊस पूर्ण थांबला नव्हता. मधेच ‘भ्वाक्’ करायला येत होता! पण एकंदरीत त्याचा तोरा उतरला होता!
अहो सांगायला लागले, “मी येतो तुझ्याबरोबर…”
घरची गाडी. चक्रधर जुना जाणता… कुटुंबातीलच एक झाल्यासारखा. ओळखीचा आकाशवाणीचा परिसर… सोबतीची खरंच गरज नव्हती. याआधी बरोबर आप्पा यायचे. पण त्यांची गोष्ट वेगळी, त्यांच्या लेखी मी कायम लहानच! पण आप्पा, आई गेले आणि मी अचानक मोठीच होऊन गेले! सोबतीला नवरा न्यायला मी लहान थोडीच होते!
“तुम्ही कशाला तुमचा वेळ फुकट घालवता! तुम्हाला कामं काय कमी आहेत का? आम्ही जाऊ!”
“नको, पावसाचं काही सांगता येत नाही! पाणी साठलं, तर अडकाल कुठेतरी…”
“हो, पण अडकलो तर आम्ही दोघेच अडकू! तुम्ही आलात तर तिघे अडकू ना!” मी माझं अंकगणित किती पक्कं आहे, ते दाखवून दिलं. पण आलेच ते! रेकॉर्डिंग सुरू असताना, कार्यक्रमाच्या संचालिकेबरोबर ते पण बसले होते ऐकायला!
हेही वाचा – …असंही घडू शकतं!
मी पहिली ओळ वाचल्यावर ती चिमुरडी म्हणाली, “मॅडमचा आवाज किती गोड आहे हो! त्या नेहमीच असं गोड बोललात काय हो?”
यांनी गंभीर पणे सांगितलं, “हो, मी सोडून सगळ्यांशी!”
बिचारी गोंधळून गेली, लहान होती, अविवाहित! नवरेलोकांचे टोमणे तिला काय कळणार? मग यांनी तिला समजावून सांगितलं, “मला नेहमी छडी घेऊन शिस्त लावत असते!”
अर्थात, हे सर्व त्यांनी मला घरी परत येताना गाडीत सांगितलं!
मुलं पण आतुर झालेली होती… त्यांचा पण फोन आला, “कसा झाला कार्यक्रम? आणि पपा, तुम्ही कशाला गेला होता आईबरोबर?”
यांनी काय सांगावं, “अरे, मला ‘गुमराह’मधला तो सीन खूप आवडतो! सुनील दत्त रेडिओ स्टेशनवर गात असतो आणि माला सिन्हा ऐकत असते! मला पण तसा अनुभव हवा होता! आई वाचतेय आणि मी तिथे कोचावर बसून ऐकतोय!”
मुलं हसायलाच लागली, “बाहेर अशोक कुमार पण ऐकत होता, हे विसरलात का? सिनेमात प्रियकर गातोय, त्याची प्रेयसी ऐकतेय आणि बाहेर तिचा नवरा उभा आहे!”
“इथे जर प्रेयसी वाचतेय, तिचा नवरा ऐकतोय, तर बाहेर तिच्या प्रियकराला उभं करायला हवं ना! नव्या काळातल्या नव्या सिनेमातील नवा सीन…”
हेही वाचा – तो भेटलाच नसता तर…
“पपा, तुम्ही आईला पुरेसा वेळ दिला नाहीत प्रियकर तयार करायला!” मुलांनी एकमुखाने सांगितलं! मुलं, पपा काय काय करू शकले असते, हे ‘च्यावच्याव’ करीत सांगायला लागली! पपांच्या ‘गुमराह’चा बोजवारा उडाला!
फोन माझ्या हातात देत… “घे! तूच बोल तुझ्या मुलांशी!” असं म्हणून ते खिडकीच्या बाहेर बघत बसले!”
मग काय, मांजा भरपूर होता… फिरकी घ्यायला सावज होतं… आणि आमची मेजोरिटी होती! मुंबईपासून ठाण्यापर्यंतचं अंतरही खूप होतं…!!


