नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
कोजागरी पौर्णिमा झाली. आता तिचं अप्रूप राहिलं नाही. कारण माझ्या लहानपणासारखी कोजागरी पौर्णिमा आता कोणी साजरी करत नाहीत. कसली धम्माल करायचो आम्ही! आई, मोठी आई म्हणजे माझी आजी. दिवसभर घरात खपून कितीतरी पदार्थ बनवायच्या. बटाटे वडे, कांदा भजी, कांदे पोहे, गोडाचा शिरा…
नंतर आईने एक पदार्थ अजून बनवायला सुरुवात केली. भरलं पापलेट! हे सगळे पदार्थ डब्यांमध्ये नीट भरायचे. एका मोठ्या काचेच्या बरणीत प्यायचं पाणी भरायचं. वर्तमानपत्र, चादरी, ताटल्या, चमचे, ग्लासेस असे सगळं सामान पिशव्यांमध्ये भरायचं आणि संध्याकाळची वाट बघायची… म्हणजे आप्पांची ऑफिसमधून घरी येण्याची. आम्ही तयारीतच असायचो. आप्पा आले की, थोडे फ्रेश व्हायचे, चहा पिऊन. आम्ही सगळे जण निघायचो, गिरगाव चौपाटीला. आम्ही घरातलेच 9-10 जण असायचो. छान जागा बघून सतरंजी पसरून आई आणि मोठी आई पिशव्यांमधून डबे बाहेर काढायच्या. आम्ही मात्र बाकीचे सगळे जण खेळण्यामध्ये मग्न…
हेही वाचा – 10 साल जवान कर दिया…
आजुबाजूला देखील खूप सारे ग्रुप्स असायचे. अगदी फार लांबून ट्रकमध्ये बसून संपूर्ण चाळच्या चाळ चौपाटीला येत असे. तिथे खूप ओळखी व्हायच्या. नवीन, जुने खेळ एकत्र जमून खेळले जायचे. मग हात-पाय धुऊन ताटं भरली जायची. मस्त अंगत पंगत व्हायची… आजुबाजूच्या नवीन ओळख झालेल्या लोकांमध्ये पण देवाण-घेवाण व्हायची…
तेव्हा मोबाइल काय साधे फोन पण नव्हते सगळीकडे आलेले… त्यामुळे नवीन मैत्रिणींना पुढल्या वर्षी पुन्हा भेटायचं वचन देऊन, निरोप घेऊन घरी परतायचं. कोजागरीच्या रात्रीच्या चौपाटीवरच्या आठवणी कितीतरी दिवस चघळत रहायच्या. हळूहळू दिवाळीचे वेध लागायचे आणि कोजागरी पौर्णिमा एक आठवण बनून रहायची. आजही एक आठवणच आहे! पण ती वेळ, ती गंमत पुन्हा येणे नाही… कारण आता तसा प्रघातच राहिला नाही. हं… कोजागिरी आता आठवणीतच…
हेही वाचा – माझे आजी-आजोबा आणि गणगोत
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
https://whatsapp.com/channel/0029VbAtufJ65yDINAO9Ad2H
या लिंकला क्लिक करून WhatsApp Channel जॉइन करा.


