पूर्वार्ध
पहाटेच्या अंधुक उजेडात सदानंदनं मुक्ताचा हात आणखी घट्ट धरला. घराच्या छपरावरून खाली पाहताना गाव जवळपास दिसेनासं झालं होतं. विहिरीचं पाणी, नदीचं पाणी आणि अंगणातलं पाणी आता एक झालं होतं. समोरून बचावाची नाव घराकडे येत होती. मुक्ताला आधी नावेत बसवून सदानंद मागे वळला, तेव्हा भिंतीवरच्या उंच फळीवर ठेवलेला देव्हारा अचानक पाण्यात कलंडला… त्याच्या ओठांवरून नकळत रामाचं नाव बाहेर पडलं.
काही क्षणांतच घराची मागची भिंत कोसळली. त्या भयानक आवाजात सदानंदच्या वडिलांनी आयुष्यभर कष्ट करून उभा केलेला सारा संसार डोळ्यांदेखत वाहून गेला.
शहरात आल्यावर पहिली छोटीशी खोली मिळाली, तेव्हा मुक्तानं श्रद्धेने तो उंबरठा पाण्याने पुसला. सदानंदला एका धान्याच्या दुकानात हमाली मिळाली आणि मुक्ता चार घरी स्वयंपाक करू लागली. उधारीवर घेतलेला छोटासा दिवा तिनं कोनाड्यात ठेवला.
“हळूहळू सगळं पुन्हा जमेल,” ती त्याला समजावत म्हणाली.
मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. चार महिन्यांनी घरमालकाच्या लोखंडी जिन्याच्या दुरुस्तीतून उडालेल्या ठिणग्यांनी खाली ठेवलेल्या जुन्या सामानाला अचानक आग लागली. पाहता पाहता ती आग त्यांच्या खोलीपर्यंत पोहोचली. दोघेही कामावर गेले होते. परत आले, तेव्हा केवळ राख उरली होती. सदानंदच्या हातात अर्धवट जळलेला चहाचा कप आला. मुक्ता त्याच्या कानापाशी बराच वेळ काहीतरी बोलत होती, पण त्याला शब्द ऐकू येत नव्हते. त्याचे कान बधीर झाले होते आणि मन सुन्न.
त्यानंतर मात्र त्याला प्रत्येक छोट्याशा आवाजात पुढच्या संकटाची चाहूल अगोदर लागू लागली. कामावर जाताना प्रत्येक गोष्टीत त्याला अपशकुन दिसू लागला. कुणी एखाद्या पत्रिका पाहणाऱ्याचे नाव सांगितले की, तो तिथे धाव घेऊ लागला. दिवसाची तुटपुंजी मजुरी भविष्य ऐकण्यात आणि खोटे समाधान मिळवण्यात जाऊ लागली.
एका रात्री मुक्तानं त्याच्यासमोर भाकरी ठेवली. “सदू, मला रडू येतंय. माझ्याशी थोडं तरी बोल. उद्या काय करायचं ते आपण दोघं मिळून ठरवू.”
पण सदानंद तिचे ऐकण्याऐवजी स्वतःच्याच विश्वात हरवला होता. तो पत्रिकेच्या घड्या उघडत होता आणि ग्रहस्थितीचा विचार करत होता.
हेही वाचा – ‘कुब्जा’… कृष्णप्रेम माझ्यास्तव!
काही दिवसांनी मुक्तानं अंथरूण धरलं. करायला कोणीच नव्हतं आणि सदूही लक्षच देईना. अखेर कंटाळून मुक्ता माहेरी गेली. जाताना म्हणाली, “जरा सावरले की परत येईन. तूही स्वतःची काळजी घे.” तिच्या आवाजातली ओढ, प्रेम आणि असहायता सदानंदला त्यावेळी अजिबात ओळखता आली नाही.
एक दिवस पांड्या स्वामींच्या बैठकीत सदानंद पोहोचला, तेव्हा त्याच्या खिशात तीच जुनी पत्रिका आणि परतीच्या प्रवासापुरते पैसे होते. पांड्या स्वामींनी भिंग जवळ ओढले, पुन्हा ग्रह मोजले…
“मेष लग्न… चतुर्थात कर्केचा नीच मंगळ… चतुर्थेश चंद्र… द्वादशात धनेश आणि सप्तमेश शुक्र कन्येत… षष्ठभावात. अष्टमात शनी आणि केतू… त्यात केतूची महादशा आणि शनीची अंतर्दशा…”
त्यांनी काही काळ पत्रिकेकडे एकटक पाहिले. घरसुख, खर्च, कर्ज आणि संकटे यांचा संबंध त्या ग्रहस्थितीशी जोडताना त्यांचे बोलणे अधिक गंभीर होत गेले…
“दारिद्र्य फार छळणार. अपमृत्यूचीही शक्यता मला स्पष्ट दिसते.”
