उत्तरार्ध
संदेश माने जामिनावर बाहेर आला. संपाबुवा त्याला घरी घेऊन आला. विस्कटलेली केसं, वाढलेली दाढी, शिळा पडलेला चेहरा, चुरगळून टाकलेल्या फुलासारखा संदेश दिसत होता. आई सुनीताला भडभडून आलं. ती तशीच लगबीगीने आत गेली. भाकरीचा एक तुकडा आणि पाणी घेऊन बाहेर आली. पाण्याचं चार शितूडं शिंपडून तिने भाकरीचा तुकडा संदेशवरून ओवाळून टाकला.
“खोटी केस दाखल केली आहे, हे कोर्टाला पटलं. आपल्या वकिलांनी चांगली बाजू मांडली. चुलत चुलत्याचा आणि आमचा जमिनीचा वाद आहे. तो दहा-बारा वर्षे चालू आहे. संदेशच्या वडिलांचे दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले आहे. संदेश आणि आई दोघेच घरात असतात. संदेश एमपीएससीच्या परीक्षेला बसला आहे. आत्ताची त्याची शेवटची परीक्षा आहे. चुलत चुलत्याला हेच पाहवत नव्हतं. म्हणून त्याने मुलीला पुढे करून विनयभंगाची खोटी केस दाखल केली आहे. कोर्टाने सर्व कागदपत्रांची पडताळणी केली. पुरावा पहिला आणि जामीन मंजूर केला,” संपाबुवा म्हणाला. तो घरी जायला बाहेर पडला. तो सुनीताचा मावस भाऊ होता.
“ए संपाबुवा, उन्हातान्हाचा कुठं निघालास तरातरा?” यल्लवाच्या हाकेने संपाबुवा विचारातून बाहेर आला. त्याने बाजूला पाहिलं. नरवंदेच्या पडक्या बोळातून जुनेरं फाटकं लुगडं नेसलेली यल्लवा येत होती. हातातल्या दोन जड वायरच्या पिशव्या सावरत सावरत ती चालत होती. ती झपाझपा पावलं टाकत रस्त्यावर आली आणि संपाबुवाच्या आडवी उभीच राहिली. संपाबुवा म्हणाला, “गेलो होतो भाच्याकडे. चहा पिऊन आत्ताच आलोय.”
“मी पण निघाले आहे त्याच्याकडेच. येतोस का परत आणखी एकदा चहा प्यायला?”
“नको आता. मला काम आहे. मी चार-पाच दिवस तिकडेच होतो. तू जा आणि भेटून ये जा.”
यल्लवा तरातरा चालत संदेशच्या घरापर्यंत आली. बसकन् घरात घुसली. तिथेच शिलाई मशीनला लागून खाली बसली. संदेशकडे पाहून म्हणाली, “संदेश, गावातलं कुणाचं काय ऐकत बसायचं न्हाय. आपल्या कामाला लागायचं. लोकांची मतं बदलण्याचा प्रयत्न करू नकूस. स्वतःचं आयुष्य घडव. सूनी कुठंय? ‘च्या’ ठेवायला सांग तिला.”
सोप्यातल्या आवाजाने सुनीता बाहेर आली. यल्लवाला पाहून म्हणाली, “ऊन खाली झाल्यावर तर यायचंस. इतक्या उन्हात ते पण चालत आलीस. बसा दोघं बोलत मी सरबत आणते.”
“सरबत फिरबत नकू. ‘च्या’च आण.” सुनीता आत निघून गेली.
हेही वाचा – अफवा आणि सत्य
एका पिशवीतून तिने कळ्याच्या पिवळ्याशार लाडवांचं बारकं गठुळं काढलं. कुरकुरीत चिरमुऱ्याचं दोन पुडं काढलं. शेवचिवड्याच्या फरसाण्याची एक पिशवी काढली. रिकामी पिशवी बाजूला ठेवून दुसऱ्या पिशवीतून एक पांढऱ्याशुभ्र शर्टाचं आणि हिरव्या करड्या रंगाचं पँटीचं कापड काढलं. लुगड्याच्या केळीतून पाचशे रुपयची चुरगळलेली नोट काढली. संदेशच्या हातात देत म्हणाली, “आता माघारी याचं ते अधिकारी म्हणूनच. तू पुण्याला गेल्यावर आता परत कधी येणार काय माहीत? म्हणून जेवढं आहे त्यातलं थोडं थोडं दिलंय. त्यातलं पाशे रुपयं माझं हायतं. कापडं आणि फरसाण भिकाजीनं दिल्याती. अधीमधी आलास तर आणखी द्यायला यीन.”
