भाग – 1
टीव्हीवरच्या बातम्या पहाता पहाता शेखरची नजर भिंतीवरच्या घड्याळाकडे गेली. साडेदहा वाजले होते. पूजाचा अजून पत्ता नव्हता. नऊ वाजताच त्याने तिला फोन करून ‘किती वाजता येते आहेस,’ असं विचारलं होतं, तेव्हा तिने साडेदहा-अकराची वेळ दिली होती. त्याने अकरापर्यंत वाट पहायचं ठरवलं. जांभया देत तो टीव्ही पाहू लागला. पाच, पाच मिनिटांनी त्याची नजर घड्याळाकडे जात होती. शेवटी अकरा वाजले. पूजा आली तर नाहीच, तिचा फोनही आला नाही. शेखरने धीर धरून तिला फोन लावला. बराच वेळ रिंग वाजली. तिने कॉल उचलला नाही. दोन मिनिटं थांबून त्याने परत कॉल केला… आताही बराच वेळ रिंग वाजली, पण शेवटी तिने कॉल उचलला…
“हॅलो बेटा, कुठे आहेस? तू येणार होतीस ना अकरापर्यंत?”
“अहो, कशी येऊ बाबा? पार्टी आता तर सुरू झालीये!”
मागून कुठल्याशा वेस्टर्न साँगचा इतका मोठा आवाज येत होता की, तिला तो काय म्हणतोय तेच व्यवस्थित कळत नसावं…
“बरं, मग केव्हा संपणार आहे पार्टी? आणि केव्हा येणारेस तू घरी?”
“अहो बाबा, मी आता कसं सांगू केव्हा संपेल पार्टी?”
तिचा चिडलेला स्वर त्याच्या लक्षात आला…
“तुम्ही काही काळजी करू नका. मी येईन पार्टी संपली की! तुम्ही झोपा. माझ्याजवळ आहेच दुसरी चावी…”
“अगं बेटा, काळजी वाटते गं!”
“ओहो कमॉन बाबा…! मी आता काही लहान नाही राहिले. चांगली एकोणीस वर्षाची आहे मी!”
“अगं बेटा म्हणूनच जास्त काळजी वाटते गं…”
“जाऊ द्या बाबा, तुमचं हे नेहमीचंच आहे. पार्टी रंगात आली की, फोन करून डिस्टर्ब करायचं! सांगितलं ना तुम्हाला, पार्टी संपली की, मी येईन. बस मग! आता त्रास देऊ नका. मी ठेवतेय फोन…” ती आवाज चढवून बोलली. पुढच्याच क्षणी फोन कट झाला.
तिच्या अशा वागण्याचा त्याला संताप आला. पण त्याने मनाला समजावलं. आजकाल बऱ्याचदा ती पार्टीला जायची, पण बारासाडेबारापर्यंत घरी यायची. याही वेळेला येईल, अशी स्वतःची समजूत घालत त्याने टीव्ही बंद केला आणि झोपायला गेला.
पूजा शेखरची एकुलती एक पोर. त्याची बायको सविता 13 वर्षांपूर्वीच वारलेली. त्यावेळी पूजा फक्त सहा वर्षांची होती. शेखर धुळ्याला एका सरकारी कार्यालयात कारकूनाचं काम करत असताना घडलेली ही घटना. संसार सुखाचा चालू असताना सविताला कावीळ झाली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि चुकीच्या औषधोपचारामुळे धडधाकट सविताचा मृत्यू झाला. तिच्या या अकाली जाण्याने शेखर खचला. पण एक दिवस एका डॉक्टरनेच त्याला उपचारात हलगर्जीपणा झाल्याचं दाखवून दिल्यावर शेखर पेटून उठला. त्याने जिल्हा ग्राहक मंचात डॉक्टरविरुद्ध तक्रार दाखल केली.
यादरम्यान त्याला त्याच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी दुसरं लग्न करायचा सल्ला दिला. तो रास्तच होता कारण शेखरच वय तेव्हा फक्त 32 होतं. पण सावत्र आईच्या छळाच्या इतक्या गोष्टी त्याने ऐकल्या होत्या की, आपल्या लाडक्या लेकीला अशा कजाग आईच्या हातात द्यायला त्याचं मन काही तयार झालं नाही. शिवाय, पूजाचं संगोपन करायला आजीआजोबा होतेच. म्हणून त्याने लग्नाचा विचारच मनातून काढून टाकला. कोर्टकेस सुरू होतीच.
दुर्दैवाने, जिल्हा ग्राहक मंचात हरल्यानंतर त्याने राज्य ग्राहक मंचात अपील केलं. त्यात तो जिंकला. त्याला नुकसानभरपाई तर मिळालीच, पण डॉक्टरलाही सजा झाली. अर्थात, बायको गमावल्यावर या जिंकण्याचा त्याला काहीच फायदा नव्हता. कोर्टकेस तर जिंकली, पण त्याच वर्षात त्याच्या आईवडिलांचं पाठोपाठ निधन झालं. तो आणि त्याची लेक परत एकदा पोरके झाले. नाही म्हणायला वेगळे निघालेले त्याचे भाऊ होते, पण त्यांचा फारसा काही उपयोग नव्हता.