दाराबाहेर आल्यावर सदानंद बराच वेळ भिंतीला टेकून सुन्नपणे बसला. आगीपासून तो वाचला होता, पण त्या एका वाक्यानंतर जगण्याची उरलीसुरली उमेदही संपून गेली. पुन्हा एखादे नुकसान झाले की, तो पांड्या स्वामींकडे जाई. पत्रिका तीच असायची, पण तिच्याविषयीची भीती प्रत्येक भेटीत आणखी गडद होई.
शांताकाकूंनी सदानंदला आपल्या चाळीतील एक खोली राहायला दिली होती. त्यांचा घरगुती भोजनाचा व्यवसाय होता. भाडे थकले की सदू लपून बसे. एका दुपारी त्यांनी त्याच्या दारात जेवणाचे ताट ठेवले.
“उद्या माझ्याबरोबर चल. आनंदस्वामींची भेट घेऊ.”
“माझी पत्रिका पाहून तेही तेच सांगतील…” सदानंद निराशेतून म्हणाला.
“तू तरी सगळं ठरवून बसू नकोस. आधी भेटू या.”
दुसऱ्या दिवशी आश्रमात सदानंदनं आपली पत्रिका आनंदस्वामींपुढे ठेवली. त्यांनी ती पत्रिका बाजूला ठेवली आणि सदानंदकडे बराच वेळ अत्यंत भेदक नजरेने पाहिले…
“काय काम करता येतं तुला?”
“सध्या हमाली करतोय. गावाकडं गाडीही चालवायचो.”
“मग तुझे हात रिकामे कुठं आहेत? मला तर तुझ्या दारात गाड्या दिसताहेत. मोठं घर दिसतंय. माणसांना काम देणारा सदानंद दिसतोय.”
सदूला रडू कोसळले.
“महाराज, अंगावरच्या कपड्यांखेरीज माझं काही उरलं नाही.”
“ते मला कळतंय. घर गेल्याचं दुःख आहे. मुक्ताही दूर आहे. पण पुढचं सगळंही संपलं, असं तू आजच ठरवतो आहेस. आधी इथं बस, पाणी पी.”
त्यांनी त्याच्या खांद्यावर अत्यंत मायेने हात ठेवला.
“एक कोटी रामनामाचा संकल्प कर. त्याला लागेल तेवढा काळ दे. सकाळ-संध्याकाळ ठरवून बसायचं. दिवसा काम शोधायचं. रोजच्या कमाईचा आणि खर्चाचा हिशेब लिहायचा आणि आश्रमात आलास की, सेवेत हात गुंतवायचा.”
“जपामुळे सगळे दोष जातील?” सदूने साशंकतेने विचारले.
“तुझ्या हातात जे बदलणं शक्य आहे, तिथून सुरुवात करू. नाम घेताना भीती थोडी निवली, की त्या शांत मनानं कामाला लाग. खोटं बोलणं, दुसऱ्याचा पैसा लाटणं, लुबाडणं, अडवणं आणि आयत्या लाभाची हाव हे दोष तुझ्या आचरणात मात्र कधीच येऊ देऊ नकोस. बाकी माझ्यावर सोड! ”
आनंदस्वामींनी खिशातून शंभर रुपयांची एक नोट सदानंदसमोर ठेवली. सदूने नम्रपणे ती हातात घेतली. स्वामी म्हणाले, “सदू, ही लक्ष्मी आहे. कुठेही कशीही व्यर्थ उधळू नकोस. आधी या श्री लक्ष्मीची क्षमा माग आणि मग हे पैसे खिशात ठेव. ज्या पैशाला श्रमाची जोड नसते, तो पैसा टिकत नाही.”
त्या दिवसापासून शांताकाकू आईच्या धाकाने त्याला पहाटे उठवत. आधी सदू जपातही आपली संकटेच मोजत बसे. पण हळूहळू रामाचे नाव त्याला स्पष्ट ऐकू येऊ लागले. माळ संपली की, तो धान्याच्या दुकानात जाई. संध्याकाळी काकूंच्या जेवणाचे डबे पोहोचवी. रुग्णालयातल्या एकेका वृद्धाला डबा उघडून द्यायला आणखी थोडावेळ थांबताना, त्याला स्वतःच्या काळजीतून थोडा विरंगुळा मिळे.
एका व्यापाऱ्याने एकदा चुकून त्याला अधिक पैसे दिले. सदूने दुसऱ्या दिवशी जाऊन ते प्रामाणिकपणे परत केले. व्यापाऱ्याने त्याच्याकडे आश्चर्याने आणि नव्या विश्वासाने पाहिले. पुढे त्याच्याकडून सदानंदला नियमित काम मिळू लागले.
त्या काळात त्याने मुक्ताला पत्रे लिहिली. पहिल्या पत्रात त्याने तिच्या कष्टांविषयी विचारले. तिचे उत्तर आले, तेव्हा तो बराच वेळ ते हातात धरून बसला. तिने स्वतःच्या कामाची माहिती लिहिली होती. शेवटी एक ओळ होती, “तुझी काळजी घेणं म्हणजे माझी काळजी घेणं आहे, हे आता तरी लक्षात ठेव.” त्याने ते पत्र चक्क देव्हाऱ्यात जपून ठेवले.