दोन्ही हातातून आणलेल्या चहाचे कप खाली ठेवता ठेवता सुनीता म्हणाली, “यल्लवा, तू म्हणजे गावाची आईच आहेस बघ. कुठं काय कमी असंल तिथं यल्लवा आलीच म्हणून समजा. आमच्या संदेशला तर मोठा आधार वाटतोय तुझा. आता पुण्याला गेल्यावर कधी माघारी येतोय काय माहीत? अगोदर गावात ही अशी बोंबाबोंब उठलीय. एक पण माणूस आपल्या बाजूने नाही. त्याचीच मला लय काळजी वाटतीय ग.”
यल्लवा पुढं सरकली आणि म्हणाली, “लायकीच्या माणसांचं ऐकावं. कुणाचं पण का म्हणून ऐकायचं?” ती आणखी पुढं सरकली. “सुने, या गावात एक नाही दोन नाही, अठरा वर्षे काढलीत मी. कशी काढली ती माझं मलाच माहीत. अजूनही गाव बदललं न्हाय. चाड्या, लबाड्या आणि कुचाळक्या करणारी टाळकी अजूनही हाईतच. पण एक लक्षात ठेव, आयुष्यात कधी ना कधी प्रत्येकाला एक असा काळ यीतू, जवा सगळं जग आपल्याविरुद्ध उभं असल्यासारखं वाटतं. आपलीच माणसं दूर जात्याती. मित्र शत्रू हुत्याती. खोटं आरोप खरं मानलं जात्याती आणि खऱ्याला एकटं पाडलं जातं. तरीही लक्षात ठेव, खोटं आरोप तुमचं चारित्र्य बदलू शकत न्हाय. अफवा तुमची किंमत ठरवू शकत न्हाय. लोकांचं मत हे सत्य नसतं… आणि बदनामी मजी आयुष्याचा शेवट नसतू. कारण सूर्याला ढग काही काळ झाकू शकतात; कायमचं न्हाई. तसंच सत्यालाही काही काळ अंधार सहन करावा लागतू; पण शेवटी त्यालाच उजेड मिळतू. म्हणून गावातल्या ह्या धेंडापेक्षा स्वतःच्या मनातला विश्वास जप. कारण जगात सर्व काही हरवलं तरी चालतं, पण स्वतःवरील विश्वास हरवला तर माणूस खऱ्या अर्थाने पराभूत हुतू आणि तो विश्वास टिकून असंल, तर कितीही मोठी बदनामी झाली तरी एक दिवस इतिहास तुमची बाजू सांगत उभा राहतू.”
बोलता बोलता तिने चहा संपवला. रिकाम्या दोन पिशव्यांची गुंडाळी केली. काखेला मारून ती उठून उभा राहिली. तिने संदेशच्या गालावरून हात फिरवला. म्हणाली, “लवकर परत ये. आम्ही तुझी वाट पाहतूय.”
यल्लवा निघून गेली.
0000
एसटीच्या खिडकीतून गार वारा येत होता. आता आपण पुण्याला जाणार. मुख्य परीक्षा देणार. काय माहीत, मुख्य परीक्षा दिल्यानंतर पास होईन की नाही? अभ्यासाला वेळ तर खूप कमी आहे. गावाकडे झालेल्या प्रकरणांमधून अजून आपण सावरलो नाही. तो धक्काच इतका मोठा होता की, आपण होतो म्हणूनच निभावून गेलो. दुसरा कोण असता तर मागेच कुठेतरी गेला असता. अखंड प्रवासात हाच विचार.
