अध्याय तेरावा
सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् । असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च ॥14॥
तरी तें गा किरीटी ऐसें । अवकाशीं आकाश जैसें । पटीं पटु होऊनि असे । तंतु जेवीं ॥891॥ उदक होऊनि उदकीं । रसु जैसा अवलोकीं । दीपपणें दीपकीं । तेज जैसें ॥892॥ कर्पूरत्वें कापुरीं । सौरभ्य असे जयापरी । शरीर होऊनि शरीरीं । कर्म जेवीं ॥893॥ किंबहुना जैसे पांडवा । सोनेंचि सोनयाचा रवा । तैसें जें या सर्वां । सर्वांगीं असे ॥894॥ परी रवेपणामाजिवडे । तंव रवा ऐसें आवडे । वांचूनि सोनें सांगडें । सोनया जेवीं ॥895॥ पैं गा वोघुचि वांकुडा । परि पाणी उजू सुहाडा । वन्हि आला लोखंडा । लोह नव्हे कीं ॥896॥ घटाकारें वेंटाळें । तेथ नभ गमे वाटोळें । मठीं तरी चौफळें । आये दिसे ॥897॥ परि ते अवकाश जैसें । नोहिजतीचि कां आकाशें । जें विकार होऊनि तैसें । विकारी नोहे ॥898॥ मन मुख्य इंद्रियां । सत्त्वादि गुणां ययां- । सारिखें ऐसें धनंजया । आवडे कीर ॥899॥ परि पैं गुळाची गोडी । नोहे बांधया सांगडी । तैसीं गुण इंद्रियें फुडीं । नाहीं तेथ ॥900॥ अगा क्षीराचिये दशे । घृत क्षीराकारें असे । परी क्षीरचि नोहे जैसें । कपिध्वजा ॥901॥ तैसें जें इये विकारीं । विकार नोहे अवधारीं । पैं आकारा नाम भोंवरी । येर सोने तें सोनें ॥902॥ इया उघड मऱ्हाटिया । तें वेगळेपण धनंजया । जाण गुणइंद्रियां- । पासोनियां ॥903॥ नामरूपसंबंधु । जातिक्रियाभेदु । हा आकारासीच प्रवादु । वस्तूसि नाहीं ॥904॥ तें गुण नव्हे कहीं । गुणा तया संबंधु नाहीं । परी तयाचांचि ठायीं । आभासती ॥905॥ येतुलेयासाठीं । संभ्रांताचा पोटीं । ऐसें जाय किरीटी । जे हेंचि धरी ॥906॥ तरि तें गा धरणें ऐसें । अभ्रातें जेवीं आकाशें । कां प्रतिवदन जैसें । आरसेनि ॥907॥ सूर्य प्रतिमंडळ । जैसेनि धरी सलिल । कां रश्मिकरीं मृगजळ । धरिजे जेवीं ॥908॥ तैसें गा संबंधेंवीण । यया सर्वांतें धरी निर्गुण । येरी तें वायां जाण । मिथ्यादृष्टी ॥909॥ आणि यापरी निर्गुणें । गुणातें भोगणें । रंका राज्य करणें । स्वप्नीं जैसें ॥910॥ म्हणौनि गुणाचा संगु । अथवा गुणभोगु । हा निर्गुणीं लागु । बोलों नये ॥911॥
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : रूप वर्ण व्यक्ती, नाहीं दृश्य द्रष्टा स्थिती
अर्थ
सर्व (चक्षुरादि इंद्रिये व सत्वादि) गुण यांच्या आकाराने ते भासते (असे दिसते), पण ते (स्वत:) सर्व इंद्रियांनी विरहित आहे. ते (सर्वत्र) असक्त (आहे), तथापि सर्वभृत् (सर्व धारण करणारे) आहे. ते निर्गुण आहे, परंतु सर्व गुणांचे पालन करणारे आहे. ॥14॥
