नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला.
आपल्या आयुष्यात कितीतरी नाती जुळून येतात… काही नाती खूप जवळीक साधून असतात… अगदी प्राणांहून जास्त! माझ्यासाठी असंच एक नातं – जे नव्हतं जणू माझ्या आयुष्यात – आजोबा आणि नातीच नातं. मला दोन्हीकडे आजोबा नव्हते. आई आणि आप्पा दोघांचेही वडील त्यांच्या लहानपणीच गेले. पण आजी या नात्याने मी मात्र खूप समृद्ध होते. आई आणि आप्पा, दोघांच्या आई तर होत्याच. आईकडून एक मामाची मोठी आई म्हणजे आईची आई, एक काकी आजी, मामी आजी, मावशी आजी होत्या… तर आप्पांकडून त्यांची आई म्हणजे आप्पांची मोठी आई, खूप लाडकी… खेतवाडीतली मामी आजी म्हणजे नानी मामी मला डोक्यावर बसवण्यात पहिल्या नंबरवर! घरी कोणताही पदार्थ बनवला की, राजू काकाला ऑर्डर जायची – “राजू, पपीला घेऊन ये.” खेतवाडी आठव्या गल्लीच्या घरात काही स्पेशल बनलं आणि ते माझ्याशिवाय खाल्लं गेलं… शक्यच नाही! लाडाची ‘पपी’ ना मी त्यांची!! फक्त मामी आजी नाही तर, नाना आजोबा, दादा काका, माई आत्या आणि राजू काका सगळ्यांनीच माझे खूप लाड केले… पण शिस्त सुद्धा तेवढीच लावली! अजून एक मामी आजी होत्या, भाई आजोबांच्या… पण आम्ही सतत संपर्कात नव्हतो.
आप्पांना दोन आत्या होत्या. ताई आजी आणि बाई आजी. माझे खूप लाड करण्यात ही ताई आजी पण अग्रेसर. फारशी वाट्याला नाही आली, पण आठवणीतून पुसली नाही गेली. बाई आजी तर काय त्यांचा खूप सहवास मिळाला. पण त्या माझ्या भावाचे खूप लाड करायच्या. त्याचं आम्हा बहिणींना कधीच वाईट नाही वाटलं. दोघींच्या पाठीवरचा भाऊ तसा आमचाही लाडाचाच!
हेही वाचा – मोठी आई अन् तिने लहानांचा राखलेला सन्मान!
आईकडच्या काकी आजी, मामी आजी मला पक्क्या आठवतात. त्यात काकी आजी खूप लाड करायची. कल्याणला वाडा होता त्यांचा. एक आजोबा म्हणजे, माझे बाबा आजोबा. त्यांना आम्ही कधी आजोबा म्हणालोच नाही – ‘बाबा’. घरातले सगळे त्यांना मामा म्हणायचे, ‘गोविंद मामा’. खरं तर ते नाना आजोबांचे मित्र. राहायचे आमच्या घरी. पण खूप जवळचे, जिव्हाळ्याचे आमचे बाबा… माझ्या आईचं आणि त्याचं कधीच पटलं नाही. आईचं कायम म्हणणं असे की, ‘त्यांनी मला लाडावून ठेवलीय. त्यांच्यामुळे मी वाया गेलीय…’ कोणी कोणी मला लाडावलं, डोक्यावर बसवलं, वाया घालवलं याची लिस्ट मोठी आहे. त्यात माझ्या नवऱ्याचं पण नाव लिहावं लागेल.
तर, आमचे गोविंद मामा – बाबा आजोबा म्हणजे बाबा. स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना सरकारी पेन्शन होती. दर महिन्याला त्यांची पेन्शन आली की, ते आम्हाला कामतच्या ‘हाटेला’त घेऊन जायचे… ‘हॉटेल’ नाही ‘हाटेल’! मी आणि माझी बहीण बटाटावडा सांबार खायचो आणि भाऊ मात्र शिरा पुरी. आम्हाला महिन्यातून एकदा आणि त्याला तो म्हणेल तेव्हा ते शिरापुरी खाऊ घालायचे. शिवाय, बरेचदा रविवारी दुपारी आइस्फ्रूटवाल्याकडून 10 पैशांचं आइसफ्रूट बाबा आम्हाला घेऊन द्यायचे आणि आमच्या आईला हेच आवडायचं नाही.
‘हॉटेलमध्ये खाऊन मुले बिघडतात…’ ‘आइस्फ्रूट खाल्लं की, जेवत नाहीत…’ म्हणून आईची चिडचिड व्हायची. आप्पा म्हणजे आमचे वडील मात्र कधीही चिडायचे नाहीत. बाबांची बायको म्हणजे मामी आजी. त्या गावाहून आल्या की, मज्जा. येताना गावाचा खाऊ आणायच्या आणि आईला कामात मदत करायच्या. त्यांचं आणि आईचं बरं पटायचं.
हेही वाचा – सदाफुली, माईफुली अन् राजूफुली…
माझा धाकटा भाऊ आणि आत्याची दोन्ही मुलं यांच्यावर बाबांचा विशेष जीव. त्यांना दम्याचा खूप त्रास होता… ते मला म्हणायचे, “पपे, तू डॉक्टर हो आणि मला बरं कर.” पण मी दहावीची परीक्षा दिली आणि ते देवाघरी गेले. रिझल्टसाठी पण थांबले नाहीत… अगदी वटपौर्णिमेच्या दिवशीच गेले. जर ते असते तर 100% मीही असंच म्हणाले असते की, “या बाबांनी ना, माझ्या मुलांना डोक्यावर बसवलंय, वाया गेलीत मुलं…”
असे सगळे माझे आजी-आजोबा आणि गणगोत. एकेकावर लिहित गेले ना, तरी लिहून पूर्ण होणार नाही आणि मन सुद्धा भरणार नाही…