गाडी स्वारगेटला थांबली आणि तो खाली उतरला. गावाकडून आणलेल्या सर्व पिशव्या त्याने हातात आणि खांद्यावर घेतल्या. रिक्षाने तो सरळ रूमवर गेला. रूम उघडीच होती. म्हणजे नंदू आणि प्रकाश दोघेही अगोदरच आले होते तर.
रूममध्ये प्रवेश करताच प्रकाश पुढे झाला. संदेशच्या हातातल्या पिशव्या घेण्यास त्याने मदत केली. पिशव्या आत ठेवता ठेवता म्हणाला, “आलास? बरं झालं. आता फक्त एन्जॉयमेंट करायची. परीक्षा गेली बोंबलत.”
“अरे, काय झालंय तुला? इतक्या लांबून आलोय. परीक्षा कशी बोंबलत जाईल?”
“अरे बाबा, एमपीएससीच्या सगळ्या एक्झाम पुढे ढकलल्या आहेत. कधी होतील काही सांगता येत नाही. प्रीलिमबाबत कुणीतरी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आपले आयुष्य अजून चार-पाच वर्ष तरी अधांतरीच.”
एवढ्यात कॉटवर पडलेल्या नंदूने अंगावरची चादर बाजूला केली. तो उठून पुढे आला आणि म्हणाला, “याचं काय नाही रे. हा मुळातच आयटी सेक्टरमध्ये स्कॉलर आहे. शिवाय त्याचा कायमच अभ्यास चालू आहे. गेल्या वर्षी 65 किलो वजन होतं. आता 55च्या पण खाली आलंय. गावाकडे सुद्धा हा अभ्यास करत होता. याला कुठे पण जॉब मिळू शकतो. पण आपलं काय?”
संदेश म्हणाला, “बरं ठीक आहे. आता आपण बी प्लॅनकडे वळायलाच हवं. टीटीएमएम करून आज डिनर पार्टी करूया आणि उद्यापासून बी प्लॅनप्रमाणे जॉबच्या नादाला लागू या.”
0000
रोज सकाळी मेलचे रिप्लाय पहायचे आणि पुन्हा दिवसभर मेल करत राहायचं. तीन महिने हाच खेळ चालू होता. शेवटी संदेशला एका कंपनीतून कॉल आला.
‘एमपीसीटी टेक्नॉलॉजीच्या’ कॉर्पोरेट ऑफिसमध्ये इंटरव्ह्यूला जाताना संदेशला प्रचंड दडपण आले होते. परंतु एमपीएससीचा अभ्यास, व्यवसाय व्यवस्थापन कौशल्य, जागतिक प्रकल्पांचा वाचन अनुभव आणि उत्कृष्ट नेतृत्व क्षमता यामुळे 154 कॅंडिडेटमधून संदेशची सहजच निवड झाली.
एका वर्षात सीईओ पदापर्यंत आपण पोहोचू आणि 82.2 कोटी पॅकेज आपल्याला मिळेल, हे संदेशने स्वप्नातही पाहिले नव्हते. खासगी झेड प्लस सिक्युरिटी, एवढं मोठं पॅकेज आणि कंपनीतला दरारा… संदेशचे नाव राज्यभर गाजू लागले. बऱ्याच ठिकाणी पुरस्कार मिळू लागले. कंपनीचे व्याप आणि बाहेरचे पुरस्कार रात्री झोपायला कधी एक कधी दोन वाजत होते.
इंटर कॉम वाजला. झोपेतून तो जागा झाला. सकाळच्या आठ वाजता कुणाचा इंटरकॉम? असे म्हणत त्याने फोन उचलला. शिपायाने सांगितले, “गावातील काही लोक तुम्हाला भेटायला आले आहेत. पाठवू का?” आळोखे पिळोखे देत संदेश म्हणाला, “दहा मिनिटांनी पाठवा.”
