पराग दामले
मागच्या वर्षी पंचांग आणलं त्याच वेळेला माझ्या अंगावर काटा आला होता… पुढच्या वर्षी अधिक महिना आहे, हे समजलं होतं… मनात चिंता लागून राहिली होती. कितीही परिस्थिती चांगली असली तरी, सोन्याची किंवा चांदीची वस्तू करून देणे, हे तितकं सोपं राहिलेलं नाहीये, पण रीतीरिवाज, प्रथा यांच्यापुढे माणूस हात टेकतो… त्या प्रथा जपण्याच्या अपेक्षा सासूबाईंच्या असणार, हे माहीत होतं मला… काही बोलल्या नाहीत, पण मला आतून जाणवत होतं!
अधिक महिना चार दिवसांवर आला… मी आईकडे गेले. खूप दिवसांनी गप्पा मारल्या, मला फक्त गूळ चालत नाही म्हणून आईने माझ्यासाठी गूळ आणि साखरेची पुरणाची पोळी केली होती. दोघी मिळून गप्पा मारत नीट जेवलो, विषय काढायचा होता… दुपारी दोघी आडव्या झालो आणि तिला म्हटलं, “आई, अगं आता अधिक महिना येतोय तू काळजी करू नकोस, मी व्यवस्था केली आहे…”
आई म्हणली, “तू का करतीयेस? मी आहे की!”
मी म्हटलं, “तू आहेस म्हणजे तुझ्याकडे जे काही पैसे आहेत, ते तुला लागणार आहेत! त्या पैशात तू जावयासाठी म्हणजे माझ्या नवऱ्यासाठी काही वस्तू घ्यावी, असे मला वाटत नाही. तुझ्याकडे जे पैसे हे तुझ्या औषधांना, तुझ्या रोजच्या जगण्याला उपयोगी पडतात. त्यातून पैसे उचलून अशी वस्तू घेणे हे प्रॅक्टिकली चुकीचा विचार आहे.”
हेही वाचा – दोन पिढ्यांचा ‘अधिक’चा आनंद
आई म्हणली, “नाही गं, मला एकच तर जावई आहे… मग त्याला घ्यायला पाहिजेच आणि अधिक महिना काय सारखा येतो का? मग मी घेणारच, माझ्या हयातीत जे काही करता येईल ते करीन, माझ्या पश्चात सगळं तुझंच आहे.”
मी तिला समजावून सांगितलं आणि उठून पर्समधनं डबी काढली, वर्षभर प्रत्येक महिन्याला गुंज गुंज करत साठवलेलं सोन्याचं वळ तिच्या हातात दिलं आणि म्हटलं, “हे जावयाला दे तुझ्या, हे मी स्वतः कमावलं नसलं तरी, स्वतः पैसे साठवून माझ्या स्वतःसाठी काहीही न घेता माझ्या घरच्यांच्या समोर तुझी मान ताठ राहावी म्हणून केलेला खटाटोप आहे.”
आई आश्चर्यचकित होऊन म्हणली, “अगं, हे भलतंच काय केलंस!”
“अगं, हे भलतं नाहीये, शेवटी तू माझी आई आहेस! तुला त्रास होऊ नये याची काळजी मी घेणार आणि ते सोनं त्यांच्याच पैशातलं आहे, ते त्यांच्याच घरात राहणार म्हणजे नुकसान पण नाही.”
आईला काय बोलावं कळत नव्हतं, तिच्या डोळ्यात पाणी आलं…
आईला म्हटलं, “ही गोष्ट कोणालाही बोलू नकोस… नाहीतर भावनेच्या भरात, माझं कौतुक करायच्या नादात बोलशील आणि मी तोंडघशी पडेन…”
दुपारचा चहा पिऊन आईकडून निघाले आणि घरी आले…..
संध्याकाळी नवऱ्याचा फोन आला, थोडा उशीर होतोय… मी बरं म्हटलं… मी ताज्या पोळ्या केल्या, दुपारची भाजी होतीच, भरीला गाजराची कोशिंबीर डाळिंबाचे दाणे घालून केली. मी दुपारी मनसोक्त पुरणपोळी खाल्ली होती, त्यामुळे तशी निवांत होते… मुलाला आणि सासूबाईंना जेवायला वाढलं आणि नवऱ्याची वाट बघत बसले… नऊच्या सुमारास तोही आला… फ्रेश झाला आणि म्हणाला, “फार भूक नाहीये, पण जेवू आपण.”
मी विचारलं, “काय रे, काही खाऊन आलास का?”
तो म्हणाला, “अगं हो, थोडं खाल्लं आहे.”
त्याच्या चेहेऱ्यावर आनंद दिसत होता…
हेही वाचा – अधिक मासाचं अनोखं वाण… जावयाकडून!
रविवारी आम्हाला आईने जेवायला बोलावलं… आम्ही गेलो. आईने अनारसे आणून ठेवले होते. साधाच स्वयंपाक केला होता… जावयाला आवडतात म्हणून गुलाबजाम केले होते. जेवल्यावर आईने आम्हाला ओवाळून अनारशाचं ताट दिलं आणि कपाटातून चांदीचा तांब्या आणि भांडं आणलं, नवऱ्याला कुंकू लावून हातात दिलं, पण देताना डोळ्यातून मुळा-मुठा वाहात होत्या. त्या वस्तू बघून मी अवाक् झाले, मी तर सोन्याचं वळ दिलं होतं नवऱ्याला द्यायला…
नवऱ्याने तांब्या-भांडं माझ्या सासूबाईच्या हातात दिलं… नकळत वजनाचा अंदाज घेतला गेला… चेहेऱ्यावर आनंद दिसत होता….
त्या दिवशी नवऱ्याला उशीर का झाला याचा उलगडा झाला… नवरा आणि सासूबाई बाहेरच्या खोलीत होते, मी आईला किचनमध्ये गाठलं, हळूच विचारलं, “आई हे कुठून आणलं? मी तुला सोन्याचं वळ दिलं होतं, जावयाला द्यायला…”
आईच्या डोळ्यात अश्रू होते, म्हणाली, “मला जावई मिळाला आहे तो सोन्यासारखा आहे, त्याला समन्वय साधायचा होता, कोणाला दुखवायचं नव्हतं, प्रथा मोडायची नव्हती, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खोटा आव आणून मी काही करणं मान्य नव्हतं…”
आईला खर्चात पाडायला नको म्हणून दोघांनी आपापल्या परीने प्रयत्न केले होते… कौतुक वाटलं होतं की, स्वतःच्या आईचे मन राखायला बायकोच्या आईला मदत केली होती! दोन्ही माऊली खरंच नशीबवान होत्या…
सगळंच ताटातून वाटीत आणि वाटीतून ताटात जमा झालं…
निघताना नवऱ्याने आईकडे बघून तोंडावर बोट ठेवलं… जावई आणि सासू यांचं टॉप सिक्रेट परिवाराला आनंद देऊन गेलं…