साडेतीन वर्षांनी एक कोटी जप पूर्ण झाला, तेव्हा आश्रमात सदूने नेहमीप्रमाणे भांडी घासली. आनंदस्वामींनी विचारले, “सदानंदा, आज माळेतला शेवटचा मणी फिरवताना काय वाटलं?”
“उद्या पुन्हा पहिल्यापासून नाम घ्यावंसं वाटलं.”
स्वामी हसले… “बरं आहे. ही मोजणी पूर्ण झाली, आता न मोजता ही सवय जप.”
त्याच सुमारास कर्जाने घेतलेल्या छोट्या मालवाहू गाडीचे काम सुरू झाले. पहाटे भाजी, दुपारी धान्य आणि संध्याकाळी भोजनाचे डबे; सदूच्या हातात पुन्हा थोडी कमाई राहू लागली. पण एका पावसाळी रात्री, वळणावर अचानक आलेल्या वाहनाला चुकवताना त्याची गाडी रस्त्याच्या कडेला आदळली. मालाचे नुकसान झाले. त्याच्या हाताला आणि बरगड्यांना मोठी दुखापत झाली. उपचार, गाडीची दुरुस्ती आणि थांबलेले काम यात त्याचे साठवलेले सगळे पैसे संपले.
शांताकाकू त्याला पुन्हा स्वामींकडे घेऊन गेल्या…
“महाराज, हा कसाबसा वाचला. आता पुन्हा कर्जात पडलाय. एवढं वाईट नशीब कसं?”
स्वामींनी त्याच्या दुखऱ्या हाताकडे पाहिले.
“औषधं वेळेवर घेतोस ना? आधी डॉक्टरांनी सांगितलेली विश्रांती घे. गाडीचा विमा, मालाचा हिशेब, कर्जदारांशी बोलणं ही कामं आपण कोणाच्या तरी मदतीने करून घेऊ. यावेळी सगळं एकट्यानं पेलायचं नाही.”
“पण माझ्या गाड्या तुम्हाला दिसल्या होत्या…” सदू निराश स्वरात रडत म्हणाला.
“अरे, आजही दिसताहेत. शिवाय, तुझी काम करण्याची तयारी मला दिसते आहे. तिची काळजी घे. साधं शाकाहारी अन्न घे. मद्यापासून दूर राहा. मन हलकं झालं की, निर्णय नीट घेता येतील. नाम चालू ठेव.”
बरे होईपर्यंत सदू काकूंच्या व्यवसायाचा हिशेब पाहू लागला. ग्राहकांच्या देयकांची नोंद केली. कुठे खर्च वाया जातो, कुठे माल वेळेत पोहोचत नाही, हे त्याच्या लक्षात येऊ लागले. हाताला पूर्ण बळ आले, तेव्हा त्याच्याजवळ आणखी एक नवे काम शिकलेले होते.
हेही वाचा – भय
याच दिवसांत एका ओळखीच्या माणसाच्या आग्रहाने घेतलेल्या लॉटरीच्या तिकिटाला त्याला दहा हजार रुपयांचे बक्षीस लागले. कित्येक दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर इतके मोठे हसू आले होते.
“चल, स्वामींना सांगून येऊ,” काकू म्हणाल्या.
स्वामींनी बातमी ऐकली आणि सदूच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहिले…
“ही रक्कम स्वतःसाठी वापरू नकोस.”
सदूचा चेहरा पडला. “माझे हप्ते भरता येतील.”
“आज हप्ता भरशील. उद्या पुन्हा असंच मिळावं, म्हणून आणखी तिकिटं घ्यावीशी वाटतील. तुझ्यासाठी ही वाट घसरणीची ठरू शकते. तुझं घर तुझ्या विश्वासार्ह कामातून वाढू दे. यातून नाही.”
“मग या पैशांचं काय करू?”
“अनोळखी गरजूंना उपयोगी पडतील असं काही कर. घरी किंवा कुठेही एखाद्या जनावराच्या संगोपनाची जबाबदारी घेणं शक्य असेल तर ते कर. विचार करून ठरव. काय केलंस ते मला सांगायला येण्याची गरज नाही. पुढचं तिकीट घेण्याचा मोह मात्र इथंच ठेवून जा.”
सदू बाहेर आला. रात्री त्याने कर्जाची वही उघडली. बक्षिसाच्या रकमेतून हप्ता भरावा, याच विचाराने बराच वेळ झोप लागली नाही. पण दुसऱ्या दिवशी मात्र त्याने रुग्णालयातील गरजू रुग्णांच्या भोजनासाठी ती रक्कम दान केली. नाव लिहून घेणाऱ्या कारकुनाला तो म्हणाला, “देणाऱ्याच्या नावाऐवजी रामाचं नाव लिहा.”
बाहेर पडताना त्याला पुढच्या हप्त्यासाठी अजून काम शोधावे लागणार होते. पण तिकीटविक्रेत्याच्या दुकानापाशी तो क्षणभरही थांबला नाही.