तरी हे अर्जुना, ते ब्रह्म असे आहे की, जसे अवकाशाच्या ठिकाणी आकाश व्यापून आहे, (अथवा) वस्त्रामधे तंतू जसा वस्त्र होऊन आहे. ॥891॥ पाहा की, पाण्यामधे रस, जसा पाणी होऊन असतो, अथवा दिव्यामधे दिवा होऊन जसे तेज असते, ॥892॥ ज्याप्रमाणे कापरामधे सुगंध कापूर होऊन असतो अथवा शरीरामधे जसे कर्म शरीर होऊन असते ॥893॥ फार काय सांगावे! अर्जुना, जसे सोनेच सोन्याचा तुकडा (होऊन) असते, त्याप्रमाणे जे ब्रह्म या सर्वांच्या सर्व अंगात आहे ॥894॥ (येथून ब्रह्माची व्याप्ती जगामधे कशी आहे हे व्यतिरेक दृष्टीने दाखवितात). परंतु ते सोने तुकडेपणामधे असते, तेव्हा तो सोन्याचा तुकडा असे वाटते. पण वास्तविक पाहिले तर (तुकड्याच्या आकाराने असणारे) सोने हे जसे सोन्यासारखे आहे ॥895॥ हे मित्रा अर्जुना, पाण्याचा ओघ जरी वाकडा असला, तरी पाणी जसे सरळच असते, अथवा लोखंडात अग्नीचा प्रवेश झाला म्हणून तो अग्नि जसा लोखंड होत नाही. ॥896॥ घटाच्या आकाराने वेटाळलेले आकाश घटामधे जसे वाटोळे आहे, असे वाटते व मठामध्ये सापडलेले आकाश हे चौकोनी आकाराचे दिसते ॥897॥ परंतु आकाश हे जसे तो अवकाश (घटातील वाटोळी पोकळी अथवा मठातील चौकोनी पोकळीप्रमाणे) झाले नाही, त्याप्रमाणे जे ब्रह्म सर्व विकार (मनादि इंद्रिये अथवा सत्वादि गुणादिक) होऊन, जे विकारवान् झाले नाही ॥898॥ अर्जुना ते ब्रह्म, मन ज्यात मुख्य आहे अशा इंद्रियांसारखे आणि सत्वरजादि गुणांसारखे असल्याचे (वरून वरून) दिसते खरे, ॥899॥ परंतु गुळाची गोडी जरी ढेपेत सापडलेली असते, तरी ती गोडी ढेपेच्या आकाराची झालेली नसते, त्याप्रमाणे (गुण व इंद्रिये यात जरी ब्रह्मवस्तु आहे तरी) ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी गुण व इंद्रिये ही खरोखर नाहीत. ॥900॥ हे कपिध्वजा अर्जुना, दुधाच्या अवस्थेमधे तूप हे दुधाच्या आकाराने असते, परंतु ते दूधच जसे (तूप) नसते ॥901॥ त्याप्रमाणे जे (ब्रह्म) या विकारात आहे, परंतु जे विकार नाही असे समज. (ते कसे तर) ज्याप्रमाणे आकाराला बुगडी हे नाव आहे, बाकी सर्व सोने ते सोनेच आहे. ॥902॥ अर्जुना, या उघड उघड मराठी (सोप्या) भाषेने सांगावयाचे म्हटले म्हणजे, तू गुणेंद्रियांपासून वस्तूचे वेगळेपण समज. ॥903॥ नाम, रूप, संबंध, जाति, क्रिया व भेद हे सर्व आकारासंबंधी बोलणे आहे, वस्तूला हे बोलणे नाही. ॥904॥ ते (ब्रह्म) कधीही गुण होत नाही, आणि त्याचा व गुणांचा काही एक संबंधही नाही, पण गुण हे त्याच्याच ठिकाणी भासतात. ॥905॥ अर्जुना, एवढ्यामुळेच अज्ञानी लोकांच्या मनात असे वाटते की ही वस्तूच गुणाला धारण करते. ॥906॥ पण अर्जुना, त्या वस्तूचे गुणाला धारण करणे असे आहे की, जसे आकाश ढगांना धारण करते, अथवा आरसा जसा प्रतिबिंबाला धारण करतो. ॥907॥ पाणी जसे सूर्याच्या प्रतिबिंबाला धारण करते, अथवा सूर्याची किरणे जशी मृगजळाला धारण करतात ॥908॥ अर्जुना, त्याप्रमाणे वास्तविक संबंधावाचून, या सर्व विकारांना ते निर्गुण ब्रह्म आधार होते. परंतु विकारांस आधार आहे, हेही म्हणणे व्यर्थच आहे, कारण ते भ्रमाच्या कल्पनेचा अंगीकार करून म्हटलेले आहे, असे समज. ॥909॥ आणि एखाद्या दरिद्री पुरुषाने स्वप्नात जसे राज्य करावे, त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माने गुणांचा भोग घेणे होय. ॥910॥ म्हणून गुणांचा संबंध अथवा गुणांचा भोग, यांचा निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी संबंध आहे, असे बोलू नये. ॥911॥
क्रमश:
हेही वाचा – सार्थ ज्ञानेश्वरी : वांचूनि हस्त नेत्र पाये, हें भाष तेथ कें आहे


