तत्कालीन ॲलोपॅथी उपचारपद्धतींचा, होमिओपॅथीचा जनक सॅम्युअल हॅनिमनच्या मनावर खोलवर परिणाम झाला असावा. औषधाची योग्य मात्रा किती, त्याची उपचार करण्याची क्षमता किती आणि कोणत्या मात्रेनंतर तेच औषध विषारी किंवा प्राणघातक ठरू शकते, याचे आज आपल्याकडे असलेले ज्ञान त्या काळात पुरेसे विकसित झालेले नव्हते. त्यामुळे अनेकदा अक्षरशः ‘रोगापेक्षा इलाज जालीम’ अशी परिस्थिती निर्माण होत असे. रोग बरा करण्यासाठी केलेला उपचारच काही वेळा रुग्णासाठी अधिक त्रासदायक किंवा प्राणघातक ठरत होता.
या पद्धतींविषयी अस्वस्थता आणि निषेध हॅनिमनपासूनच सुरू झाला, असेही नाही. हॅनिमनच्या आधीही अनेक विद्वान डॉक्टरांनी अशा उपचारपद्धतींविषयी प्रश्न उपस्थित केले होते. तत्कालीन वैद्यकाच्या आतूनच बदलाची गरज जाणवू लागली होती… आणि जेव्हा या सगळ्याचा कळस होऊ लागला, तेव्हा कदाचित निसर्गाने हॅनिमनच्या रूपाने या परिस्थितीला एक उत्तर देण्याचा प्रयत्न केला, असे म्हटले तर ते फारसे चुकीचे ठरू नये.
अशा काळात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या हॅनिमनच्या संवेदनशील मनाला आणि चिकित्सक विवेकबुद्धीला हे प्रश्न अस्वस्थ करत होते. रुग्णाला बरे करण्यासाठी आपण उपचार करतो आहोत; पण आपल्या उपचारांमुळेच त्याला अधिक त्रास होत असेल तर? रोगापेक्षा इलाजच अधिक जालीम ठरत असेल तर?
हे त्याला मान्य नव्हते.
हळूहळू त्याचा तत्कालीन उपचारपद्धतींवरील विश्वास कमी होत गेला. अखेरीस त्याने आपला नियमित वैद्यकीय व्यवसाय जवळजवळ बंद केला. पण त्याने वैद्यकाचा अभ्यास सोडला नाही. उलट, त्याने आपला अधिकाधिक वेळ वाचन, लेखन, रसायनशास्त्राचा अभ्यास आणि भाषांतर यात घालवायला सुरुवात केली.
हेही वाचा – Homeopathy : होमिओपॅथीत महाराष्ट्रही अग्रेसर!
…आणि इथे हॅनिमनच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक विलक्षण पैलू समोर येतो. हॅनिमन हा असामान्य भाषातज्ज्ञ होता! ग्रीक, लॅटिन, जर्मन, इंग्रजी, फ्रेंच, इटालियन यासह अनेक भाषांवर त्याचे प्रभुत्व होते; त्याच्या चरित्रांमध्ये आणखी काही भाषांच्या ज्ञानाचाही उल्लेख आढळतो. विविध युरोपीय भाषांतील वैद्यकीय आणि वैज्ञानिक ग्रंथ तो वाचत असे आणि त्यांची भाषांतरे करत असे. भाषांतर हे काही काळ त्याच्या उपजीविकेचेही महत्त्वाचे साधन बनले.
आज हे वाचताना आपल्याला त्याचे अप्रूप कदाचित लगेच जाणवणार नाही. कारण आज आपल्या हातात Google आहे, इंटरनेट आहे, एका क्लिकवर शब्दकोश उपलब्ध आहेत आणि आता तर ChatGPT आणि AI आहेत.
पण आपण अठराव्या शतकाबद्दल बोलत आहोत…
ना इंटरनेट!
ना संगणक!
ना Google!
ना ChatGPT!
समोर होते ग्रंथ, शब्दकोश, अनेक भाषा आणि त्या प्रत्येक शब्दामागचा अर्थ शोधत बसणारा एक जिज्ञासू माणूस.
हेही वाचा – Homeopathy : भयावह ॲलोपॅथी उपचारपद्धती आणि हॅनिमन
आज बारा-पंधरा भाषांमध्ये वाचणे आणि भाषांतर करणे हे ऐकायला एक ओळ वाटते. पण त्या काळात ते किती मोठे बौद्धिक आणि परिश्रमाचे काम असेल, याची कल्पना करून पाहा.
आणि नियतीची गंमत अशी की —
ज्या वैद्यकीय व्यवसायावरील असमाधानामुळे हॅनिमन भाषांतराकडे अधिक वळला, त्याच भाषांतराच्या कामातून पुढे त्याच्या आयुष्याला आणि वैद्यकीय इतिहासाला एक वेगळे वळण मिळणार होते.
एकेदिवशी त्याच्या हातात एका प्रसिद्ध स्कॉटिश डॉक्टरचा Materia Medica हा ग्रंथ आला. हॅनिमन त्याचे भाषांतर करू लागला… आणि भाषांतर करताना एका औषधाविषयी लिहिलेली एक गोष्ट त्याला पटली नाही…
पुढे हॅनिमनने उभी केलेली ही नवीन विचारपद्धती इतक्या वेगाने पसरली की, एकोणिसाव्या शतकात अमेरिका आणि युरोपमध्ये होमिओपॅथीने मोठे स्थान निर्माण केले. अमेरिकेत स्वतंत्र होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालये उभी राहिली आणि युरोपच्या अनेक भागांतही तिचा मोठा प्रभाव निर्माण झाला.
पुढे प्रतिजैविकांचा — अँटिबायोटिक्सचा — शोध हा वैद्यकीय इतिहासातील एक फार मोठा टप्पा ठरला. आधुनिक वैद्यकाच्या उपचारक्षमतेमध्ये त्यामुळे विलक्षण बदल झाला आणि कालांतराने होमिओपॅथीचा पूर्वीचा प्रभाव काहीसा कमी होत गेला.
पण ती पुढची गोष्ट आहे. ती आपण पुढे कधीतरी पाहू…


