भाग – 29
आत्याच्या घरी देखील रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू होती. सिया चेंज करून हॉलमध्ये आली होती. शरू आत्या आणि कलावती तयार जेवण घेऊन हॉलमध्ये आल्या. आज सगळे हॉलमध्ये बसून जेवणार होते. मामा आणि सखाराम बाहेर गॅलरीत होते. राम टेरेसवर गावाकडे काही महत्त्वाचे फोन करत होता. लग्नासाठी सगळे इकडे शहरात आल्यामुळे गावाकडे शेती आणि घराकडे लक्ष द्यायला त्याने भावकीतील त्याचा चुलत भाऊ बाळूला सांगितलं होतं. त्यातच आज रात्रीची पाण्याची बारी असल्यामुळे पिकाला पाणी द्यायचं काम त्याला सांगत होता.
तर, पवन त्याच्या रूममध्ये लॅपटॉपवर ऑफिससंबंधित काहीतरी काम करत होता. लग्नामुळे त्याच्या सुट्टया पडल्या होत्या. पण काही महत्त्वाची कामं तो घरून करत होता. त्यात अजून दोन-तीन दिवस तरी त्याला सुट्टी लागणार होती.
“मी चेंज करून येते तू बाहेर हॉलमध्ये जा,” असं सियाला सांगून पूर्वी रूममध्येच थांबली होती. बाहेर पवनच्या समोर जायला नको म्हणून! अशा प्रकारे पहिल्यांदाच कोणी मुलगा तिच्या इतक्या जवळ आला होता आणि तिचं मन विचलित करून गेला होता! तिचं मन फक्त त्याचाच विचार करत होतं… तो प्रसंग अन् त्याचा स्पर्श आठवून आत्ताही हृदयाची धडधड वाढत होती. आपल्याला असं का होतंय… ती छातीवर हात ठेऊन मनातच विचार करत होती. गोंधळलेली होती बिचारी,, पण तरीही ओठांमध्ये हलकंस हसू होतं.
“कुछ तो हुआ है… कुछ होने वाला है…” अशी वाली फिलिंग ती सध्या अनुभवत होती. तिच्याही नकळत चेहऱ्यावर लाजेची लाली पसरत होती… त्याच्या समोर जाण्याची हिम्मत नव्हती म्हणून ती रूममध्येच मोबाइल पाहात बसली होती.
“आगं राव्हदी की! तू कशाला करती? चुडा उतरुस्तर काम नसतं करायचं नवरी नं…” सिया खाली अंथरलेलं कार्पेट बाजूला काढून ठेवत बसण्यासाठी चटया टाकत होती…. तेव्हा किचनमधून पोळीचा डबा घेऊन येत कलावती तिला म्हणाल्या.
“नाही काही, बस्स एवढंच टाकलं मी; झालंच आहे…” त्यांच्या हातातून पोळीचा डबा घेत सिया हळू आवाजात म्हणाली. कारण त्या दोघी आल्यापासून काम करत होत्या… सिया बसून होती, तिला ते बरोबर वाटलं नाही आणि आपणही काही तरी मदत करायला हवी समजून ती ते करत होती.
हेही वाचा – शिवचा हात दरवाजात सापडला अन्…
“म्हणले ना तुला बस हितं! एकदा हळद फिटली की, तुलाच करायच्यात सगळी कामं…” कलावती तिला खाली बसवत म्हणाली.
सियाला तसं तर माहीतच होतं, राम आणि त्याच्या फॅमिलीचं राहणीमान! पण तरीही आत्ता तिला असं त्या अंथरलेल्या चटईवर बसल्यावर जरा अवघडल्यासारखं झालं. डायनिंग टेबलवर बसून जेवायची सवय असणाऱ्या सियाला खाली बसून जेवायला आता कसंतरी वाटत होतं. नुसतं ती बसलीच होती, अजून ताट वाढायची होती…
स्वतःच अवघडलेण बाजूला सारून चेहऱ्यावर स्माइल आणून ती बसून राहिली… आता कसंही असलं तरी तिला सवय करून घ्यावी लागणार होती आणि ती यासाठी पूर्ण तयार देखील होती. पण त्याचबरोबर पूर्वी अजून कशी बाहेर आली नाही म्हणून तिची नजर रूमकडे पण जात होती.
तोवर सखाराम आणि मामा पण आत आले.
“अहो, जरा वेळ थांबा तुम्ही दोघे, नंतर जेवा. आधी सिया आणि रामचं जेवण होऊ द्या… त्या पवनला फोटो काढायचेत. दिवसभर लग्नात फोटो काढूनही त्याचं मन भरलं नाही अजून…” शरू आत्या पवनच्या बाबांना म्हणाल्या आणि दोघेही मान हलवत सोफ्यावर बसले.
