मनोज जोशी
कुठे तरी फोनची बेल वाजत होती… वैतागून कुस बदलली अन् माझ्या लक्षात आलं की, माझाच फोन वाजतोय. मी झटकन फोन हातात घेतला, सासऱ्यांचा फोन… “अरे, तुम्हाला मुलगी झाली… बोल अनुराधाशी!” माझा आनंद गगनात मावेना!
“हॅलो, कशी आहेस? बरी आहेस ना?”
“हं… हं…”
सासऱ्यांनी पुन्हा फोन घेतला, “सिझेरीअन झालंय, त्यामुळे सध्या ती ग्लानीत आहे… नंतर बोलूया.”
मी “ठीक” बोलून फोन कट केला. सकाळचे साडेअकरा वाजले होते. नाइट शिफ्ट करून घरी आल्यावर ब्रश केल्यानंतर दोन-तीन कप चहा करून ठेवला होता. गोड म्हणून आता चहाच पिऊया आणि आंघोळपाणी आटोपून लगेच बाहेर पडूया… बेत आखला.
चहा पिता-पिता वर्षभराचा काळ डोळ्यासमोरून सरकला. मी या कंपनीत रुजू झालो. अनुराधा काही दिवस आधीच जॉइन झाली होती. कालांतराने आमच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांच्या घरून होकार आल्यावर लग्नाचा बारही उडाला होता. लग्न होऊन दोन-तीन महिने होत नाहीत, तोच अहमदाबादच्या ट्रान्स्फरची ऑर्डर आमच्या दोघांच्या हातात आली. आधी आमचा एक बॉस होता, लग्नाच्या धामधूमीतच त्याने जॉब चेंज केला. त्याचे या कंपनीच्या मॅनेजमेंटशी चांगले संबंध होते. आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर त्याने आपली पोझिशन बनवली होती. जाता जाता त्याने कंपनीच्या डायरेक्टरला सांगितलं की, “एखादा चांगला प्रोजेक्ट असेल तेव्हा, या महेश आणि अनुराधा यांचा पहिला विचार करा.” त्याचेच फलित आमची ट्रान्सफर होती.
ठरलेल्या तारखेला आम्ही अहदाबादच्या ऑफिसमध्ये जॉइन झालो. तिथल्या हंगामी बॉसने दोन दिवस गेल्यानंतर सांगितलं की, “प्रोजेक्ट अद्याप प्राथमिक अवस्थेत असल्याने तुमच्या दोघांपैकी एकानेच त्यावर काम करावे. त्यातही अनुराधा मॅडम तुम्ही तो चार्ज घ्या आणि महेश तुमची ज्येष्ठता लक्षात घेता, तुम्ही माझ्याबरोबर काम करा.” आम्ही ते मान्य केले. तसे पाहिले तर, आम्हाला वर्षभरच राहायचे होते. आम्ही पहिल्या दिवशीच डायरेक्टरची भेट घेऊन, तसं सांगितलं होतं आणि त्यांचंही ते म्हणणं होतं. ते म्हणाले, “आम्ही तुम्हाला तेव्हा थांबवणारही नाही.”
माझ्या आणि हंगामी बॉसच्या काही कुरबुरी सुरूच होत्या. त्याचा खुलासा नंतर झाला. कंपनी खूप जुनी होती, पण तिने एका प्रोजेक्टसाठी मुंबई आणि अहमदाबादला कार्यालये सुरू केली. मी मुंबईत जॉइन झालो. तर, काही काळानंतर तो अहमदाबादला जॉइन झाला. त्यात अहमदाबाद ऑफिसचा मुख्य बॉस सोडून गेल्यावर हंगामी जबाबदारी त्याच्याकडे सोपविण्यात आली. त्यातच मी तिथे आल्यानंतर सेवाज्येष्ठता आणि डायरेक्टरचा ‘विश्वास’ या दोन गोष्टींमुळे आपले अधिकार जातील, या भीतीने त्याला ग्रासले होते. त्यामुळेच त्याने मला त्या प्रोजेक्टवरून बाजूला केले होते! पण मी निश्चिंत होतो, मला त्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. मला मुंबईला परत यायचे होते.
काही महिन्यांनी अनुराधा प्रसूती रजेवर मुंबईला आली. तिथे तीन शिफ्टमध्ये काम चालायचे, मग तिसऱ्या शिफ्टकरिता माझं नाव फिक्स झालं. कंपनीकडून स्टाफसाठी बस सर्व्हिस होती. ऑफिसमधलाच एक सहकारी होता, अजय. त्याच्याशी चांगली मैत्री झाली होती. तोही मुंबईचाच होता. त्याच्या घराजवळ डोसेवाला होता. स्वस्तात पोटभर तिथे मिळते, असं त्याने सांगितलं. मग एक दिवस बस बदलली आणि त्याच्याबरोबर गेलो. पोटभर डोसे खाल्ल्यानंतर मी टमटम (सहा आसनी रिक्षा) पकडून घरी आलो. आठवड्यातून चार दिवस हे रुटिन झालं होतं. घरी आल्यावर तीन-चार कप चहा करायचा. एक कप चहा झाल्यावर मस्त ताणून द्यायची… असा दिनक्रम.
