अध्याय तेरावा
आणि आत्मा गोचरु होये । ऐसी जे विद्या आहे । ते आइकोनि डौर वाहे । विद्वांसु जो ॥825॥ उपनिषदांकडे न वचे । योगशास्त्र न रुचे । अध्यात्मज्ञानीं जयाचें । मनचि नाहीं ॥826॥ आत्मचर्या एकी आथी । ऐसिये बुद्धीची भिंती । पाडूनि जयाची मती । वोढाळ जाहली ॥827॥ कर्मकांड तरी जाणे । मुखोद्गत पुराणें । ज्योतिषीं तो म्हणे । तैसेंचि होय ॥828॥ शिल्पीं अति निपुण । सूपकर्मींही प्रवीण । विधि आथर्वण । हातीं आथी ॥829॥ कोकीं नाहीं ठेलें । भारत करी म्हणितलें । आगम आफाविले । मूर्त होतीं ॥830॥ नीतिजात सुझे । वैद्यकही बुझे । काव्यनाटकीं दुजें । चतुर नाहीं ॥831॥ स्मृतींची चर्चा । दंशु जाणे गारुडियाचा । निघंटु प्रज्ञेचा । पाइकी करी ॥832॥ व्याकरणीं चोखडा । तर्कीं अतिगाढा । परि एक अध्यात्मज्ञानीं फुडा । जात्यंधु जो ॥833॥ तें एकवांचूनि आघवां शास्त्रीं । सिद्धांतनिर्माणधात्री । परि जळों तें मूळनक्षत्रीं । न पाहें गा ॥834॥ मोराचां आंगीं असोसें । पिसें आहाति डोळसें । परी एकली दिठी नसे । तैसें तें गा ॥835॥ जरी परमाणूएवढें । संजीवनीमूळ जोडे । तरी बहु काय गाडे । भरणें येरें ॥836॥ आयुष्येंवीण लक्षणें । सिसेंवीण अळंकरणें । वोहरेंवीण वाधावणें । तो विटंबु गा ॥837॥ तैसें शास्त्रजात जाण । आघवेंचि अप्रमाण । अध्यात्मज्ञानेंविण । एकलेनी ॥838॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : प्रेमाथिलेनि भक्तें, जैसेनि भजिजे कुळदैवतें
अर्थ
आणि आत्म्याचा साक्षात्कार होईल, अशी जी ब्रह्मविद्या आहे ती ऐकून जो (अध्यात्मशास्त्रावाचून इतर पढलेला) शहाणा विद्वान, त्या ब्रह्मविद्येची निंदा करतो ॥825॥ जो उपनिषदांकडे जात नाही, ज्याला योगशास्त्र आवडत नाही, आणि अध्यात्मज्ञानाचे ठिकाणी ज्याचे लक्षच लागत नाही ॥826॥ आत्मनिरूपण म्हणून काही एक महत्वाची गोष्ट आहे, अशा समजुतीची भिंत (मर्यादा) पाडून ज्याची बुद्धि स्वैर भटकणारी झाली आहे, ॥827॥ तो सर्व कर्मकांड जाणतो, पुराणे त्याला तोंडपाठ आहेत आणि जो ज्योतिषशास्त्रात इतका निष्णात आहे की, तो भविष्य करील तसेच घडते. ॥828॥ कलाकौशल्याच्या कामात अति निपुण असतो, पाकक्रियेत अति प्रवीण असतो, व अथर्वण वेदाचे विधि (मंत्रशास्त्राचे विधि जारण, मारण, उच्चाटान वगैरे विधी) त्याला हस्तगत झालेले असतात. ॥829॥ कामशास्त्रात त्याला काही जाणावयाचे राहिले नाही, भारत तर त्याला पाठ असते आणि मंत्रशास्त्रही मूर्तिमंत त्याच्या स्वाधीन झालेले असते. ॥830॥ नीतिसंबंधीची सर्व शास्त्रे त्यास अवगत असतात, वैद्यशास्त्र तो जाणतो व काव्यात व नाटकात त्याहून दुसरा कोणी चतुर नाही. ॥831॥ स्मृतीचा विचार त्याला कळतो, इंद्रजाल विद्येचे मर्म त्याला कळते व वैदिक शब्दांच्या कोशाला तो आपल्या बुद्धीचा चाकर करतो. ॥832॥ तो व्याकरणशास्त्रात अति प्रवीण, तर्कशास्त्रात फार पटाईत असतो. परंतु एक अध्यात्मज्ञानांत जो खरोखर जन्मांध आहे, ॥833॥ त्या एका अध्यात्मज्ञानावाचून इतर सर्व शास्त्रांच्या सिद्धांतास निर्माण होण्याची तो पृथ्वीच आहे, (असा जरी तो असला) तरी पण त्याच्या त्या सर्व ज्ञानाला आग लागो. मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाला जसे आईबापांनी पाहू नये, तसे तू त्याच्याकडे पाहू नकोस. ॥834॥ मोराच्या अंगावर जशी डोळेवाली पिसे पुष्कळ असतात, परंतु मोर ज्या आपल्या दृष्टीने पहातो ती एकटी दृष्टि त्या मोरास जर नसली, तर त्या पिसांवरील डोळ्यांचा जसा काही एक उपयोग नाही, त्याप्रमाणे अर्जुना, एक अध्यात्मज्ञानावाचून त्याच्या इतर ज्ञानाचा काही उपयोग नाही. ॥835॥ परमाणूएवढे जर संजीवनी वनस्पतीचे मूळ मिळाले, तर इतर पुष्कळशा गाडे भरून असलेल्या वनस्पतीच्या मुळ्या काय करावयाच्या आहेत? ॥836॥ ज्याप्रमाणे आयुष्याशिवाय इतर सर्व सामुद्रिक उत्तम चिन्हे आहेत, अथवा शिर नसलेल्या केवळ धडास जसे अलंकार घालावेत, अथवा नवरानवरीशिवाय जसा वर्धावा काढावा, ही जशी केवळ विटंबना आहे ॥837॥ त्याप्रमाणे एका अध्यात्मज्ञानावाचून ते इतर सर्व शास्त्रांचे ज्ञान पूर्णपणे अप्रमाण आहे, असे समज. ॥838॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : प्राणिजातेंसीं निष्ठुरु, स्थावरीं बहु भरु


