सकाळीच एक उत्तर भारतीय जोडपं त्यांच्या दोन लहानग्यांसह ओपीडीत आलं होतं; त्यापैकी तिघांचं पोट बिघडलं होतं, मात्र सगळ्यात लहान सदस्य मजेत होता…
“खाने में कुछ आया होगा,” म्हटल्यावर “सभी ने कल एक ही खाना खाया,” अशी माहिती मिळाली. मी सहज निरोगी सदस्याकडं मोर्चा वळवला आणि बघतो तर त्याला बोलता येत नव्हतं. मतिमंद… गतीमंद… स्वमग्न… नक्की सांगता येत नव्हतं; पण पोरगं खूश होतं अन् मुख्य म्हणजे तसं बाकी निरोगी दिसत होतं.
“बिकलांग हैं सर” भैय्यानं माहिती दिली… “मतलब समझता हैं सब, लेकिन कमजोड हैं,” भैय्यीणीनं दुजोरा दिला.
आपण किती लवकर ‘टॅग’ करतो ना एखाद्याला? शिकलेल्या माणसाला चटकन निदान होईना आणि थेट पालकांनीच शिक्का मारला ‘विकलांग’! माणसाच्या बुद्धिमत्तेचं मोजमाप कसं करायचं? परीक्षेतील गुणांनी? पदव्यांनी? मोठ्या नोकरीनं? की त्यानं वाचलेल्या पुस्तकांच्या संख्येनं?
मला ‘किम पीक’ची आठवण झाली. या सगळ्या निकषांना हा मनुष्य पुरून उरला होता. त्याच्याकडं संगणक नव्हता – इंटरनेट नव्हतं – मोबाइल नव्हता… पण त्याच्या मेंदूत हजारो पुस्तकांचं एक जिवंत ग्रंथालय वसलं होतं.
हेही वाचा – …म्हणून मी मरणार नाही!
होय, हा विलक्षण माणूस होता ‘किम पीक’! पण त्याची गोष्ट केवळ असामान्य स्मरणशक्तीची नाही, ती मानवी मेंदूच्या गूढतेची, मर्यादांची आणि अद्भुत क्षमतांची कथा आहे…
1951मध्ये अमेरिकेतील साल्ट लेक सिटी इथं किमचा जन्म झाला. जन्मताच डॉक्टरांना काहीतरी वेगळं दिसलं. त्याच्या मेंदूची रचना सामान्य नव्हती. नंतरच्या तपासण्यांत त्याच्यात अनेक जन्मजात न्यूरोलॉजिकल वैशिष्ट्ये आढळली; त्यातील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मेंदूच्या दोन्ही अर्धगोलांना जोडणारा कॉर्पस कॅलोजम हा भाग पूर्ण विकसित नव्हता.
डॉक्टरांनी पालकांना सांगितलं, “हे मूल कदाचित कधीच सामान्य आयुष्य जगू शकणार नाही.” काहींनी तर संस्थेत ठेवण्याचाही सल्ला दिला, पण त्याचे वडील फ्रॅन पीक यांनी एकच निर्णय घेतला, “माझा मुलगा माझ्यासोबतच राहील” आणि तो निर्णय पुढं जगासाठीही वरदान ठरला.
किम उशिरा बोलायला लागला – चालायलाही अडचणी होत्या – त्याचे स्नायू समन्वयानं काम करत नव्हते – त्याला स्वतः शर्टची बटणं लावणं, बूटांची लेस बांधणं किंवा दैनंदिन काही साधी कामं करणंही कठीण जाई…
पण, जेव्हा त्याच्या हातात पुस्तक आलं, तेव्हा जणू संपूर्ण विश्वच बदललं. तो पुस्तक उघडे आणि जणू डाव्या डोळ्यानं डावं पान अन् उजव्या डोळ्यानं उजवं पान आणि काही सेकंदांत दोन्ही पानं वाचून संपवत असे!
त्याचा वाचनाचा वेग अफाट आणि माहिती लक्षात ठेवण्याची क्षमता विलक्षण होती. या प्रक्रियेचे अचूक न्यूरोवैज्ञानिक स्पष्टीकरण आजही पूर्णपणं उपलब्ध नाही! एकदा पुस्तक वाचलं की, ते जवळजवळ कायमचं त्याच्या स्मरणात साठून जाई. इतिहास, भूगोल, साहित्य, धर्म, संगीत, क्रीडा, नकाशे, अमेरिकेतील महामार्ग, दिनदर्शिका… एवढंच काय थेट टेलिफोन डिरेक्टरी सुद्धा!
