गोरेगाव मेट्रो प्लॅटफॉर्मवर मी उभी होते. दुपारची वेळ. फारशी गर्दी नव्हती. वाट पहात असताना अचानक बाजूला लक्ष गेले. संकेत आहे का तो? थोडा रोडावला होता. पण तो निश्चित संकेतच… मी त्याच्या जवळ गेले आणि हळूच म्हणाले,
“संकेत…”
तो चटकन वळला.
“कल्पू तू? आज इथे?”
“मी मावशीकडे आले होते, परत चालले… तू?”
“माझा जॉब इथेच आहे… रोजची हीच वेळ माझी घरी जायची.”
“घरी? आई बरी आहे का रे तुझी?”
“आई गेली गेल्यावर्षी…”
“अरेरे! पण तशी चांगली होती ना ती… काय झाले?”
“माझी काळजी तिला… माझं लग्न होत नाही आणि मला नोकरी पण मिळत नव्हती त्यावेळी…”
“चल कॉफी घेऊ… इथे छान कॅफे आहे.”
“चल…”
प्लॅटफॉर्मला लागून असलेल्या कॅफेमध्ये आम्ही दोघे गेलो. फारशी गर्दी नव्हती. कोपऱ्यातील एक टेबल पकडून आम्ही दोघे बसलो.
“आई आठवण काढायची काय रे माझी?”
संकेतच्या डोळ्यात पाणी तरारलेले मी पाहिले. मी पटकन त्याचा हात पकडला.
“आठवण आली का आईची?”
“हो.”
“पण माझी आठवण काढायची का?”
तो मान हलवत “हो हो” म्हणाला.
“काय म्हणायची?”
“कल्पना एकदम यायची का बंद झाली? असे विचारायची.”
“मग तू काय सांगायचास.”
“काय सांगणार? तिची मर्जी असे सांगितलं तिला.”
“मग तू लग्न केल नाहीस अजून?”
“हो, केलं ना! सहा महिने झाले…”
“कशी आहे रे बायको तुझी? माझ्यापेक्षा बरी असेल ना? फोटो असेल तर दाखव ना…”
हेही वाचा – …अन् वन्स मोअरने अर्जुनचं भाग्यच पालटलं!
“हो हो” म्हणत संकेतने मोबाइल उघडला आणि एका सुंदर मुलीचा फोटो दाखवला.
“छानच आहे रे… बरं झालं आपलं झालं नाही.”
“असं का म्हणतेस?”
“नाहीतर अशी सुंदर बायको तुला कशी मिळाली असती?”
“पण कल्पू… तू… तुझं…?”
“माझं ठरलंय. येत्या दोन महिन्यांत होईल, म्हणजे यशला रजा मिळाली की, तो भारतात येईल, आणि मग…”
“म्हणजे परदेशात असतो का तुझा यश?”
“हो, कॅनडात. लग्न झाले की, मी पण कॅनडात जाईन.”
“बरं झालं… आपलं जमलं नाही! नाहीतर तुला कॅनडात कुठे जाता आलं असतं? इथे या मुंबईत धक्के खात खात…”
“आणि तुझी बायको… काय नाव तिचं? जॉब करते का?”
“समीरा… तिचं नाव. एका विदेशी बँकेत आहे फोर्टला.”
“आणि तू?”
“मी एका फायनान्स कंपनीत आहे.”
“एकंदर तुझं छान चाललंय संकेत…”
“हो. छानच म्हणायचं. दोघांनाही जॉब्स… शिवाय मुंबईत घर आहेच ना!”
“आणि तुझी बायको समीरा दिसायला पण सुंदर… पण संकेत, माझी आठवण येते का कधी?”
कॉफीचा मग ओठाला लावलेला संकेत एकदम गडबडला… त्याला ठसका लागला. कॉफी त्याच्या शर्टवर पडली…
“काय झालं? समीराने आठवण काढली बहुतेक…”
“ती कशी काढेल?”
“म्हणजे?”
“म्हणजे, यावेळी त्यांचा पीक आवर असतो. आठवण काढायला उसंतच नसते…”
“मग कोण आठवण काढील?”