माजी सरपंच बळी नाना आणि पंचायतीचे सदस्य शंकर दादा काही लोकांना घेऊन आले होते. आत येताच संदेशने सर्वांना नमस्कार करून स्वागत केले. तोपर्यंत शिपायाने सर्वांना पाणी दिले. नंतर चहा बिस्किटे दिली. कोण काही बोलायच्या अगोदरच बळी नाना संदेशला म्हणाले, “गावच्या ग्रामपंचायतची निवडणूक तोंडावर आली आहे. कालच आम्हा नेतेमंडळींना बातमी समजली की, आपल्या गावचा एक तरुण युवक इतक्या मोठ्या पदावर पोहोचला आहे. मग आम्ही सत्काराचे नियोजन केले. येत्या 20 तारखेला तुम्हाला सत्कार स्वीकारण्यासाठी गावाकडे यावे लागेल.”
संदेश अत्यंत नम्रपणे म्हणाला, “बळी नाना गावच्या प्रमुख लोकांचा शब्द मी मोडणार नाही. पण याची काही आवश्यकता नव्हती. ठरल्या दिवशी वेळेतच मी हजर राहतो.” नमस्कार करून बळी नाना आणि सर्व मंडळी निघून गेले. संदेश भूतकाळात हरवून गेला.
नोकरी लागल्यानंतर पहिल्यांदा गावी गेलो होतो. लोक अजूनही कुजबुजत होते. काहीजण माझ्याकडे बोट दाखवत होते. काहीजण माझ्याकडे पाहून रस्ता बदलत होते. त्या संध्याकाळी मी पुन्हा त्या लिंबाखाली गेलो. जिथे माझी चर्चा होत होती. सगळे माझ्याकडे पाहू लागले. क्षणभर शांतता पसरली. एकाने टोमणा मारला, “काय मग संदेशराव… जेलची हवा कशी होती?” संपूर्ण चौक हसू लागला. पण मी शांतपणे म्हणालो, “वाईट नव्हती. तिथे निदान लोक उघडपणे शत्रू होते. इथं तर मित्रांच्या चेहऱ्यावर मुखवटे असतात.” क्षणात शांतता पसरली.
त्या रात्री मी घराच्या छतावर बसलो होतो. आकाशात चंद्र होता. वृद्ध कैद्याचे शब्द आठवत होते. दुसऱ्या दिवसापासून मी पुन्हा अभ्यासाला बसलो. लोक बोलत राहिले. मी अभ्यास करत राहिलो. लोक हसत राहिले. मी पुढे चालत राहिलो. लोकांनी भूतकाळ उकरला. मी भविष्य लिहायला सुरुवात केली.
माझी खरी परीक्षा तुरुंगातले दोन महिने ही नव्हती. खरी परीक्षा तुरुंगाबाहेर सुरू झाली. लोकांच्या नजरा… लोकांचे प्रश्न… लोकांचा संशय… लोकांचे हसू… हे सर्व सहन करणे अधिक कठीण होते. परंतु जो माणूस सत्याच्या बाजूने उभा असतो, त्याच्याकडे एक अद्भुत शक्ती असते, संयमाची. संयमाने चालणारा माणूस कदाचित हळू चालतो, पण तो कोसळत नाही.
ज्या गावात एके काळी बदनामीचा शिक्का मारला त्याच गावात मोठा सत्कार समारंभ भरला होता. मंचावर संदेश बसला होता. हजारो लोक टाळ्या वाजवत होते. ज्यांनी कधी त्याची बदनामी केली होती तेच आज पहिल्या रांगेत बसले होते.
सत्कारानंतर एका तरुणाने विचारले, “सर, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा कोणता?” संदेश काही क्षण शांत राहिला. मग हसून म्हणाला,
“माझ्या आयुष्यात एकदा अब्रूचा खटला चालला होता.” सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले.
“निकाल काय लागला?” तरुणाने विचारले.
संदेशने शेजारी बसलेल्या आईकडे पाहिले. आत्मविश्वासाने म्हणाला, “आजचा कार्यक्रम हाच तो निकाल आहे.”
