गरम चहाच्या घोटासोबत ताज्या बन-मस्का पावाचा आस्वाद देणारे आणि अनोळखी माणसांचे ओळखीत रुपांतर करणारे तसेच गप्पांचा फड जमविण्यासाठी मुंबईकरांचे आवडते ठिकाण म्हणजे ग्रांट रोड येथील ‘बी मेरवान कॅफे’! आता तो बंद झाल असला तरी, अनेकांच्या मनात त्याचा स्मृतीगंध अद्याप कायम आहे.
मुंबई हे सातत्याने बदलणारं शहर आहे. इथे रात्रीतून इमारती उभ्या राहतात, जुनं मोडून नवं उभारलं जातं आणि लोक तंत्रज्ञानाच्या वेगासोबत धावत असतात. पण या धावपळीच्या मुंबईत एक अशी जागा होती, जिथे वेळ जणू 100 वर्षांपूर्वीच थांबली होती. ग्रांट रोड रेल्वे स्टेशनच्या पूर्वेकडे अगदी बाहेर पाऊल टाकताच डाव्या हाताला दिसणारा हा ‘बी मेरवान कॅफे’. जुने लाकडी दरवाजे आणि तिथून येणारा बटरचा खमंग सुवास तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाणारा होता. पण साधारणपणे दीड वर्षांपूर्वी तो बंद झाला.
आजच्या हाय-टेक, चकचकीत कॅफेच्या दुनियेतही ‘बी मेरवान अँड कंपनी’ (B. Merwan & Co.) केवळ मुंबईकरांच्याच नव्हे, तर जगभरातून येणाऱ्या खवय्यांच्या आकर्षणाचे केंद्र का बनून राहिला होता, याचा हा सविस्तर प्रवास…
या कॅफेला 112 वर्षांचा दैदिप्यमान इतिहास आहे! या ऐतिहासिक इराणी कॅफेची सुरुवात 1914मध्ये बोमन मेरवान यांनी केली होती. या कॅफेचा तोच थाट आणि तीच लोकप्रियता अनेक वर्षं कायम राहिली. एके काळी मुंबईत शेकडो इराणी कॅफे होते, पण काळाच्या ओघात हळूहळू ते बंद होत गेले. मेरवानने मात्र अनेक वादळे अंगावर झेलत आपली अस्सलता आणि अस्तित्व टिकवून ठेवले होते. 2014मध्ये हा कॅफे कायमचा बंद होणार अशी अफवा पसरली होती, तेव्हा मुंबईकरांनी तिथे प्रचंड गर्दी करून हे आपल्या संस्कृतीचे अंग असल्याचे दाखवून दिले आणि हा कॅफे शाबूत राहिला. पण काळाच्या पुढे तो फार टिकाव धरू शकला नाही.
हेही वाचा – 90च्या दशकातील अकोल्यातील खाद्यसंस्कृती
मेरवानमध्ये पाऊल ठेवणे म्हणजे जणू टाइम मशीनमधून थेट विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जाण्यासारखे होते. तिथल्या काळानुरूप झिजलेल्या पण मजबूत लाकडी खुर्च्या, संगमरवरी (Marble-top) गोल मेज, भिंतीवर लावलेले अवाढव्य बेल्जियमचे आरसे आणि जुन्या पद्धतीचे पंखे… आजही अनेकांच्या स्मरणात आहेत.
या कॅफेमधे टेबल शेअरिंगची संस्कृती होती, म्हणजे इथे ‘प्रायव्हसी’ वगैरे काही नव्हते. एकाच टेबलावर कॉलेजचे तरुण, नोकरदार, एखादा लेखक आणि पेन्शनर आजोबा एकत्र बसून चहा पिताना दिसायचे. अनोळखी माणसांशी ओळख करून घेण्याची आणि गप्पा मारण्याची ही मुंबईची जुनी संस्कृती इथे जास्त जिवंत दिसायची.
मावा केक, बन-मस्का पाव, खारी यांची टेस्ट जिभेवर रेंगाळायची. बी मेरवानचे खाद्यपदार्थ हीच त्यांची खरी ओळख. अतिशय मर्यादित मेन्यू असूनही लोकांची इथे झुंबड उडायची. मेरवानचा मावा केक हा निव्वळ पदार्थ नाही, ती एक भावना होती. अतिशय मऊ, तोंडात टाकताच विरघळणारा, योग्य प्रमाणात गोड आणि अस्सल माव्याचा स्वाद असलेला हा केक घेण्यासाठी सकाळी 6.30 वाजल्यापासून रांगा लागत. तुम्ही सकाळी 8.30 किंवा 9 वाजता पोहोचलात, तर काऊंटरवरून “मावा केक खलास!” हे ऐकायची पूर्ण तयारी ठेवावी लागायची. त्याचबरोबर बन-मस्का आणि इराणी चहा स्पेशलचं म्हणावं लागेल. इथला बन इतका मऊ असायचा की, हाताने सहज तुटायचा. त्यात भरलेलं पांढरं बटर (मस्का) आणि सोबत मिळणारा कडक, साय असलेला गोड इराणी चहा! चहात बन बुडवून खाण्याचा तो आनंद फाइव्ह स्टार हॉटेलमधील महागड्या नाश्त्यालाही फिका पाडायचा. मेरवानची इतर बेकरी उत्पादने जसे मऊ पुडिंग, मावा समोसा, वेगवेगळ्या पेस्ट्रीज आणि अंड्याची भुर्जी – ऑम्लेट हे देखील येथील विशेष पदार्थ… मुंबईच्या महागाईच्या काळातही येथील दर अतिशय वाजवी होते. त्यामुळे सामान्यातील सामान्य माणूसही इथे पोटभर नाश्ता करू शकतो, हे याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होते!
हेही वाचा – गोष्ट एका ‘व्हेज अंडाकरी’ची!
‘बी मेरवान’चे खरे आकर्षण हे केवळ तिथल्या अन्नात नाही, तर तिथल्या ‘निवांतपणात’ होता. आजचे कॅफे आपल्याला वाय-फाय देतात जेणेकरून आपण लॅपटॉप उघडून कामात बुडून जावे. पण मेरवान आपल्याला मोबाइल बाजूला ठेवून, समोरच्या अनोळखी माणसाशी ‘चाय पे चर्चा’ करायला भाग पाडायचा. या बदलत्या मुंबईत मेरवान म्हणजे भूतकाळाची एक सुंदर आणि गोड आठवण राहिली आहे!