“जाऊदे कल्पू. तू भेटलीस हे बरे झाले… पुन्हा कधी तू भेटशील असे वाटले नव्हते. पण मला सांगायचे होते.. तुझा मोबाइल सतत बंद…”
“मी माझा नंबर बदलला संकेत… मुंबईतून गेले तेव्हाच…”
“तरीच! मी परत परत फोन लावत होतो… तुझी क्षमा मागायची होती, पण…”
“काय सांगायचं होतं? ट्रेन सुटण्याची वेळ दोन दोन वेळा सांगूनही तू स्टेशनवर आला नाहीस. माझे पप्पा मला न्यायला मुंबईत आले होते, तुझी त्यांच्याशी ओळख करून देणार होते, पण…”
“काय करू कल्पू! तुला माहीत होतं, माझे क्रिकेटवेड. त्या वेडापायी मला दुसरे काही दिसायचे नाही. तू सोलापूरला जाणार होतीस, त्याची वेळ तू सांगितली होतीस… पण माझी मॅच होती खार जिमखान्यावर… ती लांबली. त्यात आमचे मोबाइल आमच्या कोचकडे… मॅच सुरू असताना मोबाइलला हात लावायचा नसतो. त्यामुळे तुला फोन पण करता आला नाही…”
“पण त्यामुळे बाबांचा गैरसमज झाला. ते म्हणाले, ‘हा लोफर मुलगा दिसतो. जो साधा फोनही करत नाही.’ मी खूप रडले. बाबा म्हणाले, ‘तुम्हा तरुणांना प्रेमापुढे काही दिसत नाही. तू चुकीच्या माणसाला निवडलंस…’”
“मग… सोलापुरात गेल्यावर?”
“आई म्हणाली, तुझं नृत्य अर्धवट राहिलंय. लग्न वगैरे बाजूला ठेव आणि नृत्याला शरण जा. मलाही ते पटलं. शेवटी करिअर पण महत्त्वाचे. मी दिल्लीला बिरजू महाराज संस्थेत जायचा निर्णय घेतला. त्यासाठी तुला विसरायचं होतं. म्हणून फोन नंबर बदलला. त्या बदललेल्या फोन नंबरमुळे आपलं आयुष्य बदललं…”
“हो ना! असंच असतं आयुष्य… तू सोलापूरची, मी मुंबईचा.. पण तू मॅनेजमेंट शिकायला म्हणून मुंबईत आलीस..”
“आणि तू क्रिकेटचा हीरो… दर दोन दिवसांनी तुझे फोटो कॉलेजच्या बॉर्डवर! तुझी ओळख वाढवली मी…”
“मला पण तू आवडलीस… गॅदरिंगमध्ये उत्कृष्ट नृत्य करणारी… छान गाणी म्हणणारी…”
“मग आपला ग्रुप कॉलेजशेजारील विश्वास कॅफेमध्ये लस्सी पित.. धमाल करत… त्या काळात आपण जवळ आलो… तुझ्या बाईकवरून आपण भटकायचो.”
“होय… आपल्या ग्रुपने आपले नाव ठेवलेले – ‘दोन स्पेशल’!”
“हो हो… दोन स्पेशल…”
संकेतच्या डोळ्यात पाणी तरारले. माझ्याही डोळ्यात पाणी आले. रुमालाने मी संकेतचे डोळे पुसले आणि माझे पण पुसले.
“तीन-चार वेळा आपण तूझ्या घरी गेलो होतो. तुझी आई असायची घरी, किती प्रेमळ…”
“तू यायची बंद झालीस म्हणजे तू मुंबई सोडून गेलीस आणि मी सैरभैर झालो. कशातच लक्ष लागेना… त्यात तुझा फोन पण लागेना. मग मी सोलापूरला येऊन गेलो.”
“काय… तू सोलापूरला येऊन गेलास?”
“सोलापुरात अनेक ठिकाणी तुझा फोटो आणि नाव विचारून चौकशी केली. तेव्हा कळले तुमचे कुटुंब पुण्याला शिफ्ट झाले.”
“होय, पप्पांची त्याच सुमारास पुण्याला बदली झालेली…”
“एकंदरीत सर्वच ग्रह आपल्या विरोधात होते..”
“कल्पू, तुझी कधीकाळी भेट होईल असे वाटले नव्हते… खरंतर रोजच यावेळी या मेट्रोस्टेशनवर मी असतो… पण आजचा दिवस आणि हे मेट्रोस्टेशन… अगदी स्पेशल ठरले!”
मी हसत हसत म्हणाले, “हो रे संकेत. लग्न होण्याआधी मी फिरून घेतेय. एकदा कॅनडाला गेले की, दोन नाहीतर तीन वर्षांनी भारतात… आणि ते पण आईकडे, पुण्यात… म्हणून मावशीला भेटायला आले. रात्रीची ट्रेन पकडायची म्हणून दुपारीच मावशीकडून बाहेर पडले आणि प्लॅटफॉर्मवर बाजूलाच उभा तू… आयुष्यातील पहिले आणि एकदाच केलेले प्रेम!”
“तुला आठवण आहे त्या प्रेमाची कल्पू?”
“पहिले प्रेम हे कोवळ्या किरणासारखे असते रे… आल्हादायक… ऊबदार! ते कसे विसरता येईल?”
“पण आता तुझे लग्न ठरलेय यशबरोबर…”
“हो ना, त्या प्रेमाची ऊब मनात ठेवून पुढचे आयुष्य… तुला माझी आठवण होते संकेत?”