संदेश पुढे म्हणाला, “एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, खोटे आरोप तुमचे नाव खराब करू शकतात, पण तुमचे चारित्र्य नाही. अफवा तुमची प्रतिमा खराब करू शकतात, पण तुमचे सत्य नाही. आणि लोक तुमच्या वाटेत काटे टाकू शकतात, पण रस्ता अडवू शकत नाहीत. बदनामी ही शिक्षा नसते, ती माणसाच्या सामर्थ्याची परीक्षा असते. माझ्या वाईट प्रसंगी कुणी मला दोषी ठरवले. कुणी माझ्या कुटुंबाकडे संशयाने पाहिले. कुणी आयुष्यभराची प्रतिष्ठा एका दिवसात संपवून टाकली. पण प्रश्न असा आहे की, अब्रू म्हणजे नेमके काय? लोकांच्या तोंडातील चार शब्द म्हणजे अब्रू का? चौकात होणाऱ्या चर्चेवर आपली प्रतिष्ठा अवलंबून असते का? जर तसे असते, तर इतिहासातील अनेक महान व्यक्ती अब्रूदार ठरल्याच नसत्या. कारण त्यांच्यावरही आरोप झाले. त्यांचीही बदनामी झाली. त्यांनाही समाजाच्या गैरसमजुतींचा सामना करावा लागला. खरी अब्रू बाहेर नसते. ती आपल्या अंतःकरणात असते. रात्री उशीवर डोके ठेवताना आपण स्वतःला दोषी समजत नसू, तर आपली अब्रू अजूनही शाबूत असते.
हेही वाचा – सुटका सावकारी पाशातून…
आयुष्यात सर्वात मोठे दुःख शत्रूंमुळे होत नाही. ते होते आपल्या माणसांमुळे. अनोळखी व्यक्ती विश्वासघात करते तेव्हा धक्का बसतो, पण जवळची व्यक्ती गद्दारी करते तेव्हा आत्माच जखमी होतो. कारण आपण त्यांच्यावर विश्वास ठेवलेला असतो. आपली गुपिते त्यांना सांगितलेली असतात. पण काही लोकांना आपले यश सहन होत नाही. आपल्या प्रगतीमुळे त्यांना स्वतःचा कमीपणा जाणवतो. त्यातून मत्सर जन्माला येतो आणि मत्सरातून कारस्थाने. अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते, गद्दारांचा राग करायचा नाही, त्यांच्यापासून धडा शिकायचा. कारण त्यांनी आपल्याला माणसे ओळखायला शिकवलेले असते.
बदनामीविरुद्धची पहिली लढाई समाजाशी नसते. ती स्वतःच्या मनाशी असते. लोक काय म्हणतील, याची भीती माणसाला आतून पोखरत असते. परंतु वस्तुस्थिती अशी असते की, लोकांना तुमच्याबद्दल फार काळ आठवतही नाही. आज ते तुमची चर्चा करतात… उद्या दुसऱ्या कुणाची… परवा तिसऱ्या कुणाची… समाजाची स्मरणशक्तीपेक्षा विस्मरणशक्ती जास्त मोठी असते. म्हणून प्रत्येक आरोपाला उत्तर देत बसू नका. प्रत्येक कुजबुजीचा खुलासा करत बसू नका. प्रत्येक अफवेला स्पष्टीकरण देत बसू नका. कारण चिखलावर दगड मारला तर, चिखल उडून आपल्या अंगावरच येतो. काळाला त्याचे काम करू द्या. सर्वात मोठा बदला कोणता? खोटा आरोप करणाऱ्याला शिव्या देणे हा बदला नाही. त्याच्यावर सूड उगवणे हा बदला नाही. सर्वात मोठा बदला म्हणजे,
पुन्हा अभ्यास करणे.
पुन्हा कामाला लागणे.
पुन्हा यश मिळवणे.
ज्यांनी आपल्याला संपलेले समजले, त्यांच्यासमोर पुन्हा नव्याने उभे राहणे.
कारण यश हे अनेकदा शब्दांपेक्षा प्रभावी उत्तर असते.”
संदेश स्टेजवरून उठला. अंगरक्षकाच्या गराड्यात तो आणि आई गाडीत जाऊन बसले. गाडी पुण्याच्या दिशेने निघून गेली. अजूनही लोकांच्या टाळ्यांचा कडकडाट थांबायला तयार नव्हता…!!!