शनिवार म्हणजे साप्ताहिक सुट्टी. लेकीचा जन्मही शनिवारीच! त्यामुळे रात्री ऑफिसला जायचं नव्हतं म्हणून निवांत झोपलो असतानाच, सासऱ्यांचा फोन आला… पटकन आटोपून घराबाहेर पडलो. घराजवळ एक किराणा दुकान होते. त्याचा मालक आम्हाला ओळखत होता. माझी आणि त्याची चांगली मैत्रीही झाली होती. मुलगी झाल्याची बातमी त्याला सर्वात आधी दिली. नंतर एका मॉलमध्ये जाऊन सॉफ्ट टाइज बाहुली घेऊन आलो. मिठाईचा एक बॉक्स घेतला आणि त्या किराणा दुकानदाराला दिला.
हेही वाचा – असंच काहीसं आवडलेलं…
ऑफिसच्या बसचा स्टॉप घराजवळच होता. बस यायला अर्धा तास होता. मी पटकन घरी जाऊन बाहुली ठेवून बसस्टॉपवर आलो. तिथे हंगामी बॉस उभा होता. त्याचं घरीही जवळच होतं. त्याला मी कन्यारत्न झाल्याची बातमी सांगितली. त्याने कोरडेपणाने अभिनंदन करून विचारलं की, “मग मुंबईला कधी जाताय?” मी म्हणालो, “उद्या तुमची सुट्टी आहे आणि माझी ड्युटी, त्यामुळे मी उद्या ड्युटी करतो. म्हणजे, तुम्हाला सुट्टीच्या दिवशी कामावर यायला नको.” तो म्हणालो, “माझा विचार करू नका. तुम्ही आजच मुंबईला जा. मी इथलं सांभाळतो.”
मी ‘नको’ म्हटलं. ”मी सोमवारी निघतो. लेकीचं बारसं करतो आणि लगेच दिवाळीही आहे, ती करून मी हजर होतो.”
“बघा कसं काय ते! माझा अजूनही सल्ला, तुम्ही आजच रवाना व्हा, हा आहे.”
पण मी ठाम राहिलो. मी लगेच सोमवारचं ट्रेनचं रिझर्व्हेशन केलं. तसा मेसेजही हंगामी बॉसला केला. त्याने तो पाहिला, पण रिप्लाय केला नाही.
मी सोमवारी रात्री ट्रेनमध्ये बसलो, दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबई. घरी येऊन, बॅग ठेवून आंघोळपाणी उरकून थेट सासुरवाडी गेलो, लेकीला बघायला! रोज सकाळी सासुरवाडी आणि रात्री घरी… असा दिनक्रम सुरू झाला. यादरम्यान, मी आजारपणाचं डॉक्टर सर्टिफिकेट कंपनीला मेल केलं. पण मुंबईला पोहोचल्याच्या पाचव्या दिवशीच कंपनीची नोटीस आली, ‘उद्याच्या उद्या कामावर हजर व्हा.’ तिथल्या डॉक्टरांकडून माझी तपासणी होणार होती.
मी न जाण्यावर ठाम राहिलो. लेकीचं बारसं, दिवाळी (लेकीबरोबरची पहिलीच) उरकून मी अहमदाबादला रवाना झालो. माझी एक मैत्रीण आहे, तिची स्वत:ची लॅब आहे. तिच्याकडून मी आधीच्या तारखेचा एक ब्लड-रिपोर्टही तयार करून घेतला. तिथे गेल्यावर मेडिकल टेस्ट झाली. डॉक्टर म्हणाले, “तुमचा ब्लड-रिपोर्ट बरोबर आहे, पण तरीही आम्हाला संशय आहे!”
करायचं काय? कंपनीतही मोठी घडामोड घडली होती, डायरेक्टरची उचलबांगडी करून त्या जागी, मालकानं एक वशिल्याचं तट्टू आणून बसवलं होतं. मी तिथून बाबांना फोन लावला आणि डॉक्टरांचं म्हणणं सांगितलं. ते म्हणाले, “राजीनामा दे आणि परत मुंबईला ये. येथे नोकरीच्या भरपूर संधी आहेत. कुठे ना कुठे तरी मिळेल…”
हेही वाचा – सेम टू सेम!
मी थेट एचआरकडे गेलो. त्याच्याकडून एक कोरा कागद घेऊन, राजीनामा लिहिला. यादरम्यान त्याने हंगामी बॉसला बोलावून घेतले. मी राजीनाम्याचे पत्र एचआरकडे दिले. त्याची माझ्यावरची नजर हटत नव्हती. अहमदाबादला आल्यापासून त्याच्याशी माझे चांगले संबंध होते. शिवाय, डायरेक्टरनेही त्याला फोन करून मला पूर्ण मदत करण्याची सूचना केली होती. मला तो म्हणाला, “सर, आप को बेटी हुई, बहुत खुशी की बात हैं… लेकीन आप ने एक गलती की, छुट्टी पर जाने से पहिले इनको बताना चाहिए था…” त्याने हंगामी बॉसकडे हाताने इशारा केला अन् मला सर्व गोष्टींचा उलगडा झाला… मी हसलो आणि एचआरला म्हणालो, “मैं इनको बस स्टॉप पर मिला था और सोमवार को मुंबई जा रहा हूं यह बताया था… इन्होंने तो शनिवार को ही जाने का आग्रह किया था…“ . एचआरने बघताच हंगामी बॉस कावराबावरा झाला…
मी उठलो आणि तडक घरी येऊन आवराआवर सुरू केली… लेकीबरोबर राहण्याचे वेध लागले होते…


