नीलिमा कदम जांगडा
साठच्या दशकात जन्माला आलेल्या पिढीला गाण्यांची वही माहिती असेल… काहींनी ती जपूनही ठेवली असेल! साधारण आठवीत गेल्यावर हे वेड सुरू झालं. बहुतेक मुली डायरी किंवा वहीत आवडती गाणी लिहून घ्यायच्या. मी डायरीत गाणी लिहायचे… आठवी ते अकरावीपर्यंत माझ्या तीन डायऱ्या भरल्या! आता एका क्लिकवर हवं ते गाणं अगदी कोणालाही उपलब्ध असलेल्या पिढीला ‘हे काय बुवा?’ असं आश्चर्य वाटेल.
पण त्यावेळेस वर्गातील मित्र-मैत्रिणींना, ‘ए तुझ्याकडे हे गाणं आहे का?’ वगैरे विचारत आपला संग्रह वाढवला जायचा. आपल्याकडची गाणी त्यांना द्यायची, अशी मस्त देवाण-घेवाण चालायची. माझं हस्ताक्षर खूप चांगलं होतं. गाणी उतरवून काढताना तर ते ‘मुलायम मस्का’च व्हायचं. कारण गाणं उतरवून घेताना ते मनात सुरू असायचं. गायिकेच्या आवाजातील गाणं आपण स्वतःच गातोय, हे तर पक्कंच होतं; पण ड्युएट साँग असेल तर गायक म्हणजे आपल्या मनातील ‘तो’ हे पण आपलं आपणच ठरवलेलं! मग तो प्रत्यक्षात असो वा नसो कुछ फरक नहीं पडता!! यच्चयावत हिंदी रोमँटिक गाणी ही केवळ आपल्या दोघांसाठीच लिहिली आहेत, हा माझा तेव्हा ठाम समज होता. मला हेच म्हणायचं आहे… माझ्या मनात याच भावना आहेत… असं त्या गाण्याबद्दल वाटायचं. ही रोमँटिक गाणी आमच्या त्या स्वप्नाळू वयाचा आऊटलेट होता!
गाणी डायरीत उतरवून घेताना हात भराभर चालायचा, कारण दुसऱ्याची वही परत करायची असायची. एकवेळ अभ्यासाची वही लगेच परत केली नाही तर चालायची, पण गाण्याची वही कोणीही दुसऱ्याला जास्त काळ ठेवू देत नसत. प्रत्येकासाठी तो अनमोल खजिना असायचा. अगदी जवळच्या मैत्रिणी एखाद्या दिवसासाठी वही घरी न्यायला द्यायच्या, बाकी सकाळी वर्गात गेल्यावर संध्याकाळी वही परत द्यावी लागायची. मग मधल्या सुट्टीत लिहा, क्वचित ऑफ पिरियड असला तर लिहा, असं करावं लागायचं. अनेकदा तर भरवर्ग सुरू असताना, बाई एखादा विषय शिकवत असताना, वरती त्या विषयाचं उघडं पुस्तक.. त्या खाली बेमालूमपणे लपवलेली आपली डायरी अन् मांडीवर ज्यातून कॉपी करायची आहे ती वही… बाईंचं शिकवणं लक्षपूर्वक ऐकते आहे, असा अभिनय करत हाताने भराभर लिहिणं, असं सुरू असायचं. माझ्यातील मल्टिटास्किंगची बीजं अशी शालेय जीवनात रोवली गेली!
हेही वाचा – असंच काहीसं आवडलेलं…
आठवी ते दहावी अतिशय ‘भाविकपणे’ केलेल्या या उपक्रमात मी एकदाही पकडले गेले नाही. किती उच्च कोटीचा अभिनय असेल! पण यासाठी एक मोठी गोष्ट मला अनुकूल होती, ती म्हणजे मी ‘बॅक बेंचर’ होते. आमच्या शाळेत उंचीप्रमाणे बसवायची पद्धत होती. माझ्या उंचीमुळे मी पूर्ण शालेय जीवन ‘बॅक बेंचर’च होते!
एखादं आपल्याला आवडतं गाणं सहज मिळत नसेल तर, आपण फक्त आपल्या वर्गमित्रांना सांगायचं… सांगायचा अवकाश की, ते गाणं मला उपलब्ध करून देणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, या भावनेने सर्व मित्र कामाला लागायचे… अर्थात, यात मैत्रीणीला मदत करण्याचा निखळ उद्देश असायचा.
हेही वाचा – सेम टू सेम!
गैरसमज

एक मजेदार किस्सा आहे. एकदा मला ‘असली नकली’ चित्रपटातील ‘तेरा मेरा प्यार अमर…’ हे गाणं हवं होतं. वर्गात कोणाकडे सहज मिळालं नाही. मी बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका मुलाला विचारलं. त्याने दुसऱ्या दिवशी ते गाणं आणि एक कविता मला दिली. त्याचं शीर्षक माझ्या अजूनही लक्षात आहे – ‘मीतभाषिणी गे…’ ही कविता देत म्हणाला, ‘ही कविता मी लिहिली आहे.’ त्याच्या मनात काय आहे, हे मला काहीच माहिती नव्हतं. मी आपलं खूप छान कविता आहे वगैरे बोलले. मला रोज एका कवितेचा रतीब सुरू झाला. मी आपलं ‘छान, सुंदर’ म्हणत होती, पण नंतर या पलीकडे माझी विशेषणं संपली!
मला वाटतं, त्या मुलाचाही शब्दसंग्रह आणि पेशन्स संपला असावा. त्याने मग ‘तू मला आवडतेस’ वगैरे वगैरे सुरू केलं. मी बोलले, ‘अरे, माझ्या मनात असं काही नाही.’ तो म्हणाला, ‘मग काय तू उगाचच माझ्याकडे ‘तेरा मेरा प्यार अमर’ हे गाणं मागितलंस!’ त्यानंतर मी कानाला खडा लावला अन् फक्त मैत्रिणींनाच गाण्याबद्दल विचारण्यास सुरुवात केली!