“अगं आई, तुझ्या लाडक्या आरूचा निरोप आहे आणि इच्छा पण… घरी गेल्यावर जेवताना मस्त दादा, वहिनीचे घास भरवताना फोटो काढ म्हणून…” त्यांच्याजवळ येत पवन सियाकडे पाहून हसत म्हणाला. सियाही त्याच्याकडे पाहून हसली… सोबत या दोघी पण तिला चिडवल्यागत हसल्या आणि तिने लाजून मान खाली घातली.
“दादा कुठंय?” पवन इकडे तिकडे पाहत म्हणाला.
“आरं वर गच्चीवर गेला होता… बघ जाऊन… बाळूला फोन करतो म्हणत होता,” त्याचे भाऊ म्हणाले.
तसं तो रामला बोलवायला निघाला आणि मागून सियाने पवनला आवाज दिला…
“हां वहिनी बोल ना!” मागे वळून पवन म्हणाला.
“अरे पूर्वी रूममध्येच आहे अजून, तिलाही बोलावशील…” सिया म्हणाली आणि पूर्वीचं नाव ऐकून त्याला मघाशी घडलेला प्रसंग आठवला. त्याला असं गप्प उभा राहिलेल पाहून सिया म्हणाली,
“काय… काय झालं पवन? बोलवतोस ना?”
“न… नाही… काही नाही झालं… बोलावतो,” तो गडबडून म्हणाला आणि पूर्वीला बोलवायला गेला.
0000
इकडे सरपोतदार फॅमिलीमध्ये सगळे जेवणासाठी जमले होते. खाली येताना आरूने केलेली बडबड लीला आजीला आवडली नव्हतीच! त्या रागातच त्या नाक मुरडत चेअरवर जाऊन बसल्या. त्यांच्या मागे दिनकर देखील जाऊन बसले. तर, समरने गेमचं नाव काढून आरूच्या उत्साहात भर घातली होती.
“आरू, भावना चला दोघी पण जेवायला बसा… या,” डायनिंग टेबलकडे इशारा करत सुधा म्हणाल्या.
“अं… हो… आरू चल…” भावना आरूचा हाताला धरून पुढे घेऊन आली.
“समर, शिव कुठे आहे? त्याला बोलावं ना कॉल करून जेवायला,” सुधा म्हणाल्या आणि टेबलाकडे वळल्या.
मावशींनी सगळ्यांच्या प्लेटमध्ये जेवण सर्व्ह करायला सुरुवात केली होती. समर शिवला कॉल करण्यासाठी बाजूला गेला होता… आरू आणि भावना डायनिंग टेबलपाशी येऊन उभ्या राहिल्या…
आरूला आता समोर टेबल आणि खुर्च्या पाहून भारीच दडपण आलं आणि करंगळीचं नख तोंडात धरत टेन्शनमध्ये ती हळूच भावनाला म्हणाली, “ताई, यावर बसून जेवायचंय आपण?”
हेही वाचा – लीला आजीची रागीट नजर आरूवरच होती…
आता लीला आजी तिच्याकडेच रोखून पाहत होत्या, त्यामुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत जाणार नाही, याची काळजी घेत भावनाच्या कानाजवळ जाऊन तिने हा सवाल केला.
“हो… सगळे तर चेअरवरच बसले आहेत! आपणच खाली बसलेलं चांगलं नाही दिसणार ना?” भावना तिला धीर देत समजावण्याच्या सुरात म्हणाली.
“हं…” ती बळेच हसून म्हणाली.
“काय गं… काय झालं?” त्या दोघींची उभ्यानेच चाललेली खुसूर-पुसूर ऐकून सुधा यांनी विचारलं.
“नाही, काही नाही…” भावना सावरून घेत म्हणाली.
“मग बसा ना दोघी पण… भूक लागली असेल ना!” सुधा म्हणाल्या. तसं आरू कसंतरी अवघडून चेअरवर बसली.
आई भाकरी करत असताना तिच्या समोर मस्त चुलीपुढे मांडी घालून बसून ती जेवत होती. एका बाजूच्या चुलीवरची भाजी ताटात घेऊन, गरम भाकरी चुरून खायची सवय असलेल्या आरूला या खुर्चीवर बसून टेबलवर ठेवलेलं ताट आणि त्यात मांडलेले पदार्थ पाहूनच पोट भरल्यासारखं वाटलं!