“तुला कसा विसरू! तुझ्यासोबत बँडस्टॅन्डला घालवलेली रम्य संध्याकाळ… दीनानाथला पाहिलेली नाटके… जहांगीरमध्ये पाहिलेली चित्रप्रदर्शने… कल्पना, माझ्या क्रिकेटवेडापायी मी स्टेशनवर येऊ शकलो नाही. त्यामुळे तुझी कायमची ताटातूट झाली… म्हणून मी क्रिकेट खेळणे पण सोडले!”
संकेतला जोराचा हुंदका आला. मी पुढे होऊन त्याला थोपटले.
“सावर स्वतःला संकेत… विसर ते सर्व… मला विसर… बँडस्टॅन्डवरच्या संध्याकाळ विसर… आता तुझे लग्न झालेय… समीरा…”
एव्हड्यात संकेतचा फोन वाजू लागला.. मी परत जागेवर येऊन बसले.. संकेत मला म्हणाला,
“विनयचा फोन आहे..”
विनय आमच्या ग्रुपमधील जवळचा मित्र. मी संकेतला म्हटले,
“दे, दे… माझ्याकडे फोन दे. माझा आवाज ऐकून त्याला धक्का बसेल…”
मी फोन घेतला..
“हॅलो…”
“कोण बोलतंय?” – विनय.
“अरे विन्या, मला ओळखलंस नाहीस?”
“नाही. कोण तू?”
“अरे, दोन स्पेशल… दोन स्पेशल…”
“दोन स्पेशल? म्हणजे कल्पना की काय? अगं बाई, आहेस कुठे तू? आमचा मित्र तुला शोधून शोधून दमला…”
“शोधून शोधून दमला आणि समीराबरोबर लग्न करून झाला मोकळा…” मी हसत म्हणाले.
“कोण समीरा? आणि कुणाचे लग्न?”
“अरे, समीरा म्हणजे संकेतची बायको… परदेशी बँकेत नोकरी करते ती!”
“तुला वेड लागलंय का, कल्पना? संकेत अविवाहित आहे. त्याला किती मुली दाखवल्या. पण तो कुणालाच पसंत करत नाही. लग्नच करायचं नाही म्हणतो. त्याची आई याच धक्क्याने गेली.”
“पण असं का? त्याने एका सुंदर मुलीचा फोटो दाखवला मला.”
“तो खोटं बोलतोय. त्याने फक्त एकाच मुलीवर प्रेम केलेलं… आणि ती तू होतीस!”
“काय?”
“हो, खरे आहे. तुम्ही आता कुठे आहात? मी येतो तिथे…”
“आम्ही गोरेगाव मेट्रोच्या कॅफेत बसलो आहोत. अचानक भेट झाली…”
“ठीक. मी अर्ध्या तासात पोहोचतो…”
आश्चर्याने मी संकेतकडे पाहात ओरडले,
“संकेत.. काय हे? विन्या म्हणतो.. समीरा वगैरे कुणी नाही.. तुझे लग्नचं झालेले नाही?”
संकेत गप्प बसला.
“का केलं नाहीस लग्न संकेत? तुझ्या आईला का त्रास दिलास? माझ्यासाठी?”
संकेतने मान हलवली.
“अरे वेड्या… मी पण लग्न केले नाही. माझे पहिले प्रेम विसरले नाही मी…”
“अगं मग, मघा म्हणालीस… यश… कॅनडाला जाणार म्हणून?”
“तू तुझं लग्न झाले म्हणालास. म्हणून मी पण सांगितलं! तुलाच शोधत होते. तू दुपारी गोरेगाव मेट्रो स्टेशनला असतोस, असे वनिताने मला सांगितले म्हणून गेले तीन दिवस येथे येते आहे. शेवटी आज भेटलास…”
“वनिता कुठे भेटली?”
“वनिता आहे माझ्या लिस्टवर. पण खोटे का बोललास?”
“मी तुझा अपराधी आहे कल्पू. मी स्टेशनवर आलो नाही, याची शिक्षा मी भोगतोय. पण माझ्या मनात तूच होतीस आणि आहेस कल्पना! तुझ्याखेरीज मी कुणाचाच विचार करू शकत नाही.”
हेही वाचा – बुवा आणि अर्जुन साठे… गुरू-शिष्याचे अतूट नाते!
“मी पण विसरू शकले नाही संकेत. शेवटी पहिले प्रेम ते… कोवळ्या उन्हासारखे… मला तू हवा आहेस. तुझ्यासाठीच मी या मेट्रो प्लॅटफॉर्म फिरते आहे, तुला शोधत…”
“आपण परत भेटलो. आता सतत भेटत राहूया काय? म्हणजे जीवनसाथी होऊया काय?”
मी कधी उठले आणि संकेतच्या बाजूला जाऊन बसले कळलेच नाही. तेवढ्यात विन्या कॅफेत प्रवेश करत होता. मी संकेतच्या बाजूला बसून त्याच्या कानात बोलत असल्याचे पाहून तो वेटरला ओरडला…
“कॉफी… दोन स्पेशल…”