त्याच्या स्मरणशक्तीला विषयांचे बंधनच नव्हतं; अंदाजे 12,000हून अधिक पुस्तकं त्यानं वाचली आणि त्यातील जवळपास सगळंच अचूक आठवत असे. तुम्ही त्याला विचाराल, “1896मध्ये ऑलिंपिक कुठं झालं?” उत्तर क्षणार्धात! “फलाणा लेखकाच्या अमुक पुस्तकाच्या अमुक पानावर काय लिहिलंय?” उत्तर तयार!! “25 डिसेंबर 2040 रोजी कोणता वार असेल?” क्षणात गणित!!! जणू त्याच्या मेंदूत एक जिवंत शोधयंत्रच बसवले होतं.
मग प्रश्न पडतो, हा माणूस प्रतिभावान होता की अपंग? उत्तर इतकं सोपं नाही, कारण तो एकाच वेळी दोन्ही होता. त्याच्याकडं असामान्य स्मरणशक्ती होती, पण दैनंदिन आयुष्यातील अनेक साध्या गोष्टींसाठी त्याला इतरांची मदत लागत असे. हीच मानवी मेंदूची गंमत आहे. एखाद्या क्षेत्रात आकाशाला भिडणारी क्षमता आणि दुसऱ्या क्षेत्रात अगदी मूलभूत अडचण!
किम पीक याचं नाव जगभर पोहोचलं, ते एका चित्रपटामुळं. लेखक बॅरी मॉरोनं त्याची भेट घेतली आणि त्याच्यापासून प्रेरणा घेऊन ‘रेन मॅन’ या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखेची निर्मिती केली. चित्रपटात काही वैशिष्ट्ये काल्पनिक होती आणि ती पूर्णपणे किमच्या जीवनाशी जुळत नाहीत. विशेष म्हणजे, किमचंही आयुष्यभर औपचारिकरीत्या ऑटिझमचं निदान झालं होतं का, याविषयीही तज्ज्ञांमध्ये मतभेद राहिलेत; त्यामुळं त्याची कथा आणि चित्रपटातील पात्र यांची पूर्ण समानता मानणं योग्य नाही.
तरीही या चित्रपटामुळं जगभरातील लोकांचे लक्ष अशा विलक्षण न्यूरोलॉजिकल क्षमतांकडं वेधलं गेलं..
वैद्यकीय शास्त्रात किम पीकचं उदाहरण अनेकदा सॅवंत सिंड्रोम समजावण्यासाठी दिलं जातं; ही अशी अवस्था आहे, ज्यामध्ये काही व्यक्तींमध्ये विशिष्ट क्षेत्रात अविश्वसनीय क्षमता दिसून येते – जसं स्मरणशक्ती, संगीत, गणित, कला किंवा दिनदर्शिकेची गणना – परंतु ही अवस्था अत्यंत दुर्मीळ आहे आणि अशा प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगवेगळ्या प्रकारची असते.
वर्षानुवर्षे किम जगभर व्याख्याने देऊ लागला. लोक त्याला प्रश्न विचारत, तो उत्तरे देई. लोक टाळ्या वाजवत, पण त्याचे वडील नेहमी म्हणत, “लोकांना किमच्या स्मरणशक्तीचे आश्चर्य वाटते; मला मात्र त्याच्या माणुसकीचा अभिमान वाटतो.”
कारण प्रसिद्धी वाढली तशी किम अधिक आत्मविश्वासानं लोकांशी बोलू लागला. एकेकाळी सामाजिक संवादात अडचण जाणवणारा हा माणूस हजारो लोकांसमोर उभा राहून प्रेरणा देऊ लागला…
हेही वाचा – जगायला नेमका किती मेंदू लागतो?
2009मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं किमचं निधन झालं. पण त्यानं मागं ठेवलेला प्रश्न आजही तसाच आहे – “मेंदूची खरी क्षमता आपण अजून किती ओळखली आहे?” म्हणजेच, आपण वापरतो तो मेंदू आणि त्याच मेंदूत दडलेल्या शक्यता यांच्यामध्ये अजून किती अज्ञात विश्व दडलंय?
डॉक्टर म्हणून मला या कथेतून सर्वांत मोठी शिकवण मिळते ती म्हणजे कुणालाही त्याच्या मर्यादांनी ओळखू नये – त्याच्या क्षमताही शोधाव्या. वैद्यकीय अहवालात निदान लिहिता येतं – एमआरआयमध्ये मेंदूची रचना दिसते, रक्ततपासणीत आकडे दिसतात – पण माणसाच्या अदृश्य क्षमतेचा एक्स-रे आजपर्यंत कोणत्याही यंत्राला काढता आलेला नाही.
किम पीकच्या आयुष्यानं आपल्याला हेच शिकवलं की, काही लोक आयुष्यभर पुस्तकांच्या शोधात भटकतात आणि काही दुर्मीळ माणसं स्वतःच चालतं-बोलतं ग्रंथालय बनून जगाला विचारायला भाग पाडतात की, “मानवी मेंदूची खरी मर्यादा नेमकी कुठंय?”