हेही वाचा – अल्लड हर्षा अन् तिच्या मैत्रिणी
आजीआजोबा गेले तेव्हा पूजा नववीत होती. शेखरने तिला स्वयंपाक आणि इतर कामं करायला शिकवलं. तिच्यावर चांगले संस्कार केले. पूजा बारावी पास झाली आणि त्याचवेळी शेखरची प्रमोशनवर पुण्याला बदली झाली. आपल्या मुलीने आयएएस ऑफिसर व्हावं, असं शेखरचं स्वप्न होतं. पुण्यात तिचं चांगलं शिक्षण होईल. यूपीएससीचे क्लासेसही तिला जॉइन करता येतील, या हिशोबाने त्याने पूजालाही पुण्याला आणलं. एका चांगल्या नामांकित काँलेजमध्ये तिची ॲडमिशन करून दिली.
काही महिने सर्व आलबेल सुरू होतं. हळूहळू पूजाची मैत्री काँलेजमधल्या उच्चभ्रूंच्या मुलामुलींशी झाली. पूजाचं सौंदर्यही त्याला कारणीभूत होतं. शेखरलाही यात काही वावगं वाटलं नाही. अशा मुलांशी झालेल्या मैत्रीचा तिच्या करिअरला फायदाच होईल, असं त्याला वाटलं. दुसऱ्या वर्षापासून पूजाच्या मैत्रीने वेगळं वळण घेतलं. शेखरने लाडक्या लेकीचा हट्ट पूर्ण करून तिला पन्नास हजारांचा स्मार्टफोन घेऊन दिला होता. त्या स्मार्टफोनचा उपयोग मित्रमैत्रिणींशी चॅटिंग करताना होऊ लागला. पहिल्या वर्षी सदोदीत घरात रहाणारी पूजा दुसऱ्या वर्षी फक्त जेवायला आणि झोपायला घरी येऊ लागली. पार्ट्यांचं तर पीकच आलं होतं. कधी ही पार्टी तर कधी ती पार्टी… कधी शनिवार, रविवार आऊटिंग. पूजाला बापाकडे आणि अभ्यासाकडे बघायला वेळ मिळेनासा झाला.
सकाळी ती दहा वाजता उठायची, तेव्हा शेखर दोघांचा स्वयंपाक करून ऑफिसला निघून गेलेला असायचा. तो संध्याकाळी सात वाजता घरी यायचा, तेव्हाही ती कॉलेजमधून आलेली नसायची. त्याने फोन केला की, सांगायची… “आज कुणीतरी अमूक पार्टी देतोय, मी उशिरा घरी येईन.” तिला एकदा खडसून जाब विचारावा, असं त्याला वाटायचं; पण त्या एकुलत्या एक आईविना पोरीला दुखवायचं त्याच्या जीवावर यायचं. नाही म्हणायला दोन-तीनदा त्याने तिला विचारलंही, पण “बाबा घरी तुमच्याशिवाय कोण असतं. मला घरात करमत नाही…” असं बोलून ती त्याला चूप करायची.
शेखर लेकीवरच्या प्रेमापुढे हतबल झाला होता. थोडी मोठी झाली की, तिला स्वतःलाच जबाबदाऱ्या कळतील, अशी स्वतःची तो समजूत करून घ्यायचा. पण पूजाचा उद्धटपणा दिवसेंदिवस वाढतच चालला होता. आपला बाप जुन्या आणि आऊटडेटेड विचारांचा आहे, जग कुठे चाललंय आणि हा मात्र अजूनही मध्यमवर्गीय चालीरीती पाळतो, हे तिच्या बोलण्यातून बऱ्याचदा त्याला जाणवायचं. तिच्या अशा वागण्यामुळे बापलेकीत दुरावा निर्माण झाला होता… हेही त्याला कळत होतं.
हेही वाचा – अल्लड हर्षा अन् जगण्यातील जिवंतपणा!
थोड्यावेळाने त्याला जाग आली. मोबाइलवर त्याने पाहिलं, रात्रीचा दीड वाजला होता. पूजा आली की, नाही या काळजीने तो उठला. तिच्या रूमचं दार त्याने ढकलून पाहिलं… रूम रिकामी होती. आता मात्र चिंता आणि राग त्याच्या मनात उफाळून आला. फोन करून तिच्यावर तोंडसुख घ्यावं, या विचाराने त्याने हातातल्या मोबाइलवर तिचा नंबर डायल करायला सुरुवात केली नाही, तोच त्याचाच मोबाइल वाजला… पूजाचाच फोन होता.
“कुठं आहेस तू बेटा?केव्हाची वाट बघतोय तुझी”त्याने वैतागाने विचारलं
“हॅलो, मी पूजा नाही, इन्स्पेक्टर जाधव बोलतोय…” इन्सपेक्टर हा शब्द ऐकल्यावर एक भीतीची लहर त्याच्या काळजातून आरपार निघून गेली.
क्रमश:
(ही कथा माझ्या ‘गिफ्ट’ या पुस्तकातील आहे.)


